हॉटेल पंचवटी गौरवमध्ये टोळक्याचा धिंगाणा महिला कर्मचार्याचा विनयभंग; चौघांना पोलिसांकडून अटक..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
दारुची नशा माणसाला काय करायला लावेल त्याचा नेम नाही. असाच काहीसा प्रकार संगमनेरातील एका नामचीन हॉटेलमधून समोर आला आहे. या घटनेत भरदुपारी दारुच्या नशेत टिंग झालेल्या चौघांनी सुरुवातीला हॉटेलमधील कर्मचार्यांशी हुज्जत खालीत त्यांना शिवीगाळ केली आणि नंतर दहशत निर्माण करीत एका महिला कर्मचार्याचा हात पकडून लज्जास्पद कृत्यही केले. एवढ्यावरच न थांबता या टोळक्याने हॉटेलच्या व्यवस्थापकालाही मारहाण करीत गल्ल्यातून पाच हजार रुपयांची रोकडही लांबविली. हा धक्कादायक प्रकार शहरातील हॉटेल पंचवटी गौरवमध्ये घडला असून पोलिसांनी कोल्हेवाडीतील तिघांसह चौघांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून न्यायालयाने त्यांना बुधवारपर्यंत कोठडीत पाठविले आहे.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरचा प्रकार गेल्या रविवारी (ता.26) दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास हॉटेल पंचवटीमध्ये घडला. यावेळी हॉटेलमध्ये आलेल्या चौघा तरुणांनी मनसोक्त दारु रिचवल्यानंतर तेथील कर्मचार्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्याचा जाब विचारला असता त्यांनी कर्मचार्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाणही केली. हा सगळा प्रकार सुरु असतांना या टोळक्याने हॉटेलमधील एका महिला कर्मचार्याचा हात पकडून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्यही केले. या सगळ्या गदारोळात ‘त्या’ टोळक्याला शांत करण्याचा प्रयत्न करणारे हॉटेलचे व्यवस्थापक नईम शेख यांनाही मारहाण करण्यात आली व त्यांच्या ताब्यातील गल्ल्यातून पाच हजार रुपयांची रोकडही लंपास केली गेली.

या प्रकरणी हॉटेलचा कर्मचारी प्रणय देवासीस मायती (मूळ रा. पश्चिम बंगाल) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी तालुक्यातील कोल्हेवाडी येथील सुशांत बाबासाहेब जोंधळे (वय 21, रा.कौठे कमळेश्वर), अनिल विलास कोल्हे (वय 27), ऋषीकेश गणपत काळे (वय 21) व अक्षय भारत कोल्हे (वय 18, तिघेही रा. कोल्हेवाडी) यांच्याविरोधात भारतीय दंडसंहितेचे कलम 395, 354, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करुन चौघांनाही अटक केली आहे. सोमवारी (ता.27) त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता त्या चौघांनाही बुधवारपर्यंत (ता.29) पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे.

