राजूरच्या सरपंच पुष्पा निगळे यांचे पद अबाधित जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाला विभागीय आयुक्तांची स्थगिती


नायक वृत्तसेवा, राजूर
अकोले तालुक्यातील राजूर ग्रामंचायतच्या लोकनियुक्त सरपंचांसह एका सदस्याचे पद रद्द केल्याच्या जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशास नाशिक विभागीय आयुक्तांनी स्थगिती दिली आहे.

लोकनियुक्त सरपंच पुष्पा निगळे या निवडून आल्यानंतर त्यांच्या विरोधात अतिक्रमणाबाबत माजी सरपंच गणपत देशमुख यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार केली होती. तर, कुणाल नवाळी यांनी ग्रामपंचायत सदस्य ओंकार नवाळी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारींची दखल घेत चौकशी करून जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी ५ सप्टेंबर रोजी सरपंच पुष्पा निगळे यांचे सरपंचपद रद्द करण्याबाबतचा निकाल दिला होता. दोघांनाही नाशिक येथील विभागीय आयुक्त यांच्याकडे पंधरा दिवसांत अपील करण्याची परवानगी जिल्हाधिकार्‍यांनी दिली होती.

यानुसार सरपंच पुष्पा निगळे व सदस्य नवाळी यांनी १२ सप्टेंबर रोजी नाशिक येथील विभागीय आयुक्त यांच्याकडे अपील केले होते. यानुसार विभागीय आयुक्तांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, अपील अर्जासोबत दाखल पंचायत समिती गटविकास अधिकार्‍यांचा अहवाल पाहता वादांकित मिळकतीस विस्तार अधिकारी व उपअभियंता यांनी भेट दिली आहे. राजूर गावचा या निर्णयाविरोधात भूमापन सर्व्हे झालेला आहे. मात्र, अभिलेख खात्याकडून स्थळनिरीक्षण व मोजणी केल्यानंतरच अतिक्रमण असल्याबाबत स्पष्ट होईल, असा चौकशी अहवाल जिल्हाधिकार्‍यांना सादर केलेला आहे. त्यामुळे अपिलार्थीचे अतिक्रमण निर्विवादपणे सिद्ध झाल्याचे प्रथमदर्शनी आढळून येत नाही. त्यामुळे अपिलार्थी या सरपंच पदावरून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधी असून अशा महत्त्वाच्या पदावरील व्यक्तीस तत्काळ पदावरून काम करण्यापासून परावृत्त करणे न्यायोचित होणार नाही. सदर अपिलात दोन्ही पक्षकारांचे युक्तिवाद, कनिष्ठ न्यायालयाची मूळ संचिका इत्यादींचे सविस्तर अध्ययन करून गुणवत्तेवर अंतिम निर्णय घेण्यात येईल असा निर्णय दिला. तसेच सदस्य ओंकार नवाळी यांचे सदस्यपद रद्द करण्यात आल्याच्या आदेशासही स्थगिती देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *