अहिल्यानगरमध्ये निदर्शने करणार्या जमावाकडून दगडफेक! धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप; पोलिसांनी केला बळाचा वापर..

नायक वृत्तसेवा, अहिल्यानगर
दरवर्षी नवरात्रोत्सवात काढल्या जाणार्या ‘दुर्गामाता दौड’ला यंदा गालबोट लागले आहे. अहिल्यानगर शहरातील प्रमुख मार्गावरुन आज सकाळी निघालेल्या या दौडीसाठी अनेकांनी स्वागत कमानी उभारुन आकर्षक रांगोळ्याही चितारल्या होत्या. त्यात कोठला परिसरातील एका रांगोळीत धार्मिक मजकूर लिहिला गेल्याचा आरोप करीत जमावाने रास्तारोको करीत दगडफेकही केली. त्यातून शहरात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत दगडफेक करणार्या काही संशयीतानाही ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे नोंदवण्यात आले असून रांगोळीतून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप असलेल्या संशयीतालाही अटक करण्यात आली आहे. या घटनेने अहिल्यानगरमध्ये काहीकाळ तणाव निर्माण झाला होता, मात्र पोलिसांनी वेळीच कारवाई करीत परिस्थिती नियंत्रणात आणली.

उत्तरप्रदेशातील कानपूरमध्ये ‘आय लव्ह मोहम्मद’ लिहिलेल्या फ्लेक्सवरुन सुरु झालेला वाद आता देशभर पोहोचला आहे. गेल्या पंधरवड्यापूर्वी घडलेल्या तेथील प्रकरणाबाबत उत्तरप्रदेश पोलिसांनी वस्तुस्थिती समोर आणल्यानंतरही त्या घटनेचा बाऊ करुन देशभर त्या विरोधात निदर्शने करण्यात आली. जिल्ह्यातील विविध भागातही गेल्या आठवड्यात आंदोलनं पार पडली आणि तो विषय आता इतिहास जमा झाला असे चित्रही निर्माण झाले असताना आज सकाळी त्याला पुन्हा एकदा धक्का लागला.

शिवप्रतिष्ठान संस्थेच्या वतीने आज अहिल्यानगरमध्ये दुर्गामाता दौड आयोजित करण्यात आली होती. सध्या नवरात्रोत्सव सुरु असल्याने गल्लोगल्ली आणि चौकाचौकात देवीची प्रतिष्ठापना केली गेली आहे. त्यामुळे शहरातील वातावरण धार्मिक बनले आहे. अशातच सकाळी निघणार्या दुर्गामाता दौडीचे स्वागत करण्यासाठी विविध मंडळांनी आपापल्या परिसरात स्वागत कमानी उभारल्या होत्या. काहींनी रस्त्यावर रांगोळ्याही काढल्या होत्या. त्यातील कोठला परिसरात काढण्यात आलेल्या एका रांगोळीवरुन वादाची ठिणगी पडली. सदर रांगोळीतील मजकूर धार्मिक भावना दुखावणारा असल्याचा आरोप करण्यात आला.

त्यातून निर्माण झालेल्या वातावरणाचा फायदा घेत काहींनी एकाला नाहक मारहाण करुन कोटला परिसरात जमावाने जमून रास्तारोको सुरु केला. माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी जमावाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र उलट पोलिसांवरच दगडफेक होवू लागल्याने अखेर पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करीत हुल्लडबाजी करणार्या काहींना ताब्यात घेत रस्त्यात ठाण मांडून बसलेल्यांना आस्मान दाखवले.

जवळपास तासभर जोरदार घोषणाबाजीत महामार्ग खोळंबल्याने दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या. पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, अपर अधिक्षक वैभव कलुबर्मे यांच्यासह पोलिसांनी रस्ता आडवून बसलेल्यांना पिटाळून लावले. त्यानंतर हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला झाला. या प्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले जाणार आहेत.

