गणेश कारखाना निवडणुकीत विखेंच्या विरोधात थोरात-कोल्हे एकत्र विखेंची प्रतिष्ठा पणाला तर शेतकरी संघटनेचे सात उमेदवार रिंगणात

नायक वृत्तसेवा, शिर्डी
शिर्डी विधानसभा मतदारसंघातील गणेश कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील विरुद्ध माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि कोपरगावच्या कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांची युती, असा सामना रंगणार आहे.

विखे पाटलांच्या होम ग्राऊंडवर हा सामना होत असल्याने, संपूर्ण जिल्ह्याचे त्याकडे लक्ष असणार आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने थोरात-कोल्हे युती हे नवे समीकरण आकारास आले आहे. अर्ज माघारीच्या दिवशी नवे राजकीय संदर्भ असलेल्या या सामन्याचे चित्र स्पष्ट झाले. शेतकरी संघटनेने सात ठिकाणी आपले उमेदवार उभे केले आहेत. मागील आठ वर्षांपासून हा कारखाना विखे पाटलांनी त्यांच्या प्रवरा कारखान्याच्या माध्यमातून चालविण्यास घेतला. या कारखान्याचा परिसर हे त्यांचे होम ग्राऊंड आहे. कारखान्यावर त्यांची सत्ता देखील आहे.

या निवडणुकीत त्यांनी बरेच नवे चेहरे उतरविले आहेत. विखे पाटलांबरोबरच खासदार डॉ. सुजय विखे पाटील हे देखील या निवडणुकीत सक्रीय आहेत. गेल्या महिनाभरापासून त्यांनी या निवडणुकीची पूर्वतयारी सुरू केली होती. ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी हा कारखाना चालविण्याचा करार पाच वर्षे वाढविला. अर्थात त्यावर विरोधी गटाने आक्षेप घेत हा निवडणूक प्रचाराचा मुद्दा केला आहे. स्थापनेपासूनच्या 67 वर्षांच्या कालखंडात माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या गटाकडे हा कारखाना सर्वाधिक अडतीस वर्षे होता. याच गटाकडून विखे पाटलांनी हा त्यावेळी बंद पडलेला कारखाना राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा असल्याने चालविण्यास घेतला.

आजवर या कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने कोल्हे आणि विखे गटांत सातत्याने संघर्ष झाला. मात्र थोरात हे कधीही या निवडणुकीत सहभागी झाले नव्हते. यावेळी ते प्रथमच सक्रीय झालेत. या निवडणुकीत कोल्हे गटाचे नेतृत्व कोपरगावच्या सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे करीत आहेत. त्यांना अर्थातच थोरात यांचे उघड पाठबळ मिळाले आहे. हे दोघे मिळून विरोधी बाजूची प्रचार मोहीम राबवत आहेत.
