मुलगी झाली हो! आश्वी खुर्द येथे मुलीच्या जन्माचे अनोखे स्वागत यादव कुटुंबियानी केलेल्या कृतीने ग्रामस्थांसह नातेवाईक भारावले


नायक वृत्तसेवा, संगमनेर
स्त्री-पुरुष समानतेच्या कितीही गप्पा मारल्या तरी आजही जन्माला येणार्‍या मुलीचे व मुलाचे स्वागत शहरी व ग्रामीण भागांत वेगवेगळ्या पद्धतीने होते हे नाकारता येणार नाही. या परिस्थितीवर मात करत संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील यादव कुटुंबियांनी आपल्या घरात जन्माला आलेल्या मुलीच्या जन्माचे स्वागत जल्लोषात करत सुखद धक्का दिला. यावेळी आपल्या कन्यारत्नाचे फटाक्यांच्या आतिषबाजीत मिरवणूक काढून धूमधडाक्यात स्वागत केल्यामुळे उपस्थित ग्रामस्थ व नातेवाईक भारावून गेले होते.

मुलगी झाली म्हणून नाराज होणारा वर्ग आता खेड्यात सुद्धा राहिलेला नाही. आश्वी खुर्द येथील प्रवरा सहकारी बँकेत अधिकारी असलेले जगन्नाथ यादव यांचा मुलगा प. पु. पुंजाई माता ट्रस्टचे सदस्य जयंत यादव व कोमल जयंत यादव हे दोघेही उच्चशिक्षित असून त्यांना नुकतेच कन्यारत्न प्राप्त झाले. त्यामुळे अतिआनंद झालेल्या यादव कुटुंबाने स्त्री जन्माचे अनोख्या पद्धतीने स्वागत करताना रांगोळ्याच्या पायघड्या, औक्षण व मिठाईचे वाटप करुन राजेशाही थाटात स्वागत केल्याने ग्रामस्थांसह नातेवाईक व मित्रपरिवाराचेही डोळे दिपून गेले होते. मुलगा-मुलगी असा भेद न करता समाजात एक चांगला संदेश देण्याचे काम यानिमित्ताने आजी विजया यादव, हेमलता यादव, पंजी बेबीताई यादव, आत्या जयश्री सावंत, राजेंद्र यादव, उज्ज्वला यादव, साक्षी वाणी, वैष्णवी वाणी, सविता बिडवे, मीना लकारे, अश्विनी तक्ते, नम्रता बागुल, दत्तात्रय यादव, महेंद्र सावंत, महेश यादव, योगेश यादव, हर्षद बागुल, श्रीकांत तक्ते आदिंसह यादव कुटुंबातील सदस्यांनी केले आहे.

यावेळी आपल्या लेकीचा गृहप्रवेश करताना मुलीची पावले कुंकवाच्या पाण्यात बुडवून यादव कुटुंबाने घरात आगमन केले. आजोबा जगन्नाथ यादव हे प्रवरा सहकारी बँकेत कार्यरत असले तरी त्यांच्यातील अजोबाने आपल्यातील कणखर स्वभावाला बाजूला ठेवून आपल्या नातीच्या आगमनावेळी फुलांचा वर्षाव करत स्वागत केल्याने तेथे उभ्या असलेल्या प्रत्येकाचे डोळे आपोआप पाणावले होते.

स्त्री-पुरुष जन्मदरात कमालीची तफावत निर्माण झाली आहे. परिणामी, आज लग्नाला मुली मिळत नाही. आम्ही भाग्यवान आहोत की आमच्या घरी लक्ष्मी आली. तिचे स्वागत करण्याचे भाग्य आम्हांला लाभले. पुरुष करतात ती सर्व कामे स्त्रिया काकणभर सरसपणे करतात. मुलगा किंवा मुलगी असा भेद करण्यापेक्षा ते आपले मूल आहे हे लक्षात घेऊन वाढवायला हवे. त्याला उच्च शिक्षण, चांगले आरोग्य व चांगले भविष्य देण्याचा नेटाने प्रयत्न प्रत्येक कुटुंबातून झाल्यास भविष्यात मुलीच्या कार्यकर्तृत्वातून त्या कुटुंबाला समाजात वेगळी ओळख मिळाल्याशिवाय राहणार नाही.
– जगन्नाथ यादव (आजोबा)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *