नोकरीचे आमिष दाखवून तब्बल बारा लाख रुपयांची फसवणूक शिर्डी पोलिसांत पाच जणांवर गुन्हा दाखल; वैद्यकीय अहवालावरुनही खेळवले


नायक वृत्तसेवा, शिर्डी
सरकारी नोकरी लावून देतो म्हणून शिर्डीत काम शोधण्यासाठी आलेल्या एका अभियंत्याची 12 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी पाच जणांवर फसवणूक केल्याचा गुन्हा शिर्डी पोलिसांत दाखल करण्यात आला आहे.

याबाबत निहाल राजेंद्र महाले (रा. शिर्डी) यांनी फिर्याद दिली आहे. गेल्या दोन वर्षापासून महाले शिर्डीमध्ये कामानिमित्त आले होते. येथे त्यांची ओळख अमोल करसनन शहा (रा. राहाता) यांच्याशी झाली होती. फिर्यादी हे बांधकाम अभियंता म्हणून शिक्षण झालेले असल्यामुळे त्यांना नोकरीची नितांत गरज होती. म्हणून ते अमोल शहा याला म्हणाले होते की, मला नोकरीची गरज आहे त्यावर अमोल शहा याने सांगितले की, मी तुम्हांला सरकारी नोकरी लावून देतो. त्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील, म्हणून शहा याने त्र्यंबकेश्वर येथील सचिन लोंढे याच्याशी फोनवर ओळख करून दिली.

त्यानंतर लोंढे याच्या बँक खात्यावर 22 ऑक्टोबर 2020 रोजी तीन लाख रुपये पाठवले होते, मात्र एक महिना उलटूनही नोकरीची कोणती शाश्वती मिळाली नाही, म्हणून त्यांच्याकडे पाठवलेले पैसे मागण्यास सुरुवात केली. त्यावर त्यांनी महाले यांच्या वडिलांच्या खात्यावर दोन लाख रुपये पाठवले व उर्वरित एक लाख रुपये नंतर देतो असे सांगितले. त्यानंतर अमोल शहा पुन्हा एक दिवस भेटण्यासाठी आला आणि म्हणाला की, मी तुमचं काम रेल्वेमध्ये करून देतो, तेव्हा त्याने विश्वासात घेऊन रेल्वेचे जॉईनिंग लेटर तुम्हाला मिळवून देतो. त्यासाठी तुम्हाला वैद्यकीय अहवाल काढणे आवश्यक आहे आणि तो मेडिकल अहवाल मुंबई येथील संदीप कोरडे काढून देतील असे सांगून त्याच्याशी फोनवर संवाद करुन दिला.

1 जानेवारी 2023 रोजी मुंबईत संदीप कोरडे यांची भेटही घालून दिली. त्यानंतर शहा आणि महाले हे पुन्हा शिर्डीत आले. 2 जानेवारी 2023 रोजी वैद्यकीय अहवालासाठी अमोल शहा याला प्रसाद शेळके, स्वप्नील कुलकर्णी, मकरंद कुलकर्णी, प्रभू बेलदार यांच्या साक्षीने एक लाख रुपये दिले. त्यानंतर अमोल शहा याच्या सांगण्यावरून संदीप कोरडेच्या खात्यावर अडीच लाख रुपये पाठवले. काही दिवसांनी अमोल शहा म्हणाला की, तुमचं काम सेंटर रेल्वेला करून देतो. मात्र त्यासाठी तुम्हाला सर्व खर्च 12 ते 15 लाख रुपये लागेल. यासाठी तुम्हाला वैद्यकीय अहवाल देणे गरजेचे आहे.

वैद्यकीय अहवाल हा तुम्हांला संदीप कोरडे यांच्याकडून मिळेल त्यासाठी त्यांना 25 जानेवारी 2023 रोजी एक लाख रुपये त्यांच्या खात्यात पाठविले आणि पुन्हा अमोल शहाने दोन लाख रुपये महाले यांच्याकडून रोख दिले, त्यानंतर अमोल शहा हा मुंबईला घेऊन गेला तिथे वैद्यकीय चाचणी झालीच नाही आणि खारघर येथे ऑर्डर निघाली आहे, असे सांगितले. जॉइनिंग होती तेव्हा अमोल शहा देखील बरोबर होता. तिथे गेल्यावर समजले की जागा भरल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे आता वैद्यकीय चाचणीसाठी दिल्लीला जावे लागेल. दिल्लीला एक लाख साठ हजार रुपये वैद्यकीय अहवालासाठी द्यावे लागतील, असे सांगितले. त्यामुळे दोघेही 8 फेब्रुवारी 2023 दिल्लीला गेले. तिथे गेल्यावर प्रसाद रोहिदास या व्यक्तीला विचारले की माझा केस पेपर काढला आहे का? तेव्हा तो म्हणाला, तू इथे बस कोणाला काही बोलू नको, आता दोन माणसं येतील, ते तुझे कागदपत्र पाहतील तुझा बीपी घेतील आणि आपल्याला वैद्यकीय अहवाल मेलवर देतील. रेल्वेला तुझा मूळ अहवाल पाठवतील.

त्यांनी काही जास्त प्रश्न विचारू नये, म्हणून आपण त्यांना पैसे दिले आहेत. नंतर वैद्यकीय चाचणी झाली आणि हॉटेलमध्ये गेले. साधारण एक महिना दिल्लीला होते. नंतर जॉइनिंगसाठी अमोल शहा याने पुन्हा दोन लाख रुपये मागितले, मात्र महाले यांनी सांगितले की, मला जॉइनिंग लेटर द्या तरच मी आपणास दोन लाख रुपये देईल. मग त्यांनी हापूर स्टेशन उत्तर प्रदेश येथे जॉइनिंग झाल्याचे पत्र दिले. त्यावर त्यांना दोन लाख रुपये रोख दिले. ते पत्र घेऊन हापूर स्टेशन येथे जॉईन होण्यासाठी गेले असता अमोल शहाने सांगितले होते की तिथे गेल्यावर एक माणूस येऊन तुम्हांला भेटेल त्याच्यासोबत जा. त्यादिवशी दिवसभर त्या स्टेशनवर थांबले. मात्र तेथे कोणीही आले नाही. त्यावर दिवसभर फोन केले, परंतु त्याने फोन उचलला नाही, यावरून लक्षात आले की आपली फसवणूक झाली आहे. शेवटी शिर्डी पोलिसांत जावून अमोल शहा (रा. राहाता), संदीप कोरडे (रा. मुंबई), सचिन लोंढे (रा. त्र्यंबकेश्वर) आणि प्रसाद रोहिदास व इतर असे एकूण पाच जणांनी फसवणूक केल्याची तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी वेळोवेळी ऑनलाईन सात लाख पन्नास हजार रुपये तर सहा लाख साठ हजार रुपये रोख असे मिळून 14 लाख 10 हजार रुपये घेतले. त्यातील दोन लाख परत देऊन 12 लाख 10 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *