घराकडे परतणार्‍या मोर्चेकर्‍यांच्या वाहनांवर दगडफेक! समनापूरमधील प्रकार; दोन्ही बाजूच्या धुमश्चक्रीत तिघे जखमी..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
सकल हिंदू समाजाच्यावतीने आयोजित करण्यात आलेला आजचा भगवा मोर्चा संपल्यानंतर दुपारी साडेबाराच्या सुमारास घराकडे निघालेल्या मोर्चेकर्‍यांच्या वाहनावर दगडफेकीचा प्रकार घडला. या घटनेत दोन्ही बाजूनी तुरळक दगडफेक करण्यात आल्याने त्यात तिघे जखमी झाले असून त्यांच्यावर संगमनेरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर समनापूरात काहीकाळ वातावरण तणावपूर्ण बनले होते, मात्र पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्वतः तेथे धाव घेत जमाव पांगविल्याने परिस्थिती नियंत्रणात आली आहे. याप्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नसून या घटनेच्या उपलब्ध व्हिडिओवरुन पुढील कारवाई केली जाणार आहे.

संगमनेरात आज निघालेल्या विराट हिंदू मोर्चात शहरासह तालुक्यातील हजारो नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. शहराच्या प्रमुख मार्गावरुन निघालेला हा मोर्चा नवीन नगर रस्त्यावर आल्यानंतर त्याचे सभेत रुपांतर झाले. पोलिसांनी मोर्चाला परवानगी देतांना सकाळी 9 ते 12 इतकीच वेळ ठरवून दिली होती, त्यानुसार बरोबर बाराच्या सुमारास मोर्चाची समाप्ती झाली. यावेळी आयोजकांकडून मोर्चेकर्‍यांना शांततेत घरी परतण्याचेही आवाहन करण्यात आले होते. मात्र समनापूरात त्या उलट घडले.

प्राप्त झालेल्या माहितीनुसार तालुक्याच्या पूर्वभागातून मोर्चासाठी आलेले नागरिक आपापल्या वाहनांमधून घराकडे परतत असताना समनापूर गावातील काही समाजकंटकांनी मोर्चेकर्‍यांना शिवीगाळ केली, यावेळी काही टवाळांनी दगडं भिरकावल्याने शांततेत समारोप झालेल्या मोर्चाला गालबोट लागले. मोर्चात सहभागी नागरिकांची संख्या खूप मोठी असल्याने सुरुवातीला दगडफेक झालेली वाहने थांबल्यानंतर पाठीमागून आलेली वाहनेही त्यामागे थांबू लागल्याने तेथे गर्दी झाली. त्यातून तणाव निर्माण होवून मोर्चेकर्‍यांमधील काहींनी प्रत्युत्तरात तुरळक दगडफेक केल्याने त्यात समनापूरातील रईस बिलाल शेख, इस्माईल फकीरमोहंमद शेख व हुसेन फकीरमोहंमद शेख हे तिघे जखमी झाले आहेत. यासोबतच पाच वाहनांचेही नुकसान झाले आहे. हा प्रकार सुरु असताना काहींनी मोबाईलद्वारे त्याचे चित्रीकरणही केले असून पोलीस त्या आधारे या प्रकरणाचा छडा लावून पुढील कारवाई करणार आहेत. सध्या समनापूरमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून तेथे तणावपूर्ण शांतता आहे.

Visits: 210 Today: 4 Total: 1105200

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *