संगमनेरातील हेरॉईन, गांजा विक्रीच्या ठिकाणावर छापा! साप सोडून भुई धोपटण्याचा प्रकार; साडेसातशे ग्रॅमसह एकाला अटक..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोल्हार येथील गांजा वितरणाचे केंद्र बंद झाल्यानंतर त्याची जागा घेणार्‍या संगमनेरात पोलिसांनी मोठ्या कालावधीनंतर थातूरमातूर कारवाई केली आहे. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास पडलेल्या या छाप्यात पोलिसांनी ‘हक्काच्या’ आरोपीला अटक करीत त्याच्या ताब्यातून सुमारे साडेसहा हजार रुपये किंमतीचा साडेसातशे ग्रॅम गांजाही जप्त केला आहे. वरकरणी पोलिसांकडून झालेली ही कारवाई अंमलीपदार्था विरोधातील ‘मोहीम’ भासत असली तरी प्रत्यक्षात वस्तूस्थिती मात्र वेगळी आहे. त्यामुळे हा प्रकार म्हणजे ‘साप सोडून भुई धोपटण्याचा’ असल्याची चर्चाही शहरात सुरु आहे. या प्रकरणी पोलिसांनी मालदाड रोडवरील अंबादास शिंदे या सराईत अंमलीपदार्थ तस्करावर गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. आज त्याला न्यायालयासमोर हजर करुन पोलीस कोठडी मागितली जाणार असली तरीही त्यातून शहरातील मुख्य गांजा तस्कराचे नावे समोर येण्याची कोणतीही शक्यता नाही.


याबाबत संगमनेर शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदरची कारवाई मंगळवारी (ता.4) मध्यरात्रीच्या सुमारास मालदाडरोडवर करण्यात आली. शिवाजीनगरच्या अगदी तोंडावरच शिवशंभो पान सेंटर अ‍ॅण्ड कटलरी अशा गोंडस नावाने सुरु असलेल्या एका टपरीवर पोलिसांनी छापा घातला असता अंबादास शांताराम शिंदे (वय 40, रा.शिवाजीनगर) याच्या ताब्यात जवळपास 750 ग्रॅम वजनाच्या गांजाच्या छोट्या प्लॅस्टिक पिशवीत बांधलेल्या पुड्या आढळून आल्या. बाजारात या अंमलीपदार्थाची किंमत 6 हजार 750 रुपये आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल हरिश्‍चंद्र बांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी आरोपी अंबादास शिंदे याच्यावर ‘एनडीपीएस’ कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.


गेल्यावर्षी 29 मार्चरोजी याच शिवाजीनगरमध्ये पोलिसांनी केलेल्या कारवाईत प्रशांत पोपट घेगडमल (वय 26, रा.हिवरगाव पावसा, ह.मु.कासारवाडी) याच्या ताब्यातून 980 ग्रॅम वजनाचा आणि जवळपास नऊ हजार रुपये बाजारमूल्य असलेला गांजा हस्तगत झाला होता. तर त्यानंतर दोनच दिवसांत 1 एप्रिल रोजी याच परिसरातील अंबादास शांताराम शिंदे याच्या घरावर छापा घालीत अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने चार लाख 150 रुपयांच्या रोकडसह 72 हजार रुपये किंमतीची हेरॉईन (गर्दा) आणि 498 ग्रॅम वजनाचा आणि 44 हजार 980 रुपये किंमतीचा गांजा असा एकूण 5 लाख 17 हजार 180 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला होता. शहरातील अंमलीपदार्थाच्या कारवाईत आजवर इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दा कधीही सापडला नव्हता. त्यामुळे या कारवाईने शहरात खळबळ निर्माण करण्यासह तारुण्यावस्थेत वाढत चाललेली व्यसनाधिनताही ठळकपणे समोर आली होती.


मात्र त्याबाबत कोणतेही गांभीर्य पाळल्याचे दिसून आले नाही, त्यामुळे या कारवाईनंतर काही महिन्यातच आरोपी अंबादास शिंदे याची जामीनावर मुक्तता झाली आणि कारागृहातून सुटताच त्याने पुन्हा अंमलीपदार्थाच्या तस्करीत स्वतःला झोकून दिले. त्यातूनच मंगळवारी त्याच्या गोंडस नावाच्या टपरीवर छापा घालीत पोलिसांनी साडेसातशे ग्रॅम गांजा हस्तगत केला. खरेतर सदरील आरोपी गांजा आणि हेरॉईन सारख्या अंमलीपदार्थांचा किरकोळ विक्रेता असून तो विक्रीसाठी कोणाकडून अंमलीपदार्थ आणतो याचा शोध लागण्याची गरज आहे. प्रत्यक्षात मात्र ही संपूर्ण साखळी पोलिसांना माहिती असल्याने आरोपीची पोलीस कोठडी मिळूनही त्यातून फारकाही निष्पन्न होण्याची शक्यता खूप कमी आहे.


