संगमनेरात बुधवारी मनोज जरांगेंची विराट सभा जाणता राजा मैदानावर नियोजन; सगळी तयारी पूर्ण
नायक वृत्तसेवा, संगमनेर
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांची बुधवारी (ता.२२) संगमनेर शहरातील जाणता राजा मैदानावर विराट सभा होणार आहे. त्यासाठी लागणार्या व्यासपीठासह इतर सगळी तयारी पूर्ण झाली आहे. तालुक्याच्या चारही बाजूने येणार्या मराठा समाज बांधवांच्या वाहनांच्या वाहनतळाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे या एकमुखी मागणीसाठी मनोज जरांगे यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. मराठा समाजात जनजागृती व्हावी यासाठी त्यांनी आपल्या दुसर्या टप्प्यातील संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा सुरू केला आहे. शिवस्मृति दिनानिमित्ताने पट्टाकिल्ला येथे अभिवादन सभा आयोजित करण्यात आली आहे. तेथून दुपारी ३ वाजता ते संगमनेरात दाखल होणार आहे. त्यांचे जंगी स्वागत करण्याची तयारी संगमनेर शहर आणि तालुका सकल मराठा समाजाच्यावतीने करण्यात आलेली आहे.
संगमनेर तालुक्याच्या पश्चिम भागाकडून येणार्या मराठा समाज बांधवांच्या वाहनांची वाहनतळाची व्यवस्था श्रमिक मंगल कार्यालय, शारदा विद्यालय अकोले नाका व इंदिरानगरमधील प्रांत कार्यालयाच्या निवासस्थानासमोरील प्रांगणात केली आहे. पूर्व भागाकडून येणार्या समाज बांधवांसाठी ज्ञानमाता विद्यालय, पावबाकी रस्ता, सातपुते नगर, पोतदार शाळेजवळ आशिष गार्डन तसेच उत्तर भागातून येणार्या समाज बांधवांसाठी बाजार समितीचे मैदान, शेतकी संघाचे मैदान, मालपाणी लॉन्स, राजेंद्र होंडाच्या पाठीमागील महावितरणचे मैदान आणि दक्षिण भागातून येणार्या समाज बांधवांसाठी संगमनेर खुर्द येथील शोएब पठाण यांच्या प्रवरा सर्व्हिस स्टेशन जवळ करण्यात आलेली आहे. त्यामुळे सर्व बांधवांनी नेमून दिलेल्या ठिकाणीच आपली वाहने लावावी असे आवाहन सकल मराठा समाजाच्यावतीने करण्यात आले आहे.
संगमनेर शहरातील जाणता राजा मैदानावर होणार्या मनोज जरांगे यांच्या सभेसाठी उभारण्यात आलेल्या व्यासपीठासह वाहनतळ व इतर उपाययोजनांची संगमनेर उपविभागाचे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी पाहणी करत योग्य त्या सूचना सकल मराठा समाजाच्या पदाधिकार्यांना दिल्या आहे.