रोटरी आय बँकसाठी संगमनेर नगरपरिषद जागा देणार ः तांबे संगमनेर रोटरी क्लबचा पदग्रहण समारंभ थाटामाटात संपन्न
नायक वृत्तसेवा, संगमनेर
सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्या रोटरी क्लब संगमनेरचा पदग्रहण समारंभ मंगळवारी (ता.27) मालपाणी हेल्थ क्लब येथे मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. यावेळी नूतन अध्यक्ष योगेश गाडे यांनी मावळते अध्यक्ष पवनकुमार वर्मा यांच्याकडून अध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतली. तर सचिव म्हणून ऋषीकेश मोंढे तर उपाध्यक्षपदी महेश वाकचौरे यांनी पदभार स्वीकारला.
या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉक्टर सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, रोटरीचे माजी प्रांतपाल दीपक पारिख, सहप्रांतपाल दिलीप मालपाणी उपस्थित होते. संगमनेर नगरपालिकेच्या आवारात सुरू असलेल्या रोटरी नेत्र रुग्णालयाने जागतिक स्तरावर आपली छाप सोडली आहे याचा आम्हांला अभिमान आहे. अहमदनगर जिल्ह्यातून गरजू रुग्णांवर तिरळेपणा, मोतीबिंदू या आजारांवर मोफत उपचार करून रोटरीने त्यांना दिव्यदृष्टी प्राप्त करून दिली आहे. संगमनेर रोटरीच्या या कामाची जागतिक स्तरावर नोंद घेतली असून या हॉस्पिटलच्या आवारातच आता आय बँक सुद्धा व्हावी जेणेकरून नेत्रदानासारखे मोठे काम संगमनेरमध्ये होईल, यासाठी संगमनेर रोटरी सदस्य सतत प्रयत्नशील आहेत. नगरपालिकेमार्फत शासन स्तरावर या योजनेच्या मंजुरीसाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. सध्या हा प्रस्ताव मंत्रालयात गेलेल्या असल्यामुळे लवकरच यावर सकारात्मक निर्णय होऊन आय बँकसाठी लागणारी जागा नगरपालिका उपलब्ध करून देईल अशी ग्वाही नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी उपस्थितांना दिली.
माजी प्रांतपाल प्रमोद पारिख यांनी संगमनेर रोटरीचे काम खूप सुंदर असून कोविड आपत्तीग्रस्त विधवा महिलांसाठी एक हात मदतीचा या शिलाई मशीन वाटपाच्या प्रकल्पाला संपूर्ण जिल्ह्यातून आम्ही मदत करत असल्याचे सांगितले. सर्व भगिनींना शिलाई मशीन मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून, रोटरी इंटरनॅशनलतर्फे जास्तीत जास्त शिलाई मशीन आम्ही मिळवून देऊ अशी ग्वाही त्यांनी दिली. आपल्या अध्यक्षीय भाषणात आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी नूतन पदाधिकार्यांचे अभिनंदन केले. तसेच समाजातील दानशूर व सामाजिक कार्याची आवड असणार्या व्यक्तींनी रोटरी क्लब सारख्या संस्थांच्या माध्यमातून समाजसेवा करावी असे आवाहन केले. त्यांनी क्लबमध्ये सुरवातीच्या काळात आपण कसा सहभाग नोंदविला होता या आठवणींना उजाळा दिला.
या समारंभात सर्व रोटरी सदस्यांनी कोविड संबंधीचे नियम पाळून सहभाग नोंदविला. लातूर येथील मानवता विकास प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय मानव विकास पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मावळते अध्यक्ष पवनकुमार वर्मा व श्री श्री रवीशंकर विद्यालयाच्या अध्यक्षा स्वाती शाह यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन डॉ. सागर गोपाळे व विश्वनाथ मालाणी यांनी केले तर आभार ऋषीकेश मोंढे यांनी मानले.