दीड-दोन दशकांपूर्वीपर्यंत राहाता तालुक्यातील कोल्हार म्हणजे जिल्ह्यातील गांजा तस्करीचे प्रमुख केंद्र म्हणून ओळखले जात. मात्र तत्कालीन जिल्हा पोलीस अधिक्षक कृष्णप्रकाश यांनी वारंवार कारवाया करुन येथील गांजा तस्करांच्या मुसक्या आवळण्यासह गांजा विक्रीच्या ठिकाणांना अक्षरशः खणत्या लावून ते उध्वस्थ केले. तेव्हापासून जिल्ह्यातील गांजा वितरणाचे केंद्र कोल्हारवरुन संगमनेरला आले आहे. कोल्हारमधील कारवाईनंतर काही वर्षांनी नगरच्या कोतवाली पोलिसांनी पहाटेच्या सुमारास एका संशयीत अलिशान वाहनावर कारवाई केली होती. त्यावेळी सीमा पंचारिया नावाने संगमनेरात कुप्रसिद्ध असलेल्या त्या ‘लेडी डॉन’सह पाचजणांना अटक होवून त्यांच्या ताब्यातून सुमारे एक कोटी रुपयांचा गांजा हस्तगत करण्यात आला होता. तेव्हापासून जिल्ह्यातील गांजा तस्करीची सगळी सूत्रं याच ‘लेडी डॉन’च्या ताब्यात असल्याचे बोलले जाते. मात्र पोलिसांसह वेगवेगळ्या यंत्रणांशी असलेल्या ‘अर्थपूर्ण’ संबंधामुळे अपवाद वगळता कोणत्याही प्रकरणाच्या चौकशीचे ओघळ तिच्यापर्यंत पोहोचू शकलेले नाहीत.


शहरालगतच्या कासारवाडीत राहणारी सीमा पंचारिया ही कुख्यात गांजातस्कर ‘लेडी डॉन’ चार वर्षांपूर्वी तत्कालीन पोलीस उपअधिक्षक राहुल मदने यांच्या जाळ्यात अडकली होती. त्यावेळी पोलिसांनी संगमनेर खुर्दमधील एका खोलीवर छापा घालीत तेथून तब्बल 47 किलो गांजासह 9 लाख 30 हजार 910 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. त्यावेळी या लेडी डॉनसह घटनास्थळावरुन पसार झालेला तिचा जोडीदार राजू चव्हाण अशा दोघांवरही पोलिसांनी ‘एनडीपीएस’ नुसार गुन्हा नोंदवला होता. 1 ऑक्टोबर 2021 रोजी झालेल्या या कारवाईनंतर आजवर पुन्हा कधीही या ‘लेडी डॉन’चे नाव चर्चेत अथवा गुन्ह्यात आले नाही आणि गांजाचे ‘हब’ बनत असलेल्या संगमनेर शहरातील कोणत्याही गांजा सेंटरवर पोलिसांनी कारवाई देखील केली नाही. अशातच आता अवघ्या वर्षभरातच शहर पोलिसांनी शिवाजीनगरमधील नेहमीच्या ‘विक्रेत्यावर’ पुन्हा छापा घातल्याने पोलिसांनी ही कारवाई चांगलीच चर्चेत आली आहे.


गेल्याकाही वर्षात संगमनेर शहरातील शाळा-कॉलेजच्या परिसरातील अनेक टपर्‍यांवर सहज गांजा उपलब्ध होवू लागल्याने विद्यार्थीदशेतील मुलांमध्ये व्यसनाधिनतेचे प्रमाणही वाढत आहे. काही शिक्षणसंस्थांच्या आसपासची हॉटेल्स, ढाबे आणि आडवळणाच्या रस्त्यांवर शाळा-कॉलेज बुडवून सिगारेटमध्ये भरलेला गांजा ओढणारी ओठांवर मिसरुडही नसलेली मुलं पाहून शहरात गांजा तस्करीचे आणि विक्रीचे मूळ किती खोलवर रुजले आहे हे लक्षात येते. सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांसह किशोरवयीन मुलांच्या पालकांनी या विषयाकडे अधिक गांभीर्याने पाहून शहरात राजरोसपणे विकल्या जाणार्‍या अशाप्रकारच्या अंमलीपदार्थांच्या केंद्रांवर कारवाईसाठी ‘सामाजिक दबाव’ निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आहे, अन्यथा काळ सोकावतो आहे.

Visits: 354 Today: 4 Total: 1108287

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *