खळीची सूनबाई जिद्दीच्या बळावर झाली पोलीस उपनिरीक्षक अरुणा कांगणे-सानप यांच्या माहेरासह सासरी आनंदोत्सव साजरा

नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील खळी हे सासर असलेल्या व तालुक्यातील तिगावची कन्या अरुणा अनिल कांगणे – सानप यांनी महिला दिनी जाहीर झालेल्या महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत 340 पैकी 235 गुण मिळवून राज्यात 11 व्या क्रमांकाने उत्तीर्ण होत पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आहे. त्यामुळे त्यांच्या सासरी व माहेरी आनंदोत्सव साजरा होत असल्याची भावना पती अनिल कांगणे यांनी व्यक्त केली.

अरुणा कांगणे यांना 6 वर्षांचा गोड मुलगा आहे. संगमनेर तालुक्यातील तिगाव माहेर असलेल्या शेतकरी कोडींबा सानप यांच्या कन्या तर शेडगाव हे आजोळ असून येथील कैलास नागरे यांच्या त्या भाची आहेत. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण हे तिगाव व शेडगाव याठिकाणी झाल्यानतंर त्यानी डीएडची पदवी संपादित केली. लग्न झाल्यानतंर पती हे शिक्षक असल्याने त्यानी शिक्षणाचे महत्व ओळखले होते. नोकरीनिमित्त ते सध्या नाशिक येथे वास्तव्यास आहेत. अरुणा कांगणे यांनी लग्नानंतर बी. ए. पूर्ण केले व एच. एस. सी. बोर्डाच्या नाशिक विभागात क्लार्क पदावर सध्या त्या कार्यरत आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोग्यामार्फत प्रशासकीय सेवेत जाण्याची त्यांची इच्छा होती. त्याला पती अनिल कांगणे यांनी साथ देण्याचा निर्णय घेतला. यामुळे लग्न झाल्यानंतर सुरु असलेल्या शिक्षणावर नातेवाईक व मित्र परिवारातून टीकाही झाली. वेळोवेळी मान अपमानही झाला. परंतु, यातून खचून न जाता अरुणा व अनिल कांगणे हे आपल्या निर्णयाशी ठाम राहिल्यामुळे हे यश त्यांच्या पदरात पडले आहे.

पत्नीच्या स्वप्नांना उभारी देण्यासाठी 2019 च्या आधी आपल्या तीन वर्षांच्या मुलाची संपूर्ण जबाबदारी आपल्यावर घेत आई व वडील या दोन्ही भूमिका पेलण्यास अनिल कांगणे यानी सुरवात केली. त्यामुळे जव्हार या आदिवासी भागातील यंशवतराव मुकणे सार्वजनिक वाचणालयात अरुणा यांनी 2 वर्ष अभ्यास करुन 2019 साली दिलेल्या लोकसेवा आयोगाच्या लेखी परिक्षेत 117 गुण प्राप्त केले. यामुळे 2021 मध्ये त्यांना मैदानी परीक्षेला उपस्थित राहण्याच्या सूचना मिळाल्या. नाशिक सारख्या शहरी भागात मैदानी सराव कसा करायचा असा प्रश्न अरुणा यांच्यापुढे उभा राहिला असता तिगाव येथील त्यांचे बंधू अमोल सानप यांनी आपल्या बहिणीच्या मैदानी सरावासाठी 1 एकर क्षेत्र पडीक ठेऊन मैदान तयार करुन दिले. पती व भावाच्या मदतीने अरुणा यांनी कसून मैदानी सराव करत झालेल्या मैदानी परिक्षेत 94 गुण प्राप्त केले. तर मुलाखतीतही त्यांनी बाजी मारल्यामुळे लोकसेवा आयोगाकडून 8 मार्च या जागतिक महिला दिनी जाहीर झालेल्या यादीत त्यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याची माहिती कळताच पती अनिल कांगणे याना आनंदाश्रू लपवता आले नाहीत.

महिलाचे प्रश्न हे महिलाच चांगल्या पद्धतीने मांडू व सोडवू शकतात. त्यामुळे प्रशासकीय सेवेसह सर्व क्षेत्रांत मुली व महिलांनी आले पाहिजे. आज मी जे यश मिळवले त्यामध्ये माझे पती, सासू, सासरे, आई, वडील व भाऊ यांचा सिंहाचा वाटा असून भविष्यात ‘क्लास वन’ अधिकारी होण्याचे माझे स्वप्न आहे.
– अरुणा कांगणे, नूतन पोलीस उपनिरीक्षक
