संगमनेरात चौथ्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशन; सातशेहून अधिक स्पर्धकांचा सहभाग

नायक वृत्तसेवा, संगमनेर
महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनच्यावतीने आजपासून १९ ऑगस्टपर्यंत संगमनेरात चौथ्या राज्यस्तरीय योगासन अजिंयपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शालेय पातळीवरील ही स्पर्धा मुला-मुलींच्या स्वतंत्र प्रत्येकी दोन गटात होणार असून त्यात अजिंयपद मिळवणार्या खेळाडूंना राष्ट्रीय पातळीवर खेळण्याची संधी मिळणार आहे. या स्पर्धेत राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील योगासन खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक व व्यवस्थापक असे साडेसातशेहून अधिकजण संगमनेरात दाखल झाल्याची माहिती महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांनी दिली.

योगासनांना खेळाचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर त्याच्या प्रचार-प्रसारासाठी तालुकास्तरापासून राष्ट्रीय पातळीपर्यंतच्या योगासन स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. नुकत्याच झालेल्या खेलो इंडिया व नॅशनल गेम्स या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये देखील योगासनांचा समावेश करण्यात आला होता.त्यात महाराष्ट्राने सुवर्ण कामगिरी करताना पदकांची लयलुट केली. स्पर्धकांच्या सातत्यपूर्ण यशाने मनोबल उंचावलेल्या राज्य योगासन असोसिएशनद्वारा महाराष्ट्रातील प्रतिभावंत योगासन खेळाडूंचा शोध घेतला जात आहे. वेगवेगळ्या स्पर्धांच्या माध्यमातून त्यांची निवड केली जात आहे.

त्याअनुषंगाने संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलमध्ये आजपासून शनिवारपर्यंत (ता.१९) राज्यस्तरीय योगासन स्पर्धा भरवण्यात आल्या आहेत. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यांमधील सातशेहून अधिक स्पर्धक सहभागी झाले असून त्यांचे प्रशिक्षक व व्यवस्थापक अशा एकूण साडेसातशे जणांच्या निवासाची व्यवस्थाही ध्रुव ग्लोबलमध्ये करण्यात आली आहे. आज सायंकाळी विधान परिषदेचे सदस्य आमदार सत्यजीत तांबे यांच्या उपस्थितीत या स्पर्धेचे उद्घाटन होणार असून यावेळी राज्य योगासन असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, सचिव राजेश पवार, तांत्रिक समितीचे संचालक सतीष मोहगावकर, स्पर्धेचे संचालक महेश कुंभार, खजिनदार कुलदीप कागडे व स्पर्धा व्यवस्थापक सचिन जोशी आदी उपस्थित राहणार आहेत.

मुला-मुलींच्या सब ज्युनिअर आणि ज्युनिअर अशा दोन स्वतंत्र गटात या स्पर्धा घेण्यात येणार आहे. पारंपरिक एकल, कलात्मक एकल आणि दुहेरी व तालात्मक दुहेरी अशा चार प्रकारांमध्ये होणार्या या स्पर्धेत अजिंयपद प्राप्त करणार्या योगासन खेळाडूंना आगामी कालावधीत राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे. या तीन दिवशीय स्पर्धांसाठी राज्य असोसिएशनद्वारा ६० तज्ज्ञ पंच आणि तांत्रिक परीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. तीन दिवस चालणार्या या स्पर्धा पाहण्यासाठी अवश्य यावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
