कोविडने घेतला तालुक्यातील दोघा ‘देवमाणसांचा’ बळी! अवघ्या चौदा दिवसांतच साडेसहाशे रुग्णांची भर पडली तर अकरा जणांचे जीवही गेले
नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुक्याच्या ग्रामीणभागात सुरु झालेला कोविडचा कहर दिवसोंदिवस उग्ररुप धारण करीत आहे. दररोज मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या समोर येण्यासोबतच कोविडचा संसर्ग होवून मृत्यु होण्याचे प्रमाणही वाढल्याने तालुक्यात कोविडची दाहकता वाढल्याचे दिसत आहे. गेल्या 1 सप्टेंबरपासून दररोज सरासरी 47 रुग्णांची वाढ होत तालुक्याच्या रुग्णसंख्येत तब्बल 660 रुग्णांची नव्याने भर पडली आहे, तर या महिन्यात आत्तापर्यंत अकरा जणांचे बळीही गेले आहेत. याच श्रृंखलेत सोमवारी वेल्हाळे व मंगळापूर येथील दोघा ज्येष्ठ नागरिकांचाही बळी गेला. या दोन्ही नागरिकांचे कार्य खुप मोठे होते, खर्याअर्थी सांगायचे तर कोविडने सोमवारी तालुक्यातील दोघा देवमाणसांचा बळी घेवून आपली दाहकताच अधोरेखीत केली आहे.
संगमनेर शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेले मंगळापूर म्हणजे अमृतवाहिनी प्रवरेच्या पाण्यावर समृद्ध झालेले ग्रामीणभागातील प्रगत खेडे. या गावातील भारदस्त व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित असलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाला कोविडची लागण झाली होती. त्यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचारही सुरु होते. त्या दरम्यानच सोमवारी त्यांना देवाज्ञा झाली आणि आभाळभर काम करुन अवघ्या तालुक्यात आपल्या किर्तीचा सुगंध पसरविणारे ‘अण्णा’ या जगाचा निरोप घेवून निघून गेले. या वेदनादायी वार्तेने केवळ मंगळापूरची पंचक्रोशीच नव्हे तर अवघा तालुका हळहळला.
सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि धार्मिक अशा सगळ्याच क्षेत्रात मोठे योगदान देणारे अण्णा म्हणजे मंगळापूरचे कर्मवीरच. जून्या पीढीतील जाणते व्यक्तिमत्त्व असले तरीही त्यांनी आपल्या शेतीत वेगवेगळे आधुनिक प्रयोग करुन प्रगतशिल शेतकरी होण्याचा बहुमान प्राप्त केला होता. साधारणतः दोन दशकांपूर्वी मंगळापूरात शाळेची इमारत उभी करण्याचा घाट सुरु झाला, मात्र गावात शाळा नको अशी भूमिका अनेकांनी घेतल्याने मंगळापूरातील शिक्षण घेवू इच्छिणारी मुलं हिरमुसली. त्यांच्या चेहर्यावरील शिक्षणाचा भाव हेरुन अण्णांनी आपल्या घरातील खोल्या रिकाम्या केल्या आणि आपल्या वस्तीवरच शाळा भरवण्याचा प्रस्ताव ठेवला. तेव्हापासून तब्बल बारा वर्ष मंगळापूरची शाळा अण्णांच्या वस्तीवर आणि अण्णांच्याच छत्रछायेखाली सुरु होती. अशा या कर्मयोग्याला कोविडने गाठून सोबत नेल्याने मंगळापूरसह संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे.
त्यासोबतच कालच्या सोमवारने संगमनेरकरांना आणखी एक धक्का दिला. तालुक्यातील वेल्हाळे शिवारात राहणार्या एका 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला दोनच दिवसांपूर्वी कोविडचे संक्रमण झाल्याचे समोर आले होते. कोविडने त्यांना असं काही जखडलं की त्यात त्यांचा बळीच गेला. वेल्हाळ्यातील एका जागृत दर्ग्याची सेवा करतांना त्यांनी अडलेल्या असंख्य नागरिकांना समाधानाचा मार्ग दाखवला. तुटपूंज्या कमाईतही आनंद मानवणारा आणि विनामूल्य लोकसेवा करणारा हा अवलिया वेल्हाळे परिसरात ‘बाबा’ या नावाने ओळखले जात. त्यांच्या निधनाने ‘त्या’ दर्ग्याला दर्शनासाठी जाणार्यां अनेकांना धक्का बसला आहे. कोविडने एकाच दिवसांत संगमनेर तालुक्यातील दोघा देवदूतांवरच घाला घातल्याने अवघा तालुका शोकाकूल झाला आहे. या दोघांच्या मृत्युने संगमनेर तालुक्यातील कोविड बळींची संख्या 37 वर पोहोचली आहे. यातील एकाचा मृत्यु अन्य तालुक्यात गृहीत धरला जाण्याची शक्यता आहे.
गेल्या 1 सप्टेंबरपासून तालुक्यातील कोविडची दाहकता अधिक वाढल्याचे दिसत आहे. पहिल्या आठवड्यात कोविडने सरासरी प्रती दिवस दहा या वेगाने शहरातील 71 जणांना तर ग्रामीण क्षेत्रात सरासरी 37 रुग्ण प्रती दिवस या वेगाने 263 रुग्णांसह तालुक्याच्या रुग्णसंख्येत 334 रुग्णांची भर घातली. या पहिल्याच आठवड्यात कोविडने शहरातील तिघांसह आठ जणांचे बळी घेतले, त्यात दोघा महिलांचा समावेश आहे. तर दुसर्या आठवड्यातही शहरात सरासरी साडेसात रुग्ण प्रती दिवस या गतीने 53 तर ग्रामीणभागात प्रती दिवस सरासरी 46.57 दराने 326 रुग्णांची भर घातली. दुसर्या आठवड्यातही हिवरगाव पठार, वेल्हाळे व मंगळापूर येथील तिघांचा बळी गेल्याने सप्टेंबरचा पहिला पंधरवडा शहराच्या रुग्णसंख्येत 8.86 रुग्ण प्रती दिवसाच्या गतीने 124 रुग्ण तर ग्रामीणभागात प्रती दिवस 42 रुग्ण या वेगाने 589 रुग्णांची भर घालणारा ठरला. या कालावधीत एकुण अकरा जणांचे बळीही गेले आहेत.
सोमवारी तालुक्यातील दोघा ज्येष्ठ नागरिकांचा बळी गेल्याचे वेदनादायी वृत्त समोर आले. यातील मंगळापूरातील 65 वर्षीय व्यक्ति ‘अण्णा’ नावाने परिसरात परिचित होती. आभाळभर काम करणार्या या व्यक्तिच्या मृत्युने समाजाने एक कर्मयोगीच गमावल्याची भावना या घटनेनंतर व्यक्त झाली. तर वेल्हाळे शिवारातील दावल मलिक बाबांच्या दर्ग्याची दिवाबत्ती करणार्या 65 वर्षीय इसमाचाही मृत्यु झाल्यशाची वार्ता सोमवारी समोर आल्याने अनेकांचे डोळे न कळत पाणावले. या दोन्ही व्यक्ति तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात अग्रेसर होत्या.