आढळातून रब्बीसाठी पहिले आवर्तन सुटले शेतकर्‍यांची अत्यल्प मागणी; केवळ 153 हेक्टर क्षेत्र भिजणार

नायक वृत्तसेवा, अकोले
आढळा धरणातून सोमवारी (ता.7) सकाळी 6 वाजता रब्बी हंगामासाठी 30 क्युसेकने आवर्तन सोडण्यात आले आहे. 3 हजार 914 हेक्टर सिंचनक्षम क्षेत्रापैकी उजव्या आणि डाव्या कालव्यावर केवळ 153 हेक्टर इतक्या अत्यल्प क्षेत्रासाठी हे आवर्तन सोडण्यात आल्याची माहिती जलसंपदाचे शाखा अभियंता रजनीकांत कवडे यांनी दिली आहे. रब्बी हंगामासाठी एकमेव आवर्तन मिळणार असून उर्वरीत पाण्याचा वापर लाभक्षेत्रासाठी उन्हाळ्यात होईल, असेही जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे.

अकोले, संगमनेर आणि सिन्नर तालुक्यातील 15 गावांना शेतीसाठी पाणी पुरवठा देवठाण येथील 1060 दलघफू पाणीसाठा क्षमतेच्या मध्यम प्रकल्पातून होत असतो. सध्या 977 दलघफू पाणीसाठा उपलब्ध आहे. सोमवारी सकाळी उजव्या आणि डाव्या कालव्यातून साधारण 30 क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले आहे. शेतकर्‍यांच्या मागणीनुसार हळूहळू ही मर्यादा वाढविली जाणार आहे. उजव्या आणि डाव्या कालव्यावर अनुक्रमे 36 आणि 117 हेक्टर क्षेत्राने पाणी मागणी झालेली आहे.

देवठाण, वीरगाव, हिवरगाव आंबरे, पिंपळगाव निपाणी, डोंगरगाव, जवळे कडलग, निमगाव भोजापूर, धांदरफळ, वडगाव लांडगा, चिकणी, नळवाडी, कासारवाडी, राजापूर ही 15 गावे प्रामुख्याने आढळेच्या लाभक्षेत्रात असली तरी वडगाव आणि जवळे कडलग वगळता इतर गावांची पाणी मागणी नगण्यच आहे. पाणी मागणी कमी असल्याने पहिले आवर्तन साधारण 15 दिवसांचे गृहीत धरले तरी 136 दलघफू पाणीवापर होण्याची शक्यता आहे. सदर आवर्तन यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी दोन्ही कालव्यांची आणि वितरिकांची स्वच्छता जलसंपदाने आवर्तनापूर्वीच केल्याने लाभक्षेत्रात पाण्याचा अपव्यय होणार नाही. आवर्तन यशस्वी करण्यासाठी जलसंपदाचे संगमनेर उपविभागीय अभियंता शेवाळे व अकोले योगेश जोर्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा अभियंता रजनीकांत कवडे, कालवा निरीक्षक मयूर देशमुख, यू. एन. आभाळे आणि कर्मचारी प्रयत्नशील राहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *