पत्रकार रायकर यांच्या मृत्युची चौकशी करुन कारवाई करा! संगमनेर पत्रकार मंचने उपविभागीय अधिकार्‍यांना दिले मागणीचे निवेदन

 
नायक वृत्तसेवा, संगमनेर
टिव्ही 9 वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी, तरुण पत्रकार पांडूरंग रायकर यांचे बुधवारी कोविडच्या संसर्गातून पुण्यात निधन झाले. त्यांचा दुर्दैवी मृत्यु व्यवस्थेचे धिंडवडे काढणारा आहे. अगदी कोपरगावमध्ये त्यांच्या कोविड चाचणीपासून ते पुण्यात त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध होण्यापर्यंतचा प्रवास पोखरलेल्या व्यवस्थेचे पितळ उघडे पाडणारा ठरला. त्यांच्या मृत्युला केवळ गलथान प्रशासकीय व्यवस्था कारणीभूत आहे, असे आमचे ठाम मत असून त्यांच्या मृत्युची सखोल चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन संगमनेर पत्रकार मंचने आज संगमनेरचे उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे यांना दिले. पत्रकारांच्या भावनांचा आदर असून त्या भावना सरकार दरबारी पोहोचवण्याचे आश्‍वासन देताना त्यांनी स्थानिक पत्रकारांना कोणतीही लक्षणे जाणवत असल्यास तात्काळ चाचणी करुन घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.


टिव्ही 9 या राष्ट्रीय वृत्तवाहिनीचे पुणे प्रतिनिधी, तरुण पत्रकार पांडूरंग रायकर यांना बुधवारी (ता.2) श्‍वसनाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांनी आपल्या पत्नीसह कोपरगावमधील एस.एस.जी.एम येथील कोविड केअर सेंटरमध्ये जावून रॅपिड अँटीजेन चाचणी करण्याचा निर्णय घेतला. मात्र येथे बराचवेळ थांबूनही त्यांना प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे त्यांच्या तेथील काही सहकारी मित्रांनी वरीष्ठांना फोन केल्यानंतर त्यांची चाचणी करण्यात आली व त्यातून ते संक्रमित असल्याचेही समोर आले. त्यामुळे त्यांच्यावर तात्काळ उपचार सुरु होण्याची गरज असल्याने बेडची शोधाशोध सुरु झाली असता कोपरगाव व लोणी येथे बेड शिल्लक नसल्याचे समोर आले.


त्यामुळे त्यांना कोकमठाण येथील आत्मा मलिक रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथेही अगदोदर चाळीस हजार रोख भरा तरच रुग्ण दाखल करुन घेतले जाईल अशी भूमिका रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने घेतली. त्या दरम्यान रायकर यांची प्रकृती खालावतच असल्याने सोबत असलेल्या त्यांच्या पत्नीने कॅसलेस पॉलिसी असल्याने रोकड सोबत नाही, एटीएमद्वारे स्वॅपकरुन पैसे घेण्यास सांगीतले, मात्र चारवेळा स्वॅप करुनही रुग्णालयातील स्वॅप मशिनचा प्रतिसाद मिळाला नाही. या सगळ्या घटनाक्रमात दोन तास त्यांना रुग्णालयाच्या आवारात अक्षरशः उपचारांसाठी तिष्ठत ठेवण्यात आले.


तेथील परिस्थितीचे स्वतःच अवलोकन करीत रायकर यांनी तेथून पुण्याला जाण्याचा निर्णय घेतला व त्यानुसार आपल्या मित्रांच्या मदतीने संजीवनी समूहाच्या कार्डियाक रुग्णवाहिकेतून ते पुण्याच्या दिशेनेही निघाले. त्याचवेळी जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाने आत्मा मलिक रुग्णालयात त्यांच्यासाठी बेड उपलब्ध झाल्याचे त्यांना सांगण्यात कळविण्यात आल्याने ते माघारी रुग्णालयात आले. मात्र तेथे दाखल करुन घेण्याशिवाय त्यांच्यावर कोणतेही उपचारही करण्यात आले नाहीत आणि त्यांना कोणती औषधेही देण्यात आली नाहीत, त्यामुळे त्यांची परिस्थिती अधिक खालावली.


आणि अखेर त्यांनी जिल्ह्यात उपचारच नकोत या भावनेतून पुन्हा पुण्याकडे प्रवास सुरु केला. मात्र येथेही दुर्दैवाने त्यांची पाठ सोडली नाही. पुण्यातील जम्बो कोविड सेंटरमध्ये सुरुवातीला बेडच उपलब्ध नव्हता, तेथील पत्रकारांनी बर्‍याच प्रयत्नांनंतर तो मिळविल्यानंतर तेथे कृत्रिम ऑक्सिजन आणि व्हेंटीलेटरची सोयच नसल्याचे समोर आले. तोपर्यंत रायकर यांची प्रकृती गंभिर झाली. पुण्यातील पत्रकारांनी केलेल्या प्रयत्नांना सायंकाळी उशीराने यश आले आणि रायकर यांच्यासाठी पं.हृदयनाथ मंगेशकर रुग्णालयात बेड उपलब्ध झाले, मात्र तेथे नेण्यासाठी रुग्णवाहिकाच उपलब्ध न झाल्याने त्यांचा करुण अंत झाला.


बुधवारी सकाळी कोपरगावमधून सुरु झालेला हा संपूर्ण घटनाक्रम भ्रष्ट झालेल्या व्यवस्थेचा बुरखा फाडणारा होता. त्यांना कोपरगाव अथवा कोकमठामध्येच उपचार मिळाले असते तर? त्यांची वेळीच रॅपिड अँटीजेन चाचणी झाली असती तर? पुण्यात गेल्यानंतरही त्यांना बराचवेळ उपचारांसाठी तिष्ठत बसावे लागले, नंतर केवळ रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने या उमद्या तरुण पत्रकाराचा हकनाक बळी गेला. त्यांचा मृत्यु नैसर्गिक नसून व्यवस्थेने त्यांचा बळी घेतला आहे असा राज्यातील सर्व पत्रकार संघटना आणि पत्रकारांचा ठाम आरोप आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषी असलेल्या सर्वांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी राज्यभरातून निवेदनाद्वारे केली जात आहे.


संगमनेर पत्रकार मंचनेही आज सकाळी 11 वाजता उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे यांना निवेदन देत या आशयाची मागणी केली. सदरची घटना अत्यंत दुर्दैवी असून पत्रकारांच्या भावनांचा आदर आहे. या भावना जशाच्या तशा शासन दरबारी पोहोचवण्याचे आश्‍वासन त्यांनी यावेळी दिले. सोबतच संगमनेरातील ज्या पत्रकारांना कोणतीही लक्षणे दिसत असतील त्यांनी ताबडतोब स्त्राव चाचणी करण्याचे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी तहसीलदार अमोल निकम यांच्यासह पत्रकार मंचचे अध्यक्ष श्याम तिवारी, उपाध्यक्ष नितीन ओझा, सचिव गोरक्षनाथ मदने, सदस्य सुनील नवले, शेखर पानसरे, गोरक्ष नेहे, राजू नरवडे, सतीश आहेर, अमोल मतकर, निलिमा घाडगे, अंकुश बुब, संजय साबळे व सुकदेव गाडेकर आदी उपस्थित होते.

Visits: 9 Today: 1 Total: 117504

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *