रविवारच्या घटनेप्रकरणी आत्तापर्यंत सोळाजण अटकेत! पोलिसांचे ‘कोम्बिंग’ ऑपरेशन; जोर्वेनाक्यावर चौकीही उभारणार..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
‘हॉर्न’ वाजवल्याच्या किरकोळ कारणावरुन रविवारी सुमारे दीडशे जणांच्या जमावाने जोर्वे येथील आठजणांना बेदम मारहाण करण्याचा प्रकार घडला होता. या घटनेनंतर संगमनेर शहरासह आसपासच्या ग्रामीणभागातही तणाव निर्माण झालेला असतांना पोलिसांनी आता या दंगलीत सहभागी असणार्यांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली असून सोमवारी रात्री जोर्वेनाका परिसरात ‘कोम्बिंग’ ऑपरेशन राबवून दहा जणांना अटक करण्यात आली आहे, या प्रकरणात आत्तापर्यंत सोळाजणांना कारागृहात टाकण्यात आले असून उर्वरीत आरोपींचा कसून शोध सुरु आहे. त्यासोबतच पोलिसांनी जोर्वेनाका परिसरात कायमस्वरुपी पोलीस चौकी सुरु करण्याच्याही हालचाली सुरु केल्या आहेत.
गेल्या रविवारी (ता.28) जोर्वेनाका परिसरात घडलेल्या या घटनेला तेथील बेसुमार अतिक्रमण आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा वावर कारणीभूत असल्याचे मानले जाते. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सुमारे दीडशे जणांवर जीवे ठार मारण्याच्या प्रयत्नासह शस्त्र काद्यानव्ये गुन्हे दाखल करुन आरोपींची ओळख पटविण्यास सुरुवात केली आहे. मात्र अटकेच्या भितीने जमावात मर्दुमकी दाखवणारे टेर्यांना पाय लावून पसार झाल्याने सोमवारी पहाटे अवघे सहाजण हाती लागले होते.
सोमवारी अहमदनगरच्या नियंत्रण कक्षातून अतिरीक्त बंदोबस्त प्राप्त झाल्यानंतर मध्यरात्रीनंतर पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्यासह शहर व तालुका पोलीस आणि राज्य राखीव दलाच्या जवानांनी जोर्वेनाका परिसराची संपूर्ण नाकाबंदी करुन ‘कोम्बिंग’ ऑपरेशन राबविले. त्यात घरात दडून बसलेले दहाजण पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यामुळे रविवारच्या घटनेत थेट सहभाग असलेल्या 16 जणांना आत्तापर्यंत अटक झाली असून त्या सर्वांना आज न्यायालयासमोर उभे करुन त्यांची कोठडी मागीतली जाणार आहे.
याशिवाय आज सकाळी संगमनेरात आलेल्या अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी जोर्वेनाका परिसरात कायमस्वरुपी पोलीस चौकी उभारण्याची सूचना केली आहे. त्यानुसार शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्याशी संपर्क साधून त्यांना या परिसरात जागा उपलब्ध करुन चौकी बांधून देण्याची विनंती केली आहे. त्यामुळे लवकरच या परिसरात कायमस्वरुपी पोलीस चौकीही उभी राहणार असून त्या माध्यमातून येथील अवैध व्यवसाय व त्यातून फोफावलेली दादागिरी नियंत्रणात आणण्यास मदत होणार आहे.
जोर्वेनाक्यावरील घटनेनंतर सदर ठिकाणी कायमस्वरुपी पोलीस चौकी उभारण्याबाबत वरीष्ठांकडून आदेश प्राप्त झाला आहे. त्यानुसार या परिसरात आवश्यक असलेल्या जागेची व त्यावर चौकी बांधून देण्याची विनंती पालिकेला करण्यात आली आहे. लवकरच या ठिकाणी चौकी कार्यान्वीत होईल व तेथे मुबलक पोलिसांची नेमणूक केली जाईल.
भगवान मथुरे
पोलीस निरीक्षक- संगमनेर शहर