कोल्हे साहेबांचा वारसा घेऊन मी निवडणुकीच्या रिंगणात : कोल्हे गोंडेगाव येथे श्री गणेश साखर कारखाना निवडणुकीनिमित्त प्रचार बैठक


नायक वृत्तसेवा, राहाता
‘सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे यांचे गणेश कारखान्यावर आणि गणेश परिसरावर विशेष प्रेम होते. त्यांच्या नेतृत्वाखाली गणेश कारखान्याने सुवर्णकाळ अनुभवलेला आहे, कोल्हे साहेबांचा हा वारसा घेऊनच मी या निवडणुकीच्या रिंगणात असल्याचे,’ सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी स्पष्ट केले.

श्री गणेश सहकारी साखर कारखाना निवडणुकीत श्री गणेश परिवर्तन मंडळाच्यावतीने युवा नेते विवेक कोल्हे यांनी गोंडेगाव येथे प्रचार बैठक घेतली. बैठकीत बोलताना त्यांनी या निवडणुकी संदर्भातील आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, सचिन गुजर, गणेशचे माजी उपाध्यक्ष शिवाजीराव लाहरे, सुरेश थोरात आदिंसह बहुसंख्य सभासद, कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

कोल्हे म्हणाले, अत्यंत संघर्षाच्या काळात कोल्हे साहेबांनी गणेश कारखाना चालवला. तब्बल 38 वर्ष त्यांनी कारखान्याचे यशस्वी नेतृत्व केले. त्यामुळे सभासद, शेतकरी आणि कामगारांमध्ये कोल्हे साहेबांबद्दल प्रचंड आदर आणि श्रद्धा आहे. कोल्हे साहेबांचा नातू म्हणून त्यांचा हा वारसा घेऊनच मी या निवडणुकीच्या रिंगणात आहे. गणेश परिसरात अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांना कोल्हे साहेबांनी ताकद दिली. त्या सर्वच कार्यकर्त्यांनी या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा मला आग्रह धरला. त्यांचा आग्रह आम्ही मोडू शकलो नाही. माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या सोबत ही निवडणूक लढवावी अशी भूमिका कार्यकर्त्यांनीच मांडली. महाराष्ट्रात सहकारात कधीच राजकारण आलेले नाही. त्यामुळे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एकत्र आलो, आम्ही गणेश सक्षमपणे चालवू, जितका संगमनेर आणि संजीवनी आमच्यासाठी महत्त्वाचा तितकाच गणेशही महत्त्वाचा असेल, अशी ग्वाही या बैठकांमधून विवेक कोल्हे यांनी सभासद आणि कामगारांना दिली.

करण ससाणे म्हणाले, गणेश कारखान्याच्या चांगल्या भविष्यासाठी थोरात आणि कोल्हे ही ब्रॅण्डेड युती आहे, माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी राज्याला आदर्श ठरतील अशाप्रकारे सहकारी संस्था चालवत आहेत. त्यांचे नेतृत्व संयमी, निष्कलंक आणि प्रामाणिक आहे. त्यांनी राजकारण करताना कायम सभासदांच्या आणि शेतकर्‍यांच्या हिताला प्राधान्य दिले आहे. विवेक कोल्हे यांनी अत्यंत कमी वयात आपल्या कामाची चुणूक दाखवून दिली आहे, त्यामुळे मेहनती आणि अभ्यासू नेतृत्व श्री गणेश परिवर्तन मंडळाला लाभलेले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली गणेशचा भविष्यकाळ उज्ज्वल असेल अशी मला खात्री आहे.

Visits: 179 Today: 1 Total: 1789553

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *