नऊ वर्षाच्या चिमुरडीवर नरामधमाचा अत्याचार! सोनेवाडीतील संतापजनक घटना; विकृत आरोपी गजाआड
नायक वृत्तसेवा, संगमनेर
लग्न सोहळ्यासाठी आपल्या आईसोबत आलेल्या अवघ्या नऊ वर्षाच्या चिमुरडीवर नराधमाने अमानुष अत्याचार केल्याची संताजनक घटना तालुक्यातील सोनेवाडीतून समोर आली आहे. या प्रकरणी पीडितेच्या आईने संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी विकृत नराधम रमेश जयराम सांगळे याच्या विरोधात अत्याचारासह बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करुन आरोपीला तत्काळ अटक केली आहे. त्याला आज न्यायालयासमोर उभे करण्यात येणार आहे. या घटनेने सोनेवाडीसह तालुक्यातून संताप व्यक्त होत आहे.
याबाबत तालुका पोलिसांकडून समजलेल्या माहितीनुसार सदरचा प्रकार सोमवारी (ता.15) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास सोनेवाडीतील एका शेतात घडला. मूळच्या सिन्नर तालुक्यातील मात्र सध्या मुंबईत राहणारे एक कुटुंब नातेवाईकाच्या लग्न सोहळ्यासाठी संगमनेर तालुक्यातील सोनेवाडी येथे आले होते. लग्नविधी उरकल्यानंतर रात्रीच्या वरातीचा आनंद घेण्यात पाहुणे मंडळी व्यस्त असतानाच विकृत मानसिकतेचा नराधम रमेश जयराम सांगळे याच्या मनातील वासना चेतली आणि त्याने निरागस असलेल्या अवघ्या नऊ वर्षाच्या बालिकेला खाऊचे आमिष दाखवून जवळच्या शेतात नेले.
‘त्या’ चिमुरडीच्या अज्ञानाचा फायदा घेत त्याने अश्लील कृत्य करीत तिच्यावर अमानुष शारीरिक अत्याचार केले. हा प्रकार समोर आल्यानंतर सोनेवाडी परिसरात एकच खळबळ उडून उपस्थित संतप्त झाले, मात्र त्यावेळी अंधाराचा फायदा घेवून आरोपी पसार झाल्याने तो नागरिकांच्या हाती लागला नाही. घटनेनंतर पीडित मुलीला उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मंगळवारी (ता.16) दुपारी साडेतीन वाजता पीडित मुलीच्या आईने तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी रमेश जयराम सांगळे याच्या विरोधात भारतीय दंडसंहितेचे कलम 376 (अ) (ब), 376 (2) (एफ) सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून सरक्षण करणार्या कायद्याचे (पोक्सो) कलम 4, 8, 12 प्रमाणे त्याला तत्काळ अटक केली.
या प्रकरणाचा पुढील तपास तालुका पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे यांनी आपल्याकडे घेतला असून अटक करण्यात आलेल्या नराधमाला आज (ता.17) न्यायालयासमोर हजर करुन त्याच्या पोलीस कोठडीची मागणी केली जाणार आहे. अज्ञानी असलेल्या अवघ्या नऊ वर्षाच्या चिमुरडीसोबत झालेल्या या प्रकाराने सोनेवाडीसह संपूर्ण तालुक्यातून संताप व्यक्त होत असून त्याला कठोर शिक्षा लागावी अशी अपेक्षा वर्तविली जात आहे.