धक्कादायक! कोतूळमध्ये तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार अकोले पोलिसांत अत्याचाराच्या कलमासह अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल

नायक वृत्तसेवा, अकोले
इन्स्टाग्राम व व्हॉटसअॅप या समाज माध्यमावरुन ओळख होवून पुढे मैत्री झाली. त्यानंतर तरुणीचा विश्वास संपादन करुन तिला लग्नाचे आमिष दाखवत तरुणाने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. मात्र, या प्रकरणाची कुणकुण लागल्याने कोतूळमध्ये हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी लव्ह जिहादच्या संशयावरुन सोमवारी (ता.5) संध्याकाळी संबंधित जोडप्याला रंगेहाथ पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपी आतिक सादिक मणियार याच्यावर अत्याचाराच्या कलमासह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (अॅट्रोसिटी) गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने अहमदनगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत अकोले पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीवरुन, आतिक सादिक मणियार याने गावातीलच एका तरुणीशी इन्स्टाग्राम व व्हॉटसअॅपवरुन ओळख करुन मैत्री केली. मात्र, मैत्रीच्या नावाखाली आतिकने तिचा विश्वास संपादन करुन लग्नाचे आमिष दाखविले. एवढ्यावरच न थांबता तरुणीला तिचे नग्न छायाचित्र पाठविण्याची गळ त्याने घातली. तिनेही त्याला नग्न छायाचित्रे पाठविली. या संधीचा फायदा उठवून त्याने ‘आज माझ्या घरी कुणी नाहीये, तू घरी ये’ असे सांगून तिला घरी बोलावले. त्यानंतर पीडित तरुणी घरी येताच त्याने दरवाजा आतून बंद केला.

एवढा वेळ होवून तरुणी बाहेर येईना म्हणून काही तरुणांना लव्ह जिहादचा संशय आला. त्याने मैत्रीचा गैरफायदा आणि लग्नाचे आमिष दाखवून तिच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केला. मग, हिंदुत्वावादी तरुणांनी रंगेहाथ पकडून पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुभाष भोये यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेत आतिकला ताब्यात घेतले. याप्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपी आतिक सादिक मणियार याच्याविरुद्ध गुरनं.366/2023 भादंवि कलम 376, 341, 354 सह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कलम 3(1)(डब्ल्यू)(I)(II)(V), 3(2) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे हे करत आहे.

संगमनेरमधील भगवा मोर्चाच्या पूर्वसंध्येला अकोले तालुक्यातील प्राचिन बाजारपेठ समजल्या जाणार्या कोतूळमध्ये लव्ह जिहादच्या संशयाचे प्रकरण उघड झाल्याने आणि समाज माध्यमातून ‘ते’ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने आजच्या मोर्चावर त्याचा परिणाम झाल्याचे दिसून आले.
