समनापूरच्या मंडलाधिकार्यांसह खासगी मदतनीस ‘एसीबी’च्या जाळ्यात! चुकीची नोंद दुरुस्त करण्यासाठी आठ हजारांची रक्कम स्वीकारतांना रंगेहात पकडले..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
जिल्ह्यात एकामागून एक भ्रष्टाचाराची प्रकरणं समोर येवू लागली असून पोलीस विभागानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आपला मोर्चा आता महसूल विभागाकडे वळविला आहे. आज दुपारच्या सुमारास पोखरी हवेली येथील तक्रारदराने विक्री केलेल्या जमीनीची चुकीची नोंद दुरुस्त करण्यासाठी दहा हजारांतील आठ हजारांची लाच स्वीकारतांना समनापूरचे मंडलाधिकारी बाळासाहेब कचरु जाधव व तलाठी कार्यालयातील खासगी सहाय्यक मनोज ज्ञानेश्वर मंडलीक या दोघांना आज अहमदनगरच्या लाचलुखपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. या वृत्ताने जिल्ह्याच्या महसूल विभागात खळबळ उडाली असून पोलीस विभागानंतर आता महसूल विभाग ‘एसीबी’च्या रडारवर असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

याबाबत अहमदनगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार पोखरी हवेली (ता.संगमनेर) येथील 29 वर्षीय तरुणाने आपली जमीन आपल्याच चुलत्यास विक्री केली होती. त्याचे विक्री दस्त नोंदवितांना त्यामध्ये चुकीचे क्षेत्र नमूद झाले होते व त्या आधारावर शेतीचा फेर नोंद झाला होता. संबंधित तक्रारदार यांनी सदरचा फेर रद्द करावा यासाठी समनापूर येथील मंडलाधिकारी कार्यालयाकडे अर्ज दिला होता. यातील लोकसेवक, मंडलाधिकारी जाधव यांच्याकडून खरेदीचा फेर मंजूर होणे प्रलंबित होते.

मंडलाधिकारी जाधव यांनी खरेदीचा फेर मंजूर करतांना रद्द लेखाप्रमाणे खरेदी नोंद रद्द करण्यासाठी खासगी इसमामार्फत दहा हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती 8 हजार रुपये देण्याचेही ठरले होते. त्यानुसार आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास समनापूर येथील मंडलाधिकारी कार्यालयात सदरच्या लाचेची आठ हजारांची रक्कम स्वीकारतांना लोकसेवक, मंडलाधिकारी बाळासाहेब जाधव व त्यांचा खासगी सहाय्यक मनोज मंडलिक या दोघांनाही अहमदनगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. त्यानंतर संबंधित दोन्ही आरोपींना संगमनेरच्या शासकीय विश्रामगृहावर आणल्यानंतर त्यांचे जवाब घेण्यात आले. सध्या या दोघांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. या वृत्ताने जिल्ह्याच्या महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

आजच्या सापळा कारवाईत अहमदनगर लाचलुचपत विभागातील पोलीस निरीक्षक श्याम पवरे, दीपक करांडे, पो.ना.चौधरी, पो.शि.रविंद्र निमसे, वैभव पांढरे, महिला पोलीस कर्मचारी संध्या म्हस्के, चालक हरुन शेख व पो.ना.राहुल डोळसे यांनी भाग घेतला होता. गेल्या काही कालावधीत संगमनेर व अकोल्यासह जिल्ह्यातील काही भागात लाचखोर पोलिसांवर कारवाया करण्यात आल्या होत्या. आज संगमनेर तालुक्यात महसूल कर्मचार्याच्या रुपाने लाचलुचपतचा मोर्चा आता महसूलच्या दिशेने वळाल्याची चर्चा या निमित्ताने तालुक्यात सुरु झाली आहे.

