छत्रपतींच्या नियोजित स्मारकावरुन संगमनेरात राजकीय कलगीतुरा! दोन्ही आमदार समर्थकांचे सोशल श्रेययुद्ध; पालिकेच्या करारावरुन मिळाली विषयाला हवा..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ प्रतिमेवरुन संगमनेरात सुरु असलेल्या राजकारणाचा नवा अध्याय सुरु झाला आहे. तब्बल आठ वर्षांपूर्वी पालिकेने ठराव केलेल्या या स्मारकाला विधानसभा निवडणुकीनंतर अचानक हवा मिळाल्याने गेली दोन वर्ष आरोप-प्रत्यारोपांसह श्रेयवादाच्या केंद्रस्थानी आलेल्या या विषयाला सोमवारी अचानक कलाटणी मिळाली. त्यातून मध्यंतरी काहीकाळ शांत असलेला हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून त्यावरुन संगमनेरात श्रेयवादाचा राजकीय कलगीतुराही रंगला आहे. नियोजित स्मारकासाठी परिवहन महामंडळाने मंजूर केलेली जागा खूप अपूरी असल्याचा आरोप यापूर्वी झाला होता, त्यावरुन दोन्ही बाजूने वाढीव जागेसह भव्य स्मारकाचे स्वप्नं दाखवले जात असतानाच सोमवारी पालिकेने महामंडळासोबत मंजूर जागेप्रमाणे करार केल्याने शहरात राजकीय भडका उडाला असून श्रेयासाठी छत्रपतींचे स्मारक संकुचित केले जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

याबाबत दैनिक नायकने केलेल्या पडताळणीत आठ वर्षांपूर्वी 9 जुर्लै 2018 रोजी पालिकेच्या सर्वसाधारणसभेत तत्कालीन नगराध्यक्षा दूर्गा तांबे यांच्या सूचनेवरुन शहरात छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहासनाधिश्वर स्वरुपातील पूर्ण प्रतिमा उभारण्याचा प्रस्ताव नगरसेविका सुनिता गुंजाळ यांनी मांडला होता व विश्वास मुर्तडक यांनी त्याला अनुमोदन दिले होते. मात्र त्यानंतर 2019 मध्ये राज्यात सत्तांतर घडल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार आले. मात्र 2022 पर्यंत सदरील स्मारकाबाबत कोणतीही हालचाल झाल्याचे समोर आले नाही. दरम्यानच्या काळात शिवसेनेत फूट पडून आघाडी सरकार कोसळल्यानंतर 2023 मध्ये झालेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजीत तांबे यांनी काँग्रेसशी बंडखोरी करुन भाजपच्या पाठबळावर अपक्ष उमेदवारी करुन विजय मिळवला. तेव्हापासूनच त्यांचा कल तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूला झुकल्याचे वेळोवेळी दिसून आले.

पदवीधरची निवडणूक जिंकताच आमदार सत्यजीत तांबे यांनी 21 ऑगस्ट 2023 रोजी पालिकेशी पत्रव्यवहार करुन शहरातील छत्रपतींच्या प्रस्तावित स्मारकाचा विषय आपल्या अखत्यारित आणला. त्याचाच संदर्भ घेत प्रशासक असलेल्या तत्कालीन मुख्याधिकार्यांनी 25 ऑगस्ट 2023 रोजी संगमनेरच्या आगारप्रमुखांशी पत्रव्यवहार करुन पालिका कौन्सिलने केलेल्या ठरावाच्या प्रतिसह बसस्थानकाच्या दर्शनीभागात 15 मीटर बाय 15 मीटर आकाराच्या जागेची मागणी केली, त्या पत्राची प्रत महामंडळाच्या विभागीय कार्यालयालाही पाठवण्यात आली होती. या दरम्यान सत्यजीत तांबे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून त्यांना जागा देण्याबाबत लेखीपत्राद्वारा गळ घातली. त्यांच्या पत्रावर मुख्यमंत्र्यांनी ‘तपासून मंजूरी देण्याबाबत..‘ असा शेरा मारुन ते पुढील कारवाईसाठी पाठवले. मात्र कोणतीच कारवाई न झाल्याने पालिकेच्या मुख्याधिकार्यांनी 12 सप्टेंबर 2023 रोजी आगारप्रमुखांशी पुन्हा पत्रव्यवहार केला.

या दरम्यान संगमनेरातील शिवजयंती उत्सवासाठी आलेल्या पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी संगमनेरसह श्रीरामपूर व राहाता येथे शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती प्रतिमेसह स्मारक उभारण्याची घोषणा करताना त्यासाठी प्रत्येकी एक कोटी निधी देण्याचे जाहीर केले. पालकमंत्र्यांच्या घोषणेनंतर भाजपचे तत्कालीन संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष अमोल खताळ यांनी मुंबईत जावून मुख्यमंत्र्यांसह परिवहन मंत्र्यांना भेटून त्यांना परिवहन महामंडळाची दोन हजार चौरसफूट जागा देण्याची लेखी विनंती सोपवली. त्यावर तत्काळ हालचाली होवून 15 जुलै 2024 रोजी परिवहन महामंडळाच्या महाव्यवस्थापकांनी (बांधकाम) तातडीचा विषय म्हणून अहिल्यानगरच्या विभागीय नियंत्रकांना पत्र पाठवून महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत प्रस्तावाला मंजूरी देण्यात आल्याचे सांगत प्राप्त ठरावानुसार जागा उपलब्ध करुन देण्याचे आदेश देण्यात आले.

