गर्दणी शिवारातील डोंगरावर मित्रानेच केला मित्राचा खून अल्पवयीन आरोपीस घेतले ताब्यात; कडक शासनासाठी मोर्चा

नायक वृत्तसेवा, अकोले
मित्रानेच मित्राला गाडीवर बसवून अकोले शहाजवळील गर्दणीच्या डोंगरावर नेऊन लोखंडी रॉडने डोक्यात मारून खून केल्याची घटना घडली आहे. अशरफ अतीक शेख (17 वर्षे 6 महिने, रा.शाहूनगर, अकोले) असे मयत तरुणाचे नाव आहे. मारेकरीही अल्पवयीन असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान वाढदिवशी फोटो काढण्यावरून या दोघांत वाद झाला होता. त्याचा राग मनात धरून हा खून केल्याची कबुली आरोपीने दिली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

याबाबत समजलेल्या माहितीनुसार, रविवारी अतीक शेख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा अल्पवयीन मुलगा अशरफ यास रविवारी (ता.18) दुपारी 12.30 वाजेच्या दरम्यान फिर्यादीच्या घरातून कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी फूस लावून पळवून नेले. त्यावरून अकोले पोलिसांनी रात्री गुरनं.396/2023 भादंवि कलम 363 प्रमाणे गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला होता. यावेळी समजलेल्या माहितीनुसार पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज तपासले असता रविवारी दुपारी अशरफला एक अल्पवयीन युवक गाडीवर गर्दणीच्या दिशेने घेऊन जात असल्याची माहिती पुढे आली. त्यानुसार सोमवारी सकाळी पोलिसांनी संशयावरून संबंधित युवकास ताब्यात घेतले.

पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने पोलिसांना गर्दणीच्या डोंगरावर नेऊन तिथेच मित्र अशरफचा डोक्यात रॉड मारून खून केला असल्याचे सांगितले. वाढदिवशी फोटो काढण्यावरून या दोघांत शाब्दिक चकमक झाली होती. त्या रागातून हा खून केल्याची कबुली आरोपीने दिली. दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे हे दुपारीपासूनच तळ ठोकून होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी केली. आरोपीने कबुली दिली असली तरी अन्य बाजूनेही तपास केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. या मारेकर्यास त्वरीत अटक व्हावी व त्याच्यावर कडक शासन व्हावे या मागणीसाठी अकोले पोलीस ठाण्यात मोर्चा नेत अकोले मुस्लिम समाजाने पोलीस उपविभागीय अधिकार्यांना निवेदन दिले. रात्री उशिरा मयत युवकावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता.
