बेपत्ता तरुणाचा धामणगाव आवारी येथे मृतदेह आढळला घातपात झाल्याचा तरुणाच्या नातेवाईकांनी व्यक्त केला संशय


नायक वृत्तसेवा, अकोले
गेल्या आठ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या धामणगाव पाट येथील प्रतीकेश माधव चौधरी (वय 21) या तरुणाचा मृतदेह धामणगाव आवारीच्या शिवारात बुधवारी (ता. 28) सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान त्याचा घातपात झाल्याचा संशय कुटुंबीय व नातेवाईकांनी व्यक्त केल्याने त्याच्या मृत्यूचे गूढ उकलण्याचे मोठे आव्हान अकोले पोलिसांपुढे ठाकले आहे.

अकोले तालुक्यातील धामणगाव पाट येथील प्रतीकेश चौधरी हा तरुण 20 सप्टेंबरला सकाळी घरातून मजुरी काम करण्यासाठी गेला होता. तो पुन्हा घरी आलाच नाही, नातेवाईकांनी त्याचा शोधही घेतला. मात्र तो मिळून न आल्याने अकोले पोलिसांत हरविल्याची फिर्याद दाखल करण्यात आली. बुधवारी आठवडाभरानंतर धामणगाव आवारी गावातील सार्वजनिक शौचालय जवळील मकाच्या शेतात प्रतीकेशचा मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. प्रतीकेशच्या नातेवाईकांनी धामणगाव आवारी ग्रामपंचायतच्या सीसीटीव्हीमध्ये पाहिले असता प्रतीकेश सार्वजनिक शौचालयाच्या दिशेने जाताना दिसून आला आहे. शौचालयाच्या शेजारील शेतातील मकातून दुर्गंधी येत असल्याने आतमध्ये जाऊन पाहिल्यानंतर प्रतीकेशचा मृतदेह सापडला आहे. अकोलेचे पोलीस उपनिरीक्षक भूषण हंडोरे यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला आहे. पुढील तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

दरम्यान, प्रतीकेश 20 तारखेला धामणगाव आवारी गावात आल्यानंतर गावातील कृषी सेवा केंद्रातून कीटकनाशक आणि दुसर्‍या दुकानातून पाण्याची बाटली घेऊन जात असताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. त्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी त्याच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्याच्यासोबत नक्की काय प्रकार घडला आहे, त्याने हे टोकाचं पाऊल का उचलले असावे हे समोर यायला पाहिजे, अशी मागणी प्रतीकेशच्या भावाने केली आहे. प्रतीकेशवर धामणगाव पाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार असून, सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Visits: 87 Today: 2 Total: 1098513

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *