आक्षेपार्ह मजकूर प्रकरणात जिल्ह्यातील तिघांना अटक! संतप्त जमावाची गावभर घोषणाबाजी; भावना दुखावणार्‍या 34 जणांविरोधात गुन्हा..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
सोशल माध्यमातील फेसबुक नेटवर्कींग साईटवर मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावतील अशा आशयाचा मजकूर प्रसारित करुन सौहार्दाचे वातावरण बिघडवण्याची घटना शुक्रवारी समोर आली. या प्रकरणात संगमनेर शहर पोलिसांनी विविध ठिकाणच्या एकूण 34 जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून आज पहाटे जिल्ह्यातील तिघांना अटक करण्यात आली आहे, त्यात संगमनेर तालुक्यातील एकाचा समावेश आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर शहराच्या विविध भागातून संतप्त झालेले जमाव घोषणाबाजी करीत पोलीस ठाण्याच्या दिशेने गेल्याने संपूर्ण शहर दहशतीखाली आले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.दीपाली काळे शुक्रवारी मध्यरात्रीपासून संगमनेरात ठाण मांडून आहेत. सध्या शहरातील बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली असून अतिरीक्त कुमकही मागवण्यात आली आहे. सध्या शहरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांनी गस्तही वाढवली आहे.

मुस्लिम समाजाच्या भावना दुखावण्याच्या हेतूने शुक्रवारी (ता.12) सोशल माध्यमातील फेसबुक नेटवर्कींग साईटचा वापर करण्यात आला. या साईटवर असलेल्या ‘अँटोनिया माइनो’ या बोगस नावाच्या सोशल खात्यावरुन सदरचा वादग्रस्त मजकूर प्रसारित करण्यात आला. याशिवाय संबंधिताने सदरचा मजकूर प्रसारित करताना संगमनेरातील एका हिंदुत्त्ववादी संघटनेलाही त्यात ‘टॅग’ केल्याने सदरचा मजकूर संगमनेरातूनच प्रसारित झाला अशी अफवा पसरली. त्यानंतर या संतापजनक मजकूराबाबचे वृत्त काही वेळातच शहरासह संपूर्ण तालुक्यात अतिशय वेगाने पसरले. त्यामुळे धार्मिक भावना दुखावलेले मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने दिल्ली नाका परिसरातील तीनबत्ती चौकात जमा झाले. यावेळी येथे प्रचंड घोषणाबाजी झाल्याने वातावरण तणावपूर्ण बनले. परिस्थिती हाताबाहेर जावू नये यासाठी मुस्लिम समाजातील आजी-माजी नगरसेवकांसह काही वयस्कर नागरिक व मान्यवरांनी जमावाची समजूत घालून संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलिसांना निवेदन देण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार तीनबत्ती चौकात जमलेला हा संपूर्ण जमाव घोषणाबाजी करीत पोलीस ठाण्यात पोहोचला. यावेळी संगमनेर उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक राहुल मदने व शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी जमावाला सामोरे जात त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. यावेळीही संबंधितांवर कारवाईसाठी जोरदार घोषणाबाजी झाल्याने या परिसरातील तणावातही भर पडली. त्यातच सदरचा प्रकार ज्याप्रमाणे शहरातील विविध भागात पोहोचला त्याप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणांहून तरुणांचे टोळकेच्या टोळके रस्त्याने घोषणाबाजी करीत पोलीस ठाण्याच्या दिशेने जावू लागले. असल्या घटना गवंडीपुरा मशिदीपासून जुन्या पोस्टाकडे जाणार्‍या रस्त्यावर, लिंकरोड मार्गे बसस्थानकाकडे जाणार्‍या रस्त्यावर, मेनरोड परिसरासह बाजारपेठेत घडल्याचे दिसले. त्यामुळे शहरात दहशतीचे वातावरण निर्माण होवून मोठा तणाव निर्माण झाला होता. बहुतेकांना नेमके काय घडले आहे याची कल्पनाच नसल्याचे त्रिपुरा, मालेगाव अशा वेगवेगळ्या संदर्भातून अफाट अफवा पसरत होत्या. संगमनेर शहरात असे भयावह वातावरण जवळपास दोन दशकांनंतर निर्माण झाले होते.

घडलेला प्रकार अत्यंत गंभीर आणि भावना दुखावणारा असल्याने मुस्लिम धर्मियांच्या भावनांचा अनादर करणार्‍यांना सोडणार नाही असे ठाम आश्वास पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांनी जमावाला दिले. असे कृत्य करणार्‍यांनी बनावट नावाचा वापर करुन सोशल साईटवर खाते उघडले आहे. त्यामुळे तांत्रिक तपासातूनच खरे चेहरे समोर येवू शकतात असे सांगून त्यांनी यासाठी अहमदनगरच्या सायबर पोलिसांची मदत घेतली जात असल्याचे जमावाला सांगितले. त्यामुळे जमलेला जमाव बर्‍याच अंशी शांत झाला, मात्र जोपर्यंत दोषी असलेल्यांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत पोलीस ठाण्याचे आवार सोडणार नसल्याची भूमिका जमावाने घेतली.

