कुरकुटवाडीचे सहाणे बंधू टोमॅटोतून झाले मालामाल! तीन एकरवर लागवड; आत्तापर्यंत वीस लाखांचे उत्पन्न


नायक वृत्तसेवा, घारगाव
शेतकर्‍यांना पहिल्यांदाच टोमॅटो पिकातून सुवर्णकाळ अनुभवयाला मिळत आहे. सध्या टोमॅटोला प्रतिकिलो दीडशे रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी मालामाल झाले आहेत. संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील कुरकुटवाडी येथील सहाणे बंधूंनीही टोमॅटोतून आत्तापर्यंत वीस लाख रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. अजूनही त्यांचे टोमॅटो सुरू असून, उत्पन्नात भर पडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.

शेतीमध्ये कायमच नवीन प्रयोग करुन वेगळी वाट शोधण्यात ज्ञानेश्वर व निवृत्ती सहाणे यांचा हातखंडा आहे. यापूर्वी झेंडूचे पीक घेतले, त्यातही त्यांना चांगले उत्पन्न मिळाले. त्याच पिकाच्या बेडवर त्यांनी तीन एकरवर टोमॅटोची लागवड केली. उत्तम दर्जाचा मल्चिंग पेपर आणि ठिबकचा वापर केल्यामुळे त्यांना मोठा फायदा होत आहे. याचजोडीला तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार वेळोवेळी खत व औषधांची मात्रा दिली. परिणामी व्हायरसपासून पिकाचा बचाव झाला. यासाठी प्रतिएकर सरासरी 70 हजार रुपयांचा खर्च केला.

सध्या आठवा तोडा झाला आहे. प्रत्येक तोड्याला चारशेच्या आसपास कॅरेट निघतात. आत्तापर्यंत बाराशे कॅरेट निघाले असून, 500 ते 2311 पर्यंत प्रतिकॅरेट बाजारभाव मिळाले आहेत. अजूनही तोडे निघणार असून, जर बाजारभाव टिकून राहिले तर उत्पन्नात भर पडेल असा विश्वास सहाणे कुटुंबियांनी व्यक्त केलाय. खरेतर कुटुंबातील सर्वच सदस्य जीवतोड मेहनत घेत असल्याने हे सुवर्ण दिवस अनुभवायला मिळत असल्याची प्रतिक्रिया निवृत्ती सहाणे यांनी दिली.

शेतीत आत्मविश्वासाच्या बळावर प्रयोग केला तर नक्कीच शाश्वत उत्पन्न काढता येते. आम्ही देखील कालचक्रानुसार कोणत्या पिकाला चांगले बाजारभाव मिळेल, याचा अंदाज घेतला. परिणाम म्हणून सध्या टोमॅटोतून भरघोस उत्पन्न घेतोय.
– ज्ञानेश्वर सहाणे (टोमॅटो उत्पादक-कुरकुटवाडी)

कोणत्याही क्षेत्रात सातत्य ठेवणे गरजेचे असते. सहाणे बंधूंनी कायमच त्यांच्या शेतीतून हे दाखवून दिलं आहे. शेतीला त्यांनी व्यावसायिक रुप दिल्यानेच मोठे यश मिळवत आहे.
– वीरेंद्र थोरात (संचालक-विश्व हायटेक नर्सरी, वीरगाव)

Visits: 233 Today: 1 Total: 2129107

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *