पंचवीस वर्षांपूर्वी शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा रंगला स्नेहमेळावा सह्याद्री महाविद्यालयातील आठवणी मनोगतातून केल्या ताज्या

नायक वृत्तसेवा, संगमनेर
तुझं कसं चाललयं… मुलं काय करतात… अशी ख्याली-खुशाली विचारण्यापासून अगं कुठं असतेस… कित्ती वर्षांनी भेटतोय… कसे आहेत सगळे अशा आपुलकीच्या प्रश्नांपर्यंतचे संवाद आणि महाविद्यालयीन जीवनाच्या मर्मबंधातील आठवणींना उजाळा देण्यापासून परत नवीन काहीतरी केले पाहिजे, अशी सामाजिक जाणीव समृद्ध करणार्या चर्चा व्हॉटसअॅप ग्रुपवर रंगल्या. निमित्त होते गेल्या पंचवीस वर्षात शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्याचे.

संगमनेर येथील सह्याद्री विद्यालय ते सह्याद्री महाविद्यालय असा प्रवास करत गेल्या पंचवीस वर्षांत घडलेल्या माजी विद्यार्थ्यांना एकत्र आणण्याच्या निमित्ताने संगमनेर येथील माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या सहकार्याने स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते. या स्नेहमेळाव्याची सुरुवात वर्गातील विद्यार्थिनीची मुलगी जान्हवी हिने सर्वांना गुलाबाचे फुल देऊन स्वागत केले. महाविद्यालयात शिक्षण घेतलेले आणि वयाची चौरेचाळीशी गाठलेले सर्व मित्र-मैत्रिणी मेळाव्याच्या निमित्ताने एकत्रित आले होते. अनेक वर्षांनी झालेल्या गाठीभेटीने प्रत्येकाच्या चेहर्यावर आनंद ओसंडून वाहत होता. जुन्या आठवणींच्या चर्चा, गप्पा, खोड्या, किस्से व हास्यकल्लोळाने हा मेळावा उत्तरोत्तर रंगला होता. आपल्या जुन्या मित्र-मैत्रिणीची भेट झाल्याने एक वेगळा आनंद सारेचजण अनुभवत होते. अनेकजण ऋणानुबंध जपत भूतकाळात रमले होते.

आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन आठवणी ताज्या केल्या. 1998 साली महाविद्यालयामध्ये शिक्षण घेतलेले अनेक माजी विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत आहेत. नितीन बोंबले व पोपट धूळगंड यांनी आपल्या सुरेल आवाजात नवीन व जुने गाणे गात कार्यक्रमाची रंगत वाढवली. तसेच विद्यार्थिनींनी संगीत खुर्ची खेळत आनंद लुटला. वर्गातील नेहमी हसरा चेहरा असणारी वैशाली रहाणे हिच्या नृत्याने सर्व वातावरण आनंदी झाले होते. सर्वजण टाळ्यांच्या गजरात तिचे स्वागत करत होते. त्यानंतर विद्यार्थ्यांनी एकमेकांना छोटेसे बक्षिस देऊन विशेष सत्कार केला. प्रास्ताविक माजी विद्यार्थी नितीन बोंबले व शोभा गाडे यांनी केले. या स्नेहमेळाव्यासाठी शोभा गाडे, नितीन बोंबले, जगदीश राऊत, संजय शेळके, पोपट धूळगंड, सीमा रहाणे, बाळासाहेब हासे, संगीता मेमाणे, सचिन अरगडे, भाऊसाहेब धुमाळ, राजेंद्र रसाळ, शरद वलवे, मच्छिंद्र शिंदे, वैशाली गोसावी, गंगाराम केंगार, संजय आंबरे, मुकुंद औटी, यूवराज परचंडे, विजय तिवारी, प्रशांत लाहोटी, रवींद्र भरीतकर, उज्ज्वला वाळवे, धीरज तिरवाडी, शैलेश अरगडे, विजय देवगिरे, वैशाली रहाणे, अश्विनी वाणी, मीना कोकणे, नवनाथ गांजवे, उज्ज्वला मांडे, गोकुळ खताळ, फिलोमिना भालेराव, सुवर्णा वाणी, किरण कुटे आदी उपस्थित होते.
