आशीर्वाद पतसंस्थेच्या निवडणुकीत ‘परिवर्तन’ मंडळाचा धुव्वा! ‘विकास’ मंडळावर सभासदांचा विश्वास; सर्वच्या सर्व जागा पटकाविल्या..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
शहरातील अग्रगण्य नागरी सहकारी पतसंस्थांमध्ये गणल्या जाणार्‍या आशीर्वाद नागरी सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘आशीर्वाद विकास’ मंडळाने ‘आशीर्वाद परिवर्तन’ मंडळाचा अक्षरशः धुव्वा उडवला. संस्थेच्या नूतन संचालक मंडळाच्या निवडीसाठी रविवारी झालेल्या मतदानाची त्याच दिवशी सायंकाळी मतमोजणी झाली. त्यात ज्येष्ठ नेते दिलीप पुंड व बाळासाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखालील ‘विकास‘ मंडळाकडून उमेदवारी करणार्‍या सर्वच्या सर्व उमेदवारांचा मोठ्या फरकाने विजय झाला. निकालानंतर नूतन संचालकांनी संस्थेच्या सर्वकष विकासासाठी बांधील असल्याचा पुनरुच्चार केला.

संगमनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात विस्तारलेल्या माळी समाजाच्या आर्थिक उत्थानासाठी स्थापन झालेल्या आशीर्वाद नागरी सहकारी पतसंस्थेच्या 13 संचालकांच्या मंडळासाठी रविवारी (ता.21) 1 हजार 655 सभासदांनी मतदान केले. त्यानंतर लागलीच सायंकाळी झालेल्या मतदानाची मोजणी करुन निकालही जाहीर करण्यात आला. प्रत्यक्ष मतमोजणीत त्यातील 110 मतपत्रिका बाद ठरवण्यात आल्या. सर्वसाधारण गटातील दहा जागांसाठी वैध ठरविण्यात आलेल्या मतांमध्ये आशीर्वाद विकास मंडळाच्या बाळासाहेब मधुकर ताजणे व अरुण गंगाधर हिरे यांनी तब्बल 79 टक्के (प्रत्येकी 1220 मते) मते मिळवित विक्रम केला.

त्या खालोखाल सोमनाथ गोडाजी अभंग (1205 मते), रामनाथ बजाबा अभंग (1180 मते), राजेश नामदेव ढोले (1172 मते), सीताराम शिवराम अभंग (1169 मते), धनंजय अशोकराव डाके (1144 मते), अरुण माधवराव पुंड (1143 मते), विलास दत्तात्रय मंडलिक (1026 मते) व रवींद्र कारभारी पावबाके (1006 मते) घेवून विजयी झाले. विरोधी आशीर्वाद परिवर्तन मंडळाच्या श्याम लक्ष्मण अभंग (430), संपत रामचंद्र गलांडे (427), सुनील मारुती अभंग (368), अमित पंढरीनाथ मंडलिक (357), प्रसाद ज्ञानदेव गोरे (308), माधव त्र्यंबक भरीतकर (283), सुनील दत्तात्रय मंडलिक (258), विजय मारुतराव डाके (238) व सुभाष हरीभाऊ पावबाके यांना अवघी 96 मते मिळाल्याने या गटातील सर्व उमेदवारांना दारुण पराभवाचा सामना करावा लागला.

महिला राखीव मतदारसंघातही आशीर्वाद विकास मंडळाने बाजी मारताना रुपाली संतोष मेहेर यांनी 1 हजार 280 व अर्चना महेश चिपाडे यांनी 1 हजार 26 मते मिळवित विरोधी गटाच्या संगीता कैलास घोडेकर (753) यांचा पराभव केला. विजयाची घोडदौड कायम राखतांना विकास मंडळाच्या अरुण लहानू ताजणे (1099) यांनी इतर मागास प्रवर्गात परिवर्तन मंडळाच्या श्याम लक्ष्मण अभंग यांचा 582 मतांनी पराभव करीत विजयश्री मिळवली. तर विकास मंडळाच्या सुनील पुनाजी दाभाडे व बाळासाहेब जगन्नाथ दासरी यांची अविरोध निवड झाली. मतमोजणीनंतर माध्यमांशी बोलतांना आशीर्वाद विकास मंडळाच्या नूतन संचालकांनी निवडणूक संपली आणि त्यासोबत राजकारणही संपल्याचे सांगत संस्थेच्या हितासाठी यापुढे परिश्रमाने कामाला सुरुवात करणार असल्याचे सांगत संस्थेचा सर्वकष विकास हाच आपला ध्यास असल्याचा पुनरुच्चार केला. तालुक्यातील प्रगतीपथावरील आशीर्वाद नागरी पतसंस्थेच्या निवडणुकीत सत्ताधारी विकास मंडळाने मिळविलेल्या विजयाबद्दल माजी महसूल मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे व आमदार सत्यजीत तांबे यांच्यासह अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Visits: 14 Today: 1 Total: 117318

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *