शेतकर्‍यांच्या मुलांनी बनविले बहुउपयोगी पेरणी यंत्र कोपरगावच्या संजीवनीमधील प्रकल्पाला राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम क्रमांक


नायक वृत्तसेवा, कोपरगाव
शेतकर्‍यांना पेरणी करताना येणार्‍या अडचणी लक्षात घेत कोपरगावमधील संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणार्‍या विद्यार्थ्यांनी शेतकर्‍यांसाठी बहुउपयोगी पेरणी यंत्र बनवले आहे. या यंत्राला देशपातळीवर झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला असून, मजूर मिळत नसताना आणि वेळ वाचविण्यासाठी या यंत्राचा मोठा उपयोग भविष्यात बळीराजाला होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

देशातील अभियांत्रिकी महाविद्यालये आणि कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शेतीपूरक तयार केलेल्या प्रकल्पांची स्पर्धा नुकतीच सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनिअर्स (एसई) या जागतिक संस्थेच्या भारतातील एक्सपर्ट इंडिया संस्थेमार्फत राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात घेण्यात आली. यात कोपरगावमधील संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शेतकरी कुटुंबातील असणार्‍या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या स्वयंचलित बहुउपयोगी रोप पेरणी यंत्राने अव्वल स्थान पटकावून देश पातळीवर यश मिळवले आहे.

दुसर्‍या, तिसर्‍या वर्गात शिकणार्‍या 25 जणांच्या चमूने हा प्रकल्प पूर्ण केला असून एकाचवेळी टोमॅटो, मिरची, वांगी यांसह विविध रोपांसाठी दोन सर्‍या पाडून त्या सर्‍यांच्या मधील भरवशावर रोपांची लागवड होणार आहे. याचबरोबर रोपाभोवती मल्चिंग पेपर अंथरत रोपाच्या शेजारून ठिबक सिंचनाची नळीही पसरली जाऊ शकते, अशी माहिती तुषार घुमरे याने दिली. सदर यंत्र बनविण्यासाठी सात महिन्यांची मेहनत घेतली आहे. यासाठी जवळपास 65 हजार रुपये खर्च आला आहे. शेतकर्‍यांची गरज लक्षात घेऊन सर्व्हे करून हे यंत्र तयार केलं आहे. देशभरातील 28 संघ अंतिम फेरीत आले होते. त्यात शेवटच्या फेरीत 15 संघात झालेल्या स्पर्धेत संजीवनीला यश मिळालं असल्याच शिक्षक इमरान सय्यद यांनी सांगितलं. तर माझे आईवडील शेतकरी असून आमची 25 एकर शेती करताना मजूर मिळत नव्हते. त्यामुळे आज यंत्र बनविल्यानंतर आम्ही शेतकर्‍यांसाठी काही तरी केलं, हे सांगायला अभिमान वाटतोय, अशी प्रतिक्रिया ईश्वरी शिंदे या मुलीने दिली आहे.

वेळेसह पैशांचीही बचत..
सदर प्रकल्प करताना विद्यार्थ्यांनी स्वतः कष्ट घेतले असून प्रॅक्टिकल आणि थेरॉटिकल याचा मेळ म्हणजे प्रकल्प असल्याची भावना संजीवनी समूहाचे संचालक नितीन कोल्हे यांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे हे यंत्र ट्रॅक्टरला लावून ओढता येणार असून एक एकर जमिनीत पारंपरिक पद्धतीने लागवड करायची झाल्यास सुमारे 10 हजार रुपये इतका खर्च येतो. एक ते दीड दिवस खर्च होतो. या यंत्रामुळे वेळेची बचत तर होईलच, मात्र एकाचवेळी अनेक कामे होणार असल्याने पैशांची सुद्धा बचत होईल हे मात्र नक्की.

Visits: 153 Today: 2 Total: 1109017

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *