सोमनाथ वाघचौरे संगमनेरचे नवीन पोलीस उपअधीक्षक! जिल्ह्यातून तिघे गेले तर चौघे आलेे ; मिटके श्रीरामपूरहून शिर्डीत तर सातव शेवगावमध्ये..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्याच्या गृहविभागाने 139 उपविभागीय पोलीस अधिकारी व सहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकार्यांच्या बदल्यांसह 143 अधिकार्यांची पदोन्नतीने पदस्थापना केली असून सोमवारी रात्री उशिराने याबाबतचे आदेश काढण्यात आले आहेत. त्यामुळे गेल्या मोठ्या कालावधीपासून ‘प्रभारीराज’ असलेल्या संगमनेर उपविभागाला आता सोमनाथ वाघचौरेंच्या रुपाने उपविभागीय अधिकारी लाभले असून यापूर्वी त्यांनी जिल्ह्यात तीन वर्ष सेवा बजावली आहे. धडाकेबाज पोलीस अधिकारी म्हणून ओळख असलेल्या श्रीरामपूरच्या पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांचीही शिर्डीत बदली झाली आहे. याशिवाय नगर ग्रामीण, कर्जत व शेवगाव विभागासाठी नव्याने अधिकार्यांची नियुक्ती झाली असून जिल्ह्यातून तिघे बोहर तर चौघे आंत आले आहेत.
गुन्ह्याची उकल करण्यात माहीर असलेल्या आणि कोणत्याही पुराव्याशिवाय संगमनेर उपविभागात झालेल्या तब्बल सात खुनांचे प्रकार उघड करणार्या पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांच्या बदलीपासून रिक्त असलेल्या व शिर्डी उपविभागाकडे प्रभार असलेल्या संगमनेर उपविभागाची प्रतीक्षाही या आदेशाने संपली आहे. यापूर्वी जिल्ह्यात श्रीरामपूर उपविभागात सुमारे दहा महिने आणि त्यानंतर शिर्डीत दोन वर्ष सेवा बजावणार्या सोमनाथ वाघचौरे यांची आता संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.
पोलीस खात्यातील ‘राजा माणूस’ अशी वेगळी असलेल्या वाघचौरे यांनी यापूर्वी जिल्ह्यातील आपल्या तीन वर्षांच्या कार्यकाळात श्रीरामपूर व शिर्डी येथील जबाबदारी सांभाळतांना पथदर्शी काम केले होते. सामान्य नागरीक आणि शेतकर्यांना सहज उपलब्ध होणारा आणि कोणताही आडावेडा न घेता धडक कारवाई करणारा धडाकेबाज अधिकारी अशी त्यांची जिल्ह्याला ओळख आहे. राहुल मदने यांच्यानंतर त्यांचीच संगमनेरात वर्णी लागेल असे वाटत असतांना त्यांचा जिल्ह्यातील कार्यकाळ संपल्याने त्यांना जळगाव जिल्ह्यातील भुसावळ उपविभागात पाठविण्यात आले होते. तेथून आता त्यांची संगमनेरात नियुक्ती झाली असून गेल्या काही महिन्यांपासून खोळंबलेले गुन्ह्यांचे तपास आणि बोकाळलेली गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यास मोठी मदत होणार आहे.
या शिवाय आपल्या कार्यकाळातील बहुतेक काळ श्रीरामपूरसह थेट अहमदनगर, शेवगाव, संगमनेर व शिर्डी उपविभागाचाही वेळोवेळी प्रभारी पदभार घेवून ‘शॉर्ट पिरियड’मध्येही धमाके उडवणारा, जिल्ह्यातील गुन्हेगारी टोळ्यांसह अवैध दारु व वेश्या व्यावसायिकांमध्ये दहशत निर्माण करणारा दबंग अधिकारी अशी ओळख असलेल्या श्रीरामपूर उपविभागाच्या संदीप मिटके यांची शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून बदली झाली आहे. त्यांच्या जागी आनंदा वाघ यांची पदोन्नतीने तात्पूरती नियुक्ती करण्यात आली आहे.
या शिवाय गेल्या जवळपास सहा महिन्यांपासून शिर्डी आणि संगमनेर असा दुहेरी पदभार सांभाळणार्या संजय सातव यांचीही शिर्डीतून जिल्ह्यातच शेवगावचे पोलीस उपअधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कर्जत उपविभागाचे उपअधीक्षक आप्पासाहेब जाधव यांची जिल्ह्याबाहेर सांगली शहरात तर त्यांच्या जागी हिंगोली ग्रामीण मधून आलेल्या विवेकानंद वाखारे यांची, नगर ग्रामीणचे अजित पाटील यांची जिल्ह्याबाहेर करमाळा (सेालापूर ग्रा.) येथे तर त्यांच्या जागी अंबड (जालना ग्रा.) येथून आलेल्या सुनील पाटील यांची नियुक्ती झाली आहे. जात प्रमाणपत्र पडताळणी विभागात कार्यरत असलेल्या सुनील भामरे यांचीही नाशिक ग्रामीणमध्ये बदली करण्यात आली आहे.