पालकत्वाला काळीमा; तीन मुलांना ‘बेवारस’ सोडून जन्मदाते परागंदा! पोलिसांकडून मानवतेचे दर्शन; मुलांची तात्पुरती राहण्याची सोय, जेवण व कापडांचीही व्यवस्था..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
बालकांच्या निष्पाप आणि निरागस मनाचा फायदा घेवून त्यांच्या शोषणाचे प्रकार दररोज समोर येत असताना संगमनेरात मात्र पालकत्त्वालाच काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. कोणीतरी अज्ञात जन्मदात्यांनी आपल्या पोटच्या मुलांचा संगोपनाचा हक्क धुडकावित चक्क त्यांना बेवारस अवस्थेत रस्त्यावरच सोडून पलायन करण्याचा संतापजनक प्रकार घडला असून एरव्ही माणूसकी नसल्याचा आरोप होणार्या पोलिसांनीच त्या निरागस मुलांना मायेची ऊब दिली आहे. मंगळवारी सायंकाळी समोर आलेल्या या घटनेतील दोन मुलींसह एका चार वर्षीय मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून तूर्त त्यांची व्यवस्था निराधार मुलांच्या वसतिगृहात करण्यात आली आहे. या प्रकरणी अज्ञात पालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या अन्वये संबंधितांना सात वर्षांच्या कारावासासह जबर दंडाची शिक्षा होऊ शकते.
याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरची घटना मंगळवारी (ता.24) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास इंदिरानगर परिसरातील वेदांत वाईन्स या दुकानाजवळ समोर आली. दिवसभर मोठी वर्दळ असलेल्या या परिसरात सायंकाळच्यावेळी तीन लहान आणि अतिशय निरागस असलेली मुले घाबरलेल्या अवस्थेत मुसमुसून रडत असल्याचे काहींना दिसले. या भागात राहणार्या काही तरुणांनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करीत त्यांच्या पालकांचा पत्ताही काढण्याचा प्रयत्न केला. मात्र या मुलांना भाषा समजत नसल्याने अथवा ती घाबरलेली असल्याने त्या तीनही चिमुरड्यांना काहीएक सांगता आले नाही. हृदयाला पीळ पाडणारा हा प्रसंग पाहून हळहळलेल्या काहींनी त्या मुलांना खाऊ आणि पाणीही देण्याचा प्रयत्न केला, मात्र पालकांच्या विरहाने भेदरलेले ते निष्पाप जीव त्याला प्रतिसाद न देता केवळ रडत राहिल्याने अखेर सदरचा प्रकार पोलिसांना कळविण्यात आला.
याबाबतची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबल अमित महाजन यांनी तत्काळ घटनास्थळाकडे धाव घेत त्या तीनही मुलांना ताब्यात घेतले. त्यांची प्राथमिक चौकशी केली असता ते घाबरलेल्या स्थितीत असल्याने त्यांना मायेचा आधार देत शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. यावेळी पोलीस ठाण्यात हजर असलेल्या अन्य पोलीस कर्मचार्यांनीही त्या निरागस मुलांशी संवाद साधण्याचा व त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. हेड कॉन्स्टेबल महाजन यांनी दहा व सहा वर्ष वयाच्या दोन मुली व चार वर्षांच्या लहानशा मुलांंसोबत अतिशय प्रेमाने बोलून त्यांच्या पालकांचे नाव, गाव शोधण्याचा अयशस्वी प्रयत्नही करुन पाहीला, पण त्या मुलांना काही सांगता आले नाही.
