बाळासाहेब देशमानेंनी जीवनात धर्मसूत्राचे तंतोतंत पालन केले ः डॉ.लहवितकर स्वदेश उद्योग समूहाचे संस्थापक बाळासाहेब देशमानेंचे अभीष्टचिंतन उत्साहात
नायक वृत्तसेवा, संगमनेर
आपल्याला आयुष्यात काय करायचे हे प्रत्येकाने अगोदरच ठरवावे; हे स्वदेश उद्योग समूहाचे संस्थापक बाळासाहेब देशमाने यांनी अनुकरले असून धर्मसूत्राचे तंतोतंत पालन करुन आनंदी जीवन जगण्याबरोबर दुसर्यांनाही आनंदी देण्याचे काम करत असल्याचे गौरवोद्गार आचार्य डॉ.रामकृष्णदास लहवितकर यांनी काढले.
स्वदेश उद्योग समूहाचे संस्थापक बाळासाहेब देशमाने यांचा अभीष्टचिंतन सोहळा मालपाणी हेल्थ क्लब येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी शुभाशीर्वाद देताना डॉक्टर लहवितकर बोलत होते. यावेळी मालपाणी उद्योग समूहाचे संचालक मनीष मालपाणी, जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी स्वदेश व मालपाणी उद्योग समूहाकडून बाळासाहेेब देशमाने यांचा आई-वडिलांसह सपत्नीक सत्कार करण्यात आला.
यावेळी पुढे बोलताना आचार्य डॉ.लहवितकर म्हणाले, स्वदेश उद्योग समूहाचे संस्थापक बाळासाहेब देशमाने यांनी आपल्या उद्योग क्षेत्राबरोबर सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रातही मोठे योगदान दिले आहे. त्यामुळे त्यांच्या जीवन संघर्षावर एक ग्रंथ होऊ शकतो, तो शब्दबद्ध झाला पाहिजे असे त्यांचे काम आहे. विशेष म्हणजे तो ग्रंथ लिहिण्याचा मी प्रयत्न करेल. माणूस नुसता धनवान असून उपयोग नाही तर तो दानशूर सुद्धा असावा. दानशूरांचे दायित्व हे देशमाने यांच्याकडे असल्याचे डॉ.लहवितकर यांनी आवर्जून नमूद केले.
मालपाणी उद्योग समूहाचे संचालक मनीष मालपाणी म्हणाले, बाळासाहेब देशमाने यांनी स्वदेशच्या माध्यमातून अनेकांना स्वतःच्या पायावर उभे केले. स्वकर्तृत्वाने अनेक माणसे घडविली असून, आपल्याला पैसे मिळाले नाही तरी चालेल. पण जमीन खरेदी-विक्रीचा व्यवहार चोख होवून त्यातून दुसर्याला पैसे मिळावे असा त्यांचा कायम प्रयत्न राहिला आहे. जिद्द, चिकाटी आणि प्रमाणिकपणा असल्यामुळे ते जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवसायात यशस्वी झाले असल्याचे मालपाणी यांनी शेवटी शब्दांतून गौरविले.
सत्काराला उत्तर देताना बाळासाहेब देशमाने म्हणाले, वाढदिवस साजरा करणे हे मला अजिबात आवडत नाही. प्रत्येक वर्षी मी वाढदिवसाच्या दिवशी बाहेरगावी असतो आणि एखादा व्यवहार पूर्ण करून वाढदिवस साजरा करतो. व्यवसायात अनेकांनी माझे पाय ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र कधीच मी कुणाबद्दल राग न ठेवता मार्गक्रमण करत राहिलो. माझ्या यशात मालपाणी परिवाराचे योगदान सर्वाधिक आहे. मागील काळात मी कधीच चुकीचे काम केले आणि येथून पुढील काळातही चुकीचे काम करणार नसल्याचा विश्वास व्यक्त केला. याप्रसंगी उद्योजक भाऊसाहेब डेरे, विनीत गुप्ता, ज्ञानेश्वर लहाने, ओंकार भंडारी, थोरात कारखान्याचे संचालक अनिल काळे, रमेश गुंजाळ, दादासाहेब कुटे, अभिजीत ढोले, सचिन दिघे, तळेगावचे सरपंच बाबासाहेब कांदळकर, धांदरफळचे सरपंच भानुदास शेटे, नामदेव गुंजाळ, नवनाथ देशमाने, मच्छिंद्र अरगडे, कल्पेश मेहता, योगेश देशमुख, गणेश शेळके, सत्यम वारे यांनी मनोगते व्यक्त केली. सूत्रसंचालन स्वदेश उद्योग समूहाचे जनसंपर्क अधिकारी दत्ता कासार यांनी करून आभार मानले.