प्रत्यक्षात पालिकेने केलेल्या ठरावाद्वारा 15 मीटर बाय 15 मीटर जागेची प्रत्यक्षात मागणी केले असताना महामंडळाच्या अहिल्यानगर विभागीय नियंत्रकांनी मात्र अवघी चार मीटर बाय सहा मीटर जागा देण्याचे मान्य करीत तसा करार करण्याच्या सूचना पालिकेला केल्या. दरम्यानच्या काळात विधानसभा निवडणुका होवून त्यात माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांना पराभवाचा सामना करावा लागला. तर निवडणूकीपूर्वी भाजपमध्ये असलेल्या अमोल खताळ यांनी शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवित थोरातांचा चार दशकांचा राजकीय बुरुज पाडला. राज्यातही महायुतीने ऐतिहासिक यश मिळववत सत्ता कायम राखल्याने आमदार अमोल खताळ यांचे वजन वाढले. त्यातही परिवहन खातंही शिवसेनेच्या वाट्याला आल्याने संगमनेरच्या शिवस्मारकाच्या विषयावर त्यांचे वर्चस्व निर्माण झाले.

या घडामोडींनी संगमनेर तालुक्यातील राजकारण ढवळून निघालेले असताना पालिका निवडणुकीत मात्र संगमनेरकरांनी सत्ताधार्यांवरच विश्वास दाखवला. या निवडणुकीतही संगमनेरच्या अश्वारुढ शिवप्रतिमेचा मुद्दा दोन्ही बाजूने प्रचाराच्या केंद्रस्थानी होता. त्यामुळे संगमनेरात शिवप्रतिमा उभारण्यात कोण यशस्वी होणार याबाबतची उत्कंठा ताणली गेली होती. महामंडळाने देवू केलेली जागा खूपच अपूरी असल्याने दोन्ही बाजूने वाढीव जागा मिळवण्यासाठी आपापल्या पद्धतीचे प्रयत्न सुरु होते. मात्र त्यातच गेल्या सोमवारी (ता.17) अहिल्यानगर परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक थेट पालिकेत पोहोचले आणि कोणताही गाजावाजा न करता त्यांनी पूर्वीच्या निर्णयानुसार महामंडळाने देवू केलेल्या चार मीटर बाय सहा मीटर जागेच्या हस्तांतरणाचा करार पूर्ण केला. या निर्णयाने गेल्या आठ वर्षांपासून सुरु असलेल्या शिवप्रतिमेच्या पूर्णाकृती स्मारकाचा मुद्दा निकाली निघण्यासह त्यावर आमदार सत्यजीत तांबे यांची मोहोर उमटली असली तरीही मिळालेली जागा खूप कमी असल्याने छत्रपतींना साजेशा प्रकारचे स्मारक उभारणे अशक्य आहे, केवळ श्रेय मिळवण्यासाठी अपक्ष आमदारांची धडपड सुरु असल्याचे आरोप त्यांच्यावर होवू लागले आहेत.

तर, दुसरीकडे सोशल माध्यमात संगमनेर बसस्थानकाच्या उत्तर-पूर्व प्रवेशद्वारासमोरील जागा मंजूर करण्यात आमदार अमोल खताळ यांचाच वाटा असल्याचे जोरदार दावे केले जात आहेत. शिवाय मिळवलेली जागा श्रेय लाटण्यासाठी घाईघाईत घेतली गेली असून शासनाकडून वाढीव जागा मिळण्याची शक्यता असतानाही हा करार केला गेल्याने शहरात शिवरायांचे संकुचित स्मारक उभारावे लागणार असल्याचे चित्रही आता उभे केले जात आहे. या प्रवासात दोन्हीकडून गेल्या पाच-सात वर्षांपासून सुरु असलेल्या पत्रव्यवहारांचे दाखलेही दिले जात असून त्यातून संगमनेरचे राजकारणही चांगलेच तापले आहे.

ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या संगमनेरात 1980 साली छत्रपतींचा अर्धाकृती पुतळा उभारण्यात आला. तेव्हापासून शहरात शिवरायांच्या पूर्णाकृती प्रतिमेचे स्मारक व्हावे अशी मागणी सुरु आहे. त्यासाठी आठ वर्षांपूर्वी पालिकेने ठराव केला, मात्र त्यावर कोणतीच कारवाई झाली नाही. आता शिवसेनेचे आमदार अमोल खताळ आणि पदवीधरचे अपक्ष आमदार सत्यजीत तांबे या दोघाही लोकप्रतिनिधींनी हा विषय प्रतिष्ठेचा केल्याने त्यावरुन संगमनेरातील राजकारण चांगलेच तापले असून आगामी काळातही त्याचे लोळ उठण्याची दाट शक्यता आहे.