अखेर याबाबत वरीष्ठ अधिकार्यांना माहिती देवून हेड कॉन्स्टेबल अमित महाजन यांनी त्या मुलांची तात्पुरती सोय करण्याची जबाबदारी स्वीकारुन त्यांच्या अज्ञात पालकांविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 317 नुसार गुन्ह्याची नोंद केली. त्यानंतर बराच वेळ त्या मुलांशी गप्पा मारुन पोलिसांनी त्यांच्या मनातील भीती घालवण्याचा प्रयत्न केला. सायंकाळी त्यांच्यासाठी जेवणही मागवण्यात आले, पोलीस ठाण्यातील महिला कर्मचार्यांनी ‘त्या’ दोन्ही मुलींसह लहानशा मुलाला आईसारखी माया देत अन्नाचे घास भरले. हेड कॉन्स्टेबल महाजन यांनी बाजारात जावून स्वखर्चाने त्यांच्यासाठी नवीन कापडं आणली. काही तासांपूर्वी ज्यांनी जन्म दिला त्या जन्मदात्यांनीच निर्दयीपणे रस्त्यावर बेवारस सोडलेली ही मुलं पोलिसांकडून मिळालेल्या मायेने अक्षरशः हरकून गेली होती.
कायदेशीर तरतुदीनुसार या मुलांना जास्तवेळ ताब्यात ठेवता येत नसल्याने कालच्या रात्रीसाठी त्यांच्या राहण्याची सुरक्षित व्यवस्था शोधण्यात येवून त्यातील दहा वर्षीय मुलीला स्वयंप्रेरीत संस्थेत तर सहा वर्षीय मुलीसह चार वर्षीय मुलाची रात्रीच्या निवासाची सोय प्रियदर्शनी आदिवासी मुलांच्या वसतिगृहात करण्यात आली होती. आज सकाळी पोलिसांनी पुन्हा त्या तीनही मुलांना तेथून ताब्यात घेवून खासगी वाहनाद्वारे त्यांना अहमदनगर येथील बालकल्याण समितीसमोर उपस्थित केले आहे. त्यांच्या आदेशानंतर या तीनही मुलांना नगरच्या स्नेहालय संस्थेत दाखल करण्यात आले असून हेड कॉन्स्टेबल महाजन स्वतः या निरागस मुलांना घेवून अहमदनगरला गेले होते.
बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी देशात असंख्य कायदे असताना आणि त्याची अंमलबजावणीही तितक्याच जोरकसपणे राबविली जात असताना पालकच आपल्या पोटच्या गोळ्यांवर अशाप्रकारे अत्याचार करीत असतील तर काय? असा सवाल या प्रकारातून उपस्थित झाला आहे. सदरील तीनही मुले लहान आहेत, शहरातील चांगल्या भागात ती आढळून आल्याने आज त्यांची योग्य ठिकाणी व्यवस्थाही झाली. परंतु, सुजाण नागरिक आणि पोलिसांची त्यांच्यावर दृष्टी पडली नसती तर? हा प्रश्न मात्र अनुत्तरीत आहे. पालकत्त्वालाच काळीमा फासणार्या या प्रकरणी दाखल केलेल्या कलमान्वये जर त्या निर्दयी पालकांचा शोध लागला तर त्यांना सात वर्षांच्या कारावासासह जबर आर्थिक दंडाची शिक्षा होवू शकते. हृदयाला पीळ पाडणार्या या घटनेतील तीनही बालके सुदैवाने नागरिकांच्या सहकार्याने पोलिसांपर्यंत पोहोचल्याने त्यांच्या जीवनातील अंधार काहीअंशी सरला आहे.
पोलिसांना माया नसते, माणुसकी नसते अशी ओरड सर्वसामान्यांमधून नेहमीच कानावर येत असते. मात्र मंगळवारी घडलेल्या या घटनेने शहर पोलीस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबल अमित महाजन यांच्यासह अन्य कर्मचारी व महिला पोलिसांनी मानवतेचे सर्वोत्तम उदाहरण उभे केले आहे. लहान मुलांना बालपणापासून पोलिसांचे भय असते, त्यात ही भेदरलेली मुले जेव्हा पोलीस ठाण्यातच आणली गेली तेव्हा त्यांची मानसिक अवस्था काय झाली असेल? पण त्यानंतरच्या काही वेळातच पोलिसांनी आम्हीही माणसंच आहोत आणि तुम्ही विचार करता तशी अजिबातच नाही हे आपल्या कृतीतून दाखवून दिल्याने ताब्यात घेतल्यानंतरच्या दोन तासांनी त्या मुलांच्या गोंडस चेहर्यावर हास्याच्या रेषाही उमटल्या होत्या.