संगमनेरच्या ‘भगवा मोर्चा’चे आयोजक अडचणीत! चिथावणी दिल्याचा आरोप; दोन समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून संगमनेरात निघालेला हिंदू समाजाचा अतिविराट भगवा मोर्चा आता अडचणीत आला आहे. या मोर्चाच्या समोरापानंतर माघारी जाणार्‍या काहींनी समनापूरात दगडफेक व मारहाण केल्याचा प्रकार घडला होता, त्याप्रकरणी स्वतंत्र गुन्हा दाखल होवून 17 जणांना अटक व त्यांची जामीनावर सुटका झाल्यानंतर आता शहर पोलिसांनी या घटनेला मोर्चातील चिथावणीखोर भाषणबाजी कारणीभूत असल्याचा निष्कर्ष काढला आहे. या प्रकरणी प्रक्षोभक वक्तव्य केल्याच्या ठपका ठेवून सुदर्शन वृत्तवाहिनीचे संपादक सुरेश चव्हाणके यांच्यासह स्थानिक बजरंग दलाच्या दोघा पदाधिकार्‍यांवर जातीय तेढ निर्माण केल्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वृत्ताने भगवा मोर्चानंतर उठलेले चर्चेचे वादळ पुन्हा एकदा घोंगावू लागले असून हिंदुत्त्ववादी संघटना पुन्हा एकवटू लागल्या आहेत.


गेल्या 28 मे रोजी जोर्वेनाक्यावर सुमारे दोनशे जणांच्या सशस्त्र जमावाकडून आठ तरुणांना मारहाण झाल्याच्या निषेधार्थ संगमनेरातील हिंदुत्त्ववादी संघटनांनी 6 जून रोजी संगमनेरात भगवा मोर्चा आयोजित केला होता. या मोर्चाला परवानगी देतांना पोलिसांनी वेळेच्या बंधनासह काही अटी व शर्थीही घातल्या होत्या. शहरातील संवेदनशील भागांसह प्रमुख मार्गावरुन निघालेल्या आणि हजारोंची अभूतपूर्व गर्दी असलेला हा मोर्चा अतिशय शांततेत आणि नियोजनपूर्ण पद्धतीने संपला. मात्र मोर्चातून घरी परतणार्‍या एका टोळक्याने जाताजाता समनापूरात अल्पसंख्याक समुदायातील काही घरांवर दगडफेक करीत दोघा वृद्धांना मारहाण केल्याने शांततेत संपलेल्या मोर्चाला गालबोट लागले.


या प्रकरणी त्याच दिवशी पोलिसांनी 20 ते 25 जणांविरोधात गुन्हा दाखल करुन त्यातील 17 जणांची ओळख पटवित त्यांना अटकही केली व दोन दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर त्यांची जामीनावर सुटकाही झाली. या घटनेला आता जवळपास 15 दिवसांचा कालावधी लोटलेला असतांना शहर पोलिसांनी समनापुरातील घटनेमागे मोर्चातील लोकांना देण्यात आलेली चिथावणीच कारणीभूत असल्याचा निष्कर्ष काढला असून अशाप्रकारे चिथावणीखोर भाषण करुन तरुणांची माथी भडकावण्याचा प्रयत्न केल्यावरुन कायदेशीर कारवाईचे पाऊल उचलले आहे.


याबाबत पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब यादव यांनी फिर्याद दाखल केली असून त्यात 6 जूनरोजीच्या मोर्चाला परवानगी देतांना आयोजकांना शांतता व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी काही अटींच्या अधीन राहून परवानगी दिल्याचे म्हंटले आहे. त्यासोबतच चिथावणीखोर भाषणांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांची आठवणही करुन देण्यात आली होती. मात्र आयोजकांनी या गोष्टीचे उल्लंघन केले असून समारोपाच्या वेळी सुरेश चव्हाणके यांनी अतिशय द्वेषपूर्ण व चिथावणी देणारे भाषण केल्याने समनापूरातील प्रकार घडल्याचे नमूद करण्यात आले आहे.


त्यावरुन पोलिसांनी चिथावणीखोर भाषण केल्याचा ठपका ठेवून सुदर्शन वृत्तवाहिनीचे संपादक सुरेश चव्हाणके (रा.नोएडा), बजरंग दलाचे संयोजक विशाल वाकचौरे व योगेश सूर्यवंशी या तिघांवर जातीय तेढ निर्माण केल्याप्रकरणी भारतीय दंडसंहितेच्या कलम 153 (अ) सह 505 (2), 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या वृत्ताने संगमनेर तालुक्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून भगवा मोर्चातून निघालेले चर्चेचे वादळ पुन्हा एकदा घोंघावू लागले आहे. या विरोधात आता शहरातील हिंदुत्त्ववादी संघटना पुन्हा आक्रमक होवू लागल्या असून पुढील रणनीती ठरविण्यासाठी बैठकांचे सत्र सुरु झाले आहे.

Visits: 375 Today: 4 Total: 1107464

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *