रुग्णालयात घुसून टोळक्याची एकाला मारहाण चित्रीकरण करीत असल्याचा संशय; आठजणांविरोधात गुन्हा..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
समनापूर येथील दगडफेकीच्या घटनेत जखमींवर उपचार सुरु असलेल्या रुग्णालयाबाहेर जमलेल्या जमावाचे चित्रीकरण करीत असल्याच्या संशयावरुन आठ जणांनी एकाला दुसर्या रुग्णालयात घुसून मारहाण केली. यावेळी ‘त्या’ रुग्णालयातील अन्य परिचारीका त्याच्या मदतीला धावल्याने संबंधित टोळके माघारी फिरले. याप्रकरणी इथापे हॉस्पिटलमध्ये सेवेत असलेल्या वाहनचालकाच्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी आठ जणांविरोधात दंगलीसह मारहाण, शिवीगाळ व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल झाल्याने शहरात काहीकाळ तणावही निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी तत्काळ घटनास्थळाकडे धाव घेत तेथे जमलेला जमाव पिटाळल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. याप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार सदरची घटना मंगळवारी भगवा मोर्चा संपल्यानंतर दोन तासांनी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास नवीन नगर रस्त्यावरील इथापे रुग्णालयात घडली. मोर्चातून परतणार्या तरुणांना उद्देशून समनापूरात काहींनी शिवीगाळ करीत त्यांच्या वाहनावर दगड भिरकावल्याने त्यांनी आपले वाहन थांबवून प्रत्युत्तरात जोरदार दगडफेक केल्याने त्यात तिघे जखमी झाले. त्यांना संगमनेरातील नवीन नगर रस्त्यावर असलेल्या एका रुग्णालयात उपचारार्थ दाखल केल्यानंतर तेथे मोठ्या संख्येने जमाव गोळा झाला होता.

त्याचवेळी इथापे रुग्णालयात सेवेत असलेला योगेश पांडुरंग कानवडे (वय 25, रा.निमगाव पागा) हा वाहनचालक आपल्या मोबाईलवर बोलत रुग्णालयाच्या पाठीमागील प्रवेशद्वारापर्यंत गेला. त्यावेळी समोरच्या बाजूला असलेल्या दुसर्या रुग्णालयाबाहेर मोठा जमाव जमलेला होता. संबंधित वाहनचालक मोबाईलवर बोलताबोलता इथापे रुग्णालयाच्या प्रांगणातच फिरत असताना जमावाचे लक्ष त्याच्यावर गेले व तो आपलेच चित्रीकरण करीत असल्याचा त्यांना संशय आल्याने त्यातील आठजणांनी थेट रुग्णालयात घुसून त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली.

त्यामुळे तो धावतच रुग्णालयाच्या आतील एका खोलीत पळाला. त्याचा पाठलाग करीत ते टोळकेही थेट त्या खोलीपर्यंत गेल्यानंतर आतील काही महिलांनी हातात चपला घेवून त्यांना पिटाळून लावले. यावेळी त्या टोळक्याने संबंधित महिलांनाही शिवीगाळ केल्याचे शहर पोलीस ठाण्यात देण्यात आलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे. त्यावरुन पोलिसांनी साहिल फिरोज सय्यद व तौफिक अकील शेख (दोघेही रा.पुनर्वसन कॉलनी), आवेश शेख (रा.मोमीनपुरा), इजाज इस्माईल शेख (रा.गवंडीपुरा), अरबाज शेख (रा.कुरण रोड), अदनान शेख (मदिनानगर) यांच्यासह अन्य दोघा अज्ञातांविरोधात दंगल घडवणे, मारहाण करणे, शिवीगाळ करणे व धमकी दिल्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला असून त्यातील एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

या घटनेत योगेश कानवडे यांना मारहाण करीत थेट रुग्णालयात घुसलेल्या आठजणांना रुग्णालयातील दोघींनी हातात चपला घेत पिटाळून लावले. त्यानंतर काही वेळातच पोलिसांचे वाहनही घटनास्थळावर पोहोचल्याने पुढील अनर्थ टळला. यावेळी पोलिसांनी समनापूरातील जखमी ज्या रुग्णालयात दाखल आहेत तेथे जमलेला मोठा जमाव हुसकावून लावला, त्यामुळे सदरची घटना मर्यादित राहिल्याने त्याचा अन्यत्र कोठेही परिणाम झाला नाही.

