शुक्रवारच्या पार्श्‍वभूमीवर पोलीस सतर्क! राज्य गुप्तवार्ता विभाग अ‍ॅक्टिव्ह मोडवर; बंदोबस्तही वाढणार..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
मंगळवारी संगमनेरात झालेला सकल हिंदू समाजाचा अभूतपूर्व मोर्चा, त्यानंतर समनापूर आणि संगमनेरमध्ये झालेले हिंसाचाराचे किरकोळ प्रकार लक्षात घेवून पोलिसांचा गुप्तवार्ता विभाग सक्रीय झाला आहे. यासर्व पार्श्‍वभूमीवर उद्या (ता.9) शुक्रवारच्या जुम्म्याची नमाज असल्याने पोलीस सतर्क झाले असून कोणतीही अप्रिय घटना टाळण्यासाठी सूक्ष्म नियोजन केले जात आहे. त्यासाठी संगमनेरात आलेला अतिरीक्त बंदोबस्तही अद्याप कायम ठेवण्यात आला असून शुक्रवारी शहरातील महत्त्वाच्या चौकात पोलिसांची उपस्थिती राहणार आहे. या शिवाय शहरातील असामाजिक तत्त्वांसह सोशल माध्यमांवरही पोलिसांच्या सायबर विभागाची करडी नजर असून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास तत्काळ कारवाई करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.


गेल्या महिन्यात 28 मे रोजी शहरातील जोर्वेनाका परिसरात किरकोळ कारणावरुन जोर्वे गावातील आठ तरुणांना दोन टप्प्यात बेदम मारहाण करण्यात आली होती. त्याचे पडसाद संपूर्ण संगमनेर तालुक्यात उमटून विविध हिंदुत्त्ववादी संघटनांनी ‘सकल हिंदू समाज’ या बॅनरखाली एकत्र येवून मंगळवारी (ता.6) बिगर राजकीय मोर्चाचे आयोजन केले होते. त्याला संगमनेर-अकोल्यासह आसपासच्या तालुक्यातील हजारों हिंदू बांधवांनी प्रचंड मोठा प्रतिसाद दिला. त्यातूनच शांततामय मार्गाने समारोप झालेल्या या मोर्चाला गालबोट लावण्याचा प्रकार घडून समनापूरातील अल्पसंख्याक समुदायातील काही घरांवर दगडफेक करण्याच्या व संगमनेरातील इथापे हॉस्पिटलमध्ये घुसून एकाला मारहाण करण्याचा प्रकारही समोर आला होता.


पोलिसांनी या दोन्ही प्रकरणात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करुन एकूण 18 जणांना अटक केली असली तरीही शहरात वेगवेगळ्या अफवांना पेव फुटल्याने वातावरणात तणाव कायम आहे. त्यातच उद्या शुक्रवारी (ता.9) मुस्लिम धर्मियांकडून जुम्म्याची नमाज अदा केली जाणार असल्याने शहर व परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस अधिक सतर्क झाले आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी राज्य गुप्तवार्ता विभागासह शहराच्या कानाकोपर्‍यात खबर्‍यांचे जाळे विणले असून प्रत्येक गोष्टीवर बारकाईने लक्ष्य ठेवले जात आहे. त्यासोबतच अहमदनगर व श्रीरामपूर येथील सायबर पोलिसांकडून सोशल माध्यमांवरही करडी नजर ठेवण्यात येत असून आक्षेपार्ह अथवा दोन समाजात तेढ निर्माण करणारे संदेश पाठविणार्‍यांवर तत्काळ कारवाई केली जाणार आहे.


यासोबतच शहरातील काही असामाजिक तत्त्वांची यादीही तयार करण्यात आली असून त्यांच्या हालचालींवर गोपनीय पद्धतीने लक्ष्य ठेवले जात आहे. शिवाय मंगळवारच्या मोर्चासाठी शहरात दाखल झालेला अतिरीक्त बंदोबस्त कायम ठेवण्यात आला असून शुक्रवारी शहरातील प्रमुख चौक, प्रार्थना स्थळे व रस्त्यांवर गणवेशातील पोलिसांसह साध्या वेशातील पोलिसांचाही वावर राहणार आहे. शहरातील पोलीस गस्तीच्या वाहनांमध्येही वाढ करण्यात आली असून या सर्व वाहनांना चोवीस तास शहरात चौफेर फिरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे व पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील प्रत्येक घडामोडीवर पोलिसांचे बारकाईने लक्ष आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *