समनापूर दगडफेक प्रकरणी सतरा तरुणांना अटक! माघारी जात असताना घडला होता प्रकार; सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींची ओळख..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
मंगळवारी भगवा मोर्चा आटोपल्यानंतर माघारी जात असलेल्या जमावाकडून समनापूरमध्ये दगडफेक व मारहाणीचा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी रात्री उशिराने जखमी इस्माईल फकीर मोहंमद शेख यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात 20 ते 25 जणांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी उपलब्ध व्हिडिओ व सीसीटीव्ही कॅमेर्‍यांच्या मदतीने पोलिसांनी विविध ठिकाणच्या 17 जणांची ओळख पटविली असून रात्री कोम्बिंग ऑपरेशन राबवून त्या सर्वांना वेगवेगळ्या ठिकाणांवरुन अटक करण्यात आली आहे. त्यांना आज न्यायालयासमोर हजर केले असता त्या सत्ताही आरोपींनी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेने समनापूरसह संगमनेरातही तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र पोलिसांनी तत्काळ घटनास्थळाकडे धाव घेत परिस्थिती आटोक्यात आणल्याने या घटनेनंतर संगमनेरातील इथापे रुग्णालयात घडलेला प्रकार वगळता कोणतीही अनुचित घटना समोर आलेली नाही.

समनापूरमधील या घटनेत दोघे वयस्क जखमी झाले असून त्यांच्यावर संगमनेरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यातील हुसेन फकीर मोहंमद शेख (वय 75) यांना पुढील उपचारांसाठी नाशिकला हलविण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्या जीवाला कोणताही धोका नसल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे. तर दुसरे जखमी इस्माईल फकीर मोहंमद शेख (वय 60) यांचा मंगळवारी रात्री उशिराने पोलिसांनी दवाखान्यात जावून जवाब नोंदविला. त्यानुसार मंगळवारी (ता.6) संगमनेरातील मोर्चा संपल्यानंतर अनेकजण वेगवेगळ्या वाहनांतून माघारी जात असताना दुचाकीवरुन घोषणाबाजी करीत आलेल्या 20 ते 25 जणांच्या जमावाने समनापूरातील वरील इसमांच्या घरावर दगडफेक केली.

यावेळी दोघेही घराच्या बाहेर बसलेले होते. जमावाकडून दगडफेक होत असल्याने ते दोघेही लागलीच घरात गेले. मात्र जमावाने थेट त्यांच्या घरात घुसून इस्माईल फकीर मोहंमद शेख (वय 60) व हुसेन फकीर मोहंमद शेख (वय 75, दोघेही रा.समनापूर) यांना मारहाण करीत घराच्या खिडक्यांच्या काचा फोडल्या. यावेळी जमावातील काहींनी घरासमोर लावलेल्या वाहनांचेही नुकसान केले तर शेजारी राहणार्‍या पीरमोहंमद शेख यांच्या घरावरही दगडफेक करण्यात आली. जाताजाता जमावातील एकाने फिर्यादी इस्माईल शेख यांच्या तोंडावर लोखंडी रॉडने फटका मारल्याने त्यात त्यांचे चार दात पडल्याचे त्यांनी पोलिसांना दिलेल्या जवाबात म्हंटले आहे. त्यावरुन पोलिसांनी अज्ञात 20 ते 25 जणांवर दंगलीसह अनाधिकाराने घरात घुसणे व प्राणघातक शस्त्रांचा वापर करुन हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेनंतर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्वतः तपासाची सूत्रे आपल्या हाती घेत घटनास्थळाच्या आसपासचे सीसीटीव्ही चित्रण, या घटनेवेळी काहींनी केलेले मोबाईल चित्रीकरण मिळवून हल्लेखोरांची ओळख पटविली. त्यानंतर मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास कोम्बिंग ऑपरेशन राबवताना पोलिसांनी सत्यम भाऊसाहेब थोरात (वय 23), सुनील बाबासाहेब थोरात (वय 23), ललीत अनिल थोरात (वय 24), प्रमोद संजय थोरात (वय 21), दत्तात्रय संपत थोरात (वय 25), आबासाहेब शिवराम थोरात (वय 30, सहाही रा.वडगाव पान), अवीराज आनंदा जोंधळे (वय 21), विकास अण्णासाहेब जोंधळे (वय 50), भाऊसाहेब यादव जोंधळे (वय 60, तिघेही रा.कोकणगाव), कुणाल ईश्वर काळे (वय 19), करण ज्ञानेश्वर काळे (वय 19, दोघेही रा.माळेगाव हवेली), वैभव रंगनाथ बिडवे (वय 29, रा.मनोली), शुभम बाळासाहेब कडू (वय 23), ऋषीकेश शरद घोलप (वय 24), तनोज शरद कडू (वय 24) व महेश विजय कडू (वय 33, चौघेही रा.पाथरे, ता.राहाता) अशा सतरा जणांना अटक केली असून त्यांना आज न्यायालयासमोर हजर केले असता सर्वांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.


समनापूर हल्ला प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या सतरा जणांमधील काहीजणांचा या प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचा दावा काहीजण करीत आहेत. मात्र त्याचवेळी पोलिसांनी उपलब्ध सीसीटीव्ही फूटेज आणि काहींनी मोबाईलद्वारे केलेल्या चित्रीकरणाच्या आधारे आरोपींची ओळख पटविल्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी सांगितले आहे. त्यामुळे सदरचे अटकसत्र वादात सापडले आहे.

या घटनेत जखमी झालेल्या हुसेन फकीर मोहंमद शेख (वय 75) यांच्या डोक्याला दुखापत झाली असून सावधगिरीचा उपाय म्हणून त्यांना पुढील उपचारांसाठी नाशिकला हलविण्यात आले आहे. त्यांची प्रकृती एकदम स्थिर असून त्यांच्या जीवाला कोणताही धोका नसल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे. मात्र सोशल माध्यमात जाणीवपूर्वक त्यांची प्रकृती गंभीर असल्याच्या अफवा पेरल्या जात असल्याने पोलिसांनी अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. शहरात अजूनही मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात आहे.

Visits: 227 Today: 2 Total: 1111249

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *