संगमनेर खुर्द मधील जुगार अड्ड्यावर शहर पोलिसांचा छापा! सव्वा तीन लाख रुपयांच्या मुद्देमालासह दहा जण ताब्यात; शहरातील पाचजणांचा समावेश..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
अमृतवाहिनी प्रवरा माईच्या पैलतीरावरील संगमनेर खुर्दमध्ये शहर पोलीस व अधीक्षकांच्या पथकाने संयुक्त छापा घालीत मोठा जुगार अड्डा उजेडाचा आणला आहे. या कारवाईत पोलिसांनी 23 हजार रुपयांच्या रोकडसह एकूण तीन लाख 26 हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यावेळी तिरट नावाचा जुगार खेळताना दहा जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्या सर्वांवर मुंबई जुगार अधिनियमातंर्गत कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुप्त बातमीच्या आधारावर आज रात्री नऊ वाजेच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब यादव यांच्या नेतृत्वाखाली हा छापा घालण्यात आला. संगमनेर खुर्द शिवारातील जुन्या संगमनेर-पुणे रस्त्यावर आडोशाला असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये हा जुगार सुरु होता.
पोलिसांनी रात्री नऊच्या सुमारास या शेडवर छापा घातला त्यावेळी तेथे तिरट नावाचा हारजीत असलेला तीन पत्त्यांचा खेळ सुरू असल्याचे व घोळक्याने बसलेल्या लोकांच्या मध्यभागी पैशांची रास असल्याचे पोलिसांना दिसले. त्या सर्वांना त्याच स्थितीत उभे राहण्याचे आदेश देत पोलिसांनी जुगारासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व साहित्यासह 23 हजार 400 रुपयांची रोख रक्कम आणि जुगार खेळताना आढळून आलेल्या दहा जणांचे मोबाईल व दुचाकी असा एकूण तीन लाख 26 हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
यावेळी जुगार खेळताना आढळलेल्या शुभम गोपाल शाहू (वय 28, रा. साईनगर, संगमनेर), प्रशांत एकनाथ जोर्वेकर (वय 45 रा. जोर्वेरोड), राजेंद्र मल्लू गायकवाड (वय 46 रा. शिवाजीनगर, संगमनेर), वसंत दुर्गा शिंदे (वय 51 रा. रायतेवाडी फाटा), दशरथ शिवराम भुजबळ (वय 51 रा. इंदिरानगर, संगमनेर), बाळासाहेब भीमा मांडे (वय 42) व नवनाथ कारभारी पानसरे (वय ४८ दोघेही रा. जाखुरी), जुबेर नवाब शेख (वय 50 रा. वॉर्ड क्र. एक, श्रीरामपूर), दिनेश श्याम जाधव (वय 35 रा. अकोले नाका) व अनिल एकनाथ राक्षे (वय 47 रा. संगमनेर खुर्द ) अशा एकूण दहा जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर मुंबई जुगार कायद्याच्या कलम 12 नुसार प्रतिबंधात्मक कारवाई कारवाईन करण्यात आली आहे.
Visits: 29 Today: 2 Total: 116634