पद्मश्री राहीबाई पोपेरेंकडून बीज राखीची अनोखी भेट
नायक वृत्तसेवा, अकोले
‘सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, ओवाळीते रे भाऊराया, वेड्या बहिणीची रे वेडी माया!’ या मराठी गीतातील सुंदर ओळींमधून बहीण-भावाच्या नात्याची आपुलकी आणि माया आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. अगदी या गीताला शोभेल असेच अकोले तालुक्यातील कोंभाळणे येथील पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी आपल्या भावासाठी म्हणजेच चंद्रकांत पाटील यांच्यासाठी बीज राखी बनवून एक अनोखी व जगावेगळी भेट दिली आहे.
भात, नागली, वरई, काकडी, भोपळा यांसारख्या अनेक प्रकारच्या गावरान बियांचा वापर करून त्यांनी या राख्या स्वतःच्या हाताने बनविल्या आहेत. चंद्रकांत पाटील यांना बंधू मानलेल्या पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी आजपर्यंत बीज बँकेच्या रूपाने महाराष्ट्रातील हजारो शेतकर्यांना आपल्या विशेष प्रेमाने व आदराने भाऊ बनवून घेतले आहे. त्यांच्या वात्सल्य आणि प्रेमापोटी हजारो शेतकरी त्यांना आपली बहीण मानतात. या शेतकर्यांच्या प्रेमापोटी व त्यांचा मनस्वी आदर राखण्यासाठी त्यांनी या बीज राख्यांची निर्मिती केली आहे. चंद्रकांत पाटील राहीबाई यांना आपल्या भगिनी मानतात व राहीबाई सुद्धा त्यांना तेवढेच आदराचे स्थान देतात हे सर्वश्रृत आहे. आपल्या या प्रेमळ भावासाठी त्यांनी बीज राख्यांची विशेष मोहीम राबवली आहे. त्याचप्रमाणे देशाच्या सीमेवर लढणार्या सैनिकांप्रती प्रेम आणि आदर भावना मनामध्ये ठेवून ‘एक धागा राष्ट्रबांधणीचा’ या विचारांना पुढे नेण्यासाठी त्यांनी या राख्या बनविल्याचे सांगितले आहे. बीज राख्यांची निर्मिती करून त्यांनी करत असलेल्या कार्याप्रती आपण किती एकनिष्ठ आणि एकरूप आहोत हे दाखवून दिले आहे. कुठलेही काम निष्ठेने केल्यास तेच काम आपल्याला सर्वोच्च स्थानी नेत असते हेच वेळोवेळी राहीबाईंच्या उदाहरणातून समोर आले आहे. राखी पौर्णिमा या सणानिमित्त त्यांनी सर्व देश बांधवांना बीज राखीच्या रूपाने अनोखी भेट व शुभेच्छा दिल्या आहेत.