टपाल विभागाच्यावतीने खाते उघडण्यासाठी रॅपिड मोहीम
नायक वृत्तसेवा, संगमनेर
टपाल विभागावर ग्राहकांचा असलेला विश्वास आणि गुंतवणुकीला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन पुणे क्षेत्र टपाल विभागातर्फे येत्या 26 ते 30 जुलै दरम्यान नवीन खाते उघडण्याची रॅपिड मोहीम आयोजित केली आहे. या काळात अधिकाधिक नागरिकांना गुंतवणुकीसाठी टपाल विभागातर्फे प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
लॉकडाऊनमुळे गेल्या वर्षभरात अनेकांचे व्यवहार ठप्प असताना पुणे टपाल विभागाला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. चालू आर्थिक वर्षात 1 एप्रिल ते 20 जुलै या कालावधीत पुणे विभागात विविध प्रकारांतील 1 लाख 44 हजार 204 नवीन खाती उघडण्यात आली आहेत. यात प्रामुख्याने सुकन्या समृद्धी योजना भविष्य निर्वाह निधी योजना (पीपीएफ) तसेच आवर्ती जमा योजना (आरडी) या योजना ग्राहकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. लोकांचा टपाल विभागातील गुंतवणुकीसाठी वाढलेला ओघ लक्षात घेऊन पुणे क्षेत्रीय कार्यालयाने पुणे, सोलापूर, अहमदनगर आणि सातारा जिल्ह्यातील कार्यालयातील टपाल कार्यालयात ग्राहकांच्या सोयीसाठी 26 ते 30 जुलै दरम्यान नवीन खाते उघडण्याची मोहीम सुरू केली आहे. नागरिकांनी या मोहिमेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि स्वकष्टाची कमाई टपाल विभागात गुंतवणूक करून सुरक्षित करावी असे आवाहन संगमनेर टपाल कार्यालयातील सहाय्यक अधीक्षक संतोष जोशी, उपडाकपाल टी. बी. शिंदे, कविता क्षीरसागर यांनी केले आहे.