त्यानुसार शहर पोलिसांनी जोर्वेनाका परिसरातील मोहम्मदीया मशिदीचे मुफ्ती मौसिन सनमान खान यांच्या फिर्यादीवरुन सोशल माध्यमातील फेसबुक या सोशन नेटवर्कींग साईटवर ‘अँटोनीया माइनो’ या बनावट नावाने खाते असलेल्या व्यक्तिने मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावतील अशा आशयाचा मजकूर प्रसारित केल्यावरुन शहर पोलिसांनी त्याच्यासह विनय राठौर, दादा पवार, आदी गोस्वामी, विद्रोही जनक हेप्तुल्ला, महाबली दुर्मुख, अर्जुन देशमुख, पीयूष पीयूष, सुनीता गायकवाड, पॉलिटिकल बोका, द ट्रोलर, ऋषी ठाकरे, शशीकांत कानशेट्टी, ए.जे.ए.वा हीींिं://श.ेे.श.वा/य, आऊल बाबा, बाल्की अनिल, विकी गुरव, अजय वर्मा, योगेश देशमुख, धर्मवीर भारद्वाज, हरीष पाटील, जितेंद्र पाटील, गणेश दंदडे, डॉ.कॅप्टन जॅक, श्रीनिवास मुंडे, जयसिंगदेव दुधाणी, अमित भोंढवे, पार्थ डी. हिंदू, मच्छिंद्र देवकाते, श्रेयस चंदनशिवे, दीपक शरद चन्ने, दशरथ गाडे व राजू भैय्या अशा एकूण 34 जणांवर भारतीय दंडसंहितेचे कलम 153, 295 (अ) व भारतीय तंत्रज्ञान अधिनियमाचे (सायबर अ‍ॅक्ट) कलम 67 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

सदर प्रकार समोर येताच पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांनी वेगाने सूत्रे हलवित नगर येथील सायबर विभागाची मदत घेतली. सदर घटनेबाबत संपूर्ण शहरात चर्चा सुरू झाल्याने त्यातून शांतता सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी त्यांनी आपल्या विभागातील संगमनेर तालुका, घारगाव व आश्वी येथील अधिकार्‍यांसह संपूर्ण पोलीस बळ संगमनेरात बोलावले, याशिवाय अकोले व राजूर पोलिसांना सज्ज राहण्याचे आदेशही देण्यात आले. या प्रकरणातील वादग्रस्त मजकूर प्रसारित करणार्‍यासह तो लाईक करणारे बहुतेकजण बनावट नावाचा वापर करीत असल्याचे सुरुवातीलाच स्पष्ट झाल्याने या प्रकरणाच्या तांत्रिक तपासाशिवाय ठोस काही हाती लागण्याची शक्यता नव्हती. त्यामुळे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून श्रीरामपूर विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे यांना तत्काळ संगमनेरात जावून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे निर्देश दिले.

त्यासोबतच पोलीस अधीक्षकांनी सायबर विभागाचे निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले, उपनिरीक्षक प्रतीक कोळी यांना तांत्रिक माहिती शोधण्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके यांना संशयीतांची माहिती काढण्याचे आदेश दिले. संगमनेर शहर पोलिसांनीही वेगवेगळ्या माध्यमातून एकीकडे दोषींचा शोध सुरू केला तर दुसरीकडे संतप्त होवून प्रचंड घोषणाबाजी करणारा आणि वातावरणात एकसारखा तणाव वाढवणार्‍या जमावाला शांत ठेवण्याची किमया केली. मुस्लिम धर्मियांतील आजी-माजी नगरसेवकांची भूमिकाही महत्त्वाची ठरल्याने अतिशय आक्रमकपणे घोषणाबाजी करीत हजारोंच्या संख्येचा जमाव होवूनही कोणतीही अनुचित घटना घडली नाही. या दरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारावर संशयितांच्या धरपकडीलाही सुरुवात झाली आणि मध्यरात्री नंतर एकूण आरोपीतील तिघांची खरी ओळख समोर आणण्यात पोलिसांना यश आले.

तांत्रिक आधारावर त्यांची सद्दस्थिती शोधून पोलिसांनी संगमनेर तालुक्यातील माळेगाव हवेली येथील ऋषीकेश ठाकरे (वय 21), नेवासा तालुक्यातील सोनई येथील अमित भोंडवे (वय 25) व अहमदनगरमधील भिस्तबाग परिसरात राहणार्‍या शुभम राजहंस (वय 22) या तिघांना अटक केली आहे. त्यांना आज न्यायालयासमोर हजर करुन त्यांच्या कोठडीची मागणी करण्यात येणार आहे. या घटनेत संबंधित व्यक्तीने संगमनेरातील एका हिंदुत्त्ववादी संघटनेला ‘टॅग’ करुन संगमनेरातील सौहार्दाचे वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. पोलिसांनी केवळ घटना म्हणून या गोष्टीकडे न पाहता यामागील हेतूचा शोध घेण्याची गरज आहे. अन्यथा या घटनेनंतर होणारी कारवाई केवळ निर्माण झालेल्या वातावरणावर फुंकर मारल्यासारखी ठरेल.

कोणाच्याही धार्मिक भावना दुखावणे कायद्याने गुन्हा आहे. सदर प्रकरणाची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. या घटनेत सहभागी असणार्‍या बहुतकांचे सोशल खाते बनावट नावाचा वापर करुन तयार करण्यात आले आहे. त्यामुळे त्याचा तपास तांत्रिक आधारावर अवलंबून असल्याने पोलीस अधीक्षकांच्या आदेशावरुन सायबर विभागाकडून प्रत्येक संशयीताची नेमकी माहिती काढण्याचे काम सुरू आहे. पोलिसांनी एकूण 34 जणांविरोधात गुन्हा दाखल करुन त्यातील तिघांना अटकही केली आहे. कायदा आणि व्यवस्थेला बाधा आणण्याचा प्रयत्न करणार्‍या कोणाचीही गय केली जाणार नाही. शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बळ तैनात करण्यात आले असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये व शांतता पाळावी.

– राहुल मदने
उपविभागीय पोलीस अधिकारी, संगमनेर

Visits: 12 Today: 1 Total: 115516

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *