साध्या पद्धतीच्या उत्सवातही पोलीस अधिकार्‍याची दबंगाई! पत्रकारांसह बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनाही पोलिसी धाक दाखवण्याचा प्रयत्न..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
सलग दुसर्‍या वर्षी साध्या पद्धतीने साजर्‍या झालेल्या गणेशोत्सवाची रविवारी सांगता झाली. यंदाचा उत्सवही कोणत्याही अप्रिय घटनेशिवाय साजरा झाल्याचा आनंद असतांना त्यात शहर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक निरीक्षक योगिता कोकाटे यांनी विरजन टाकण्याचा प्रयत्न झाला. शहरातील सार्वजनिक गणेश मंडळे व नागरिक प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांच्या अधीन राहूनच आपल्या लाडक्या बाप्पांना भावपूर्ण निरोप देत असताना सहाय्यक निरीक्षकांनी वर्दीचा धाक दाखवण्याचा केलेला प्रयत्न अनेकांच्या संतापाचे कारणही ठरला. त्यांच्या दबंगाईचा फटका ज्यांच्या जीवावर हा उत्सव निर्विघ्नपणे पार पडला त्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांसह पत्रकारांनाही बसला.

वेळोवेळी झालेल्या शांतता समितीच्या व प्रशासनाच्या नियोजन बैठकात विसर्जनाबाबतचा संपूर्ण आराखडा, बंदोबस्ताची आखणी व रस्ते बंद करण्याबाबतचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार श्री साईबाबा मंदिर, श्री गंगामाता मंदिर व चंद्रशेखर चौकातील साटमबाबांच्या मठाजवळ नदीपात्रात जाणारा मार्ग बंद करण्यात आला होता. या प्रत्येक ठिकाणी पोलिसांनी एका अधिकार्‍यासह पंधरा कर्मचार्‍यांची नियुक्ती केली होती. त्यानुसार साईबाबा मंदिराजवळ सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे फौजफाट्यासह तैनात होत्या. याठिकाणी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सुकन्या डॉ.जयश्री जैन आपल्या एकविरा फाऊंडेशनच्या सदस्यांसह नागरिकांनी जमा केलेल्या मूर्त्या विसर्जनासाठी नदीपात्रालगत नेण्याच्या प्रक्रीयेत कार्यरत होत्या.

प्रशासनाच्या विसर्जनपूर्व बैठकांमध्ये नदीच्या परिसरात केवळ बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचाच वावर असेल, त्यांची ओळख पटावी म्हणून त्या सर्वांनी एकाच पद्धतीचे ‘टी शर्ट’ परिधान करावे असे ठरले होते. त्यानुसार या सर्व कार्यकर्त्यांनी केशरी रंगाचे टी शर्ट परिधान केले होते, तर एकविरा फाऊंडेशनच्या सदस्यांनीही पांढर्‍या रंगाचे टी शर्ट घातले होते. विशेष म्हणजे या दोन्ही संस्थांच्या सदस्यांनी परिधान केलेल्या शर्टवर त्यांच्या संस्थेचे नाव अगदी ठळकपणे छापलेले होते हे विशेष. मात्र खाकी वर्दी म्हणजे विशेष वरदान असल्याच्या अविर्भावात असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक कोकाटे यांना त्याचा विसर पडला. त्यातही वरीष्ठ अधिकार्‍यांच्या बैठकीत एकाच रंगाचे शर्ट घालण्याचे ठरलेले असतानाही त्यांनी ‘मी म्हणेल तो नियम’ असे म्हणत आधीच्या बैठकांच्या नियोजनावरच पाणी सोडण्यास सुरुवात केली.

त्याचा पहिला फटका गेल्या तीन वर्षांपासून एकाही बुडीताची घटना होवू नये यासाठी प्रशासनाच्या खांद्याला खांदा देवून आपला जीव धोक्यात घालून नदीपात्रात उतरणार्‍या बजरंग दलाला बसला. नदीपात्राकडे ये-जा करणार्‍या अशा कार्यकर्त्यांना अडवून कोकाटे यांनी ओळखपत्र कोठे आहे? अशी विचारणा करण्यास सुरुवात केली. ओळखपत्र नसलेल्या धाकात घेण्याचे प्रकारही येथे अनेकांच्या समोर घडले. मोठ्या आवाजात बोलणे, विचारणा करणे आणि समोरच्याला ऐनकेन प्रकारे गप्प बसविणे यासाठीचा त्यांचा हा अट्टाहास त्यांच्या सोबतीला बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचार्‍यांनाही अनाकलीय ठरला. त्यामुळे नंतरच्या वेळेत या अधिकारी बाईंच्या अवाजवी धाकामुळे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या समोरुन येण्याचेच टाळले.

सामाजिक संस्था आणि प्रशासनाच्या नियोजनाची पाहणी करुन त्याबाबतचे वार्तांकन करण्यासाठी काही पत्रकार नदीकाठावर जात असताना त्यांनाही या सहाय्यक निरीक्षकांच्या दबंगाईचा सामना करावा लागला. त्यापैकी एक असलेले मंगेश सालपे साई मंदिरापासून पुढे जात असताना त्यांना अडविण्यात आले. यावेळी कोकाटे यांनी विचारणा केली असता आपण पत्रकार असल्याचे सालपे म्हणाले. त्यावर ओळखपत्राची मागणी करण्यात आल्यावर त्यांनी कंबरेला लटकवलेले भलेमोठे ओळखपत्रही त्यांना दाखवले. मात्र त्यावर या बाईंनी ‘तुम्ही सगळे पत्रकार सारखेच आहात. अजिबात सहकार्य करीत नाहीत. ओळखपत्र गळ्यातच अडकवायचे’ असे मनमानी नियम सांगायला सुरुवात केली.

त्यावर सालपे यांनी ओळखपत्र गळ्यातच अडकवायचे याबाबत काही आदेश आहेत का? अशी विचारणा केली असता अधिकारी बाई भडकल्या आणि त्यांचा अहंम जागा झाल्याने त्यांच्या आवाजाची पातळी डेजिबलमध्ये गेली. मी म्हणते तसेच करायचे, बाकीचे नाही बोलायचे असे त्या तावातावात सांगू लागल्या. हा सगळा प्रकार पाहून बाजूलाच उभ्या असलेल्या पोलीस कर्मचार्‍यांनीही कपाळाला हात लावले. मात्र त्याचा कोणताही परिणाम या बाईसाहेबांवर झाला नाही. असेच प्रकार याठिकाणी दिवसभर घडत होते अशीही चर्चा रात्री कानावर आली. खरेतर या भागात पोलिसांची भूमिका फक्त रस्ता बंद करण्याची होती, पुढील सर्व नियोजन संगमनेर नगरपालिका, एकविरा फाऊंडेशन व बजरंग दलाचे होते. त्यासाठी वेळोवेळी बैठकाही झाल्या होत्या. मात्र त्या बैठका आणि त्यात झालेल्या नियोजनाला एकप्रकारे साईमंदिराजवळ तिलांजली वाहण्याचा प्रकार या भागात वारंवार घडल्याचे वरील दोन्ही घटनांवरुन समोर आले. संबंधित पोलीस अधिकार्‍याला त्या नागरी सेवेत असल्याची समज देण्याची गरजही यानिमित्ताने प्रकर्षाने समोर आली.

Visits: 13 Today: 1 Total: 115568

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *