संगमनेर बसस्थानकाला लागलेले चोरट्यांचे ग्रहण सुटेना! आता निवृत्त मुख्याध्यापिकेला लुटले; तब्बल साडेदहा तोळ्यांचे दागिने लंपास..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
चोरट्यांकडून वारंवार हात साफ होवूनही बसस्थानकावरील सुरक्षेबाबत गंभीर नसलेल्या संगमनेर पोलिसांच्या निष्क्रियतेचा फटका सामान्य प्रवाशांना बसत असून या साखळीत आता आणखी एका मोठ्या घटनेचाही समावेश झाला आहे. आपल्या लेकीची दोनतास वाट पाहून तिच्यासह राहुरीकडे निघालेल्या निवृत्त मुख्याधिपिकेच्या पर्सवर डल्ला मारीत चोरट्यांनी थोडे न् थिडके तब्बल साडेदहा तोळे वजनाच्या सोन्याच्या दागिन्यांसह 3 लाख 15 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल लांबविला आहे. या घटनेने शहर पोलिसांची लक्तरे वेशीवर टांगली गेली असून सर्वसामान्य प्रवाशांचे बसस्थानकात येणेच धोक्याचे ठरत असल्याने पोलिसांच्या भूमिकेबाबत संशयासह संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या सोमवारी घडलेल्या या घटनेची बुधवारी रात्री उशिराने नोंद करण्यात आली असून या वृत्ताने संगमनेर बसस्थानकातून प्रवास करणार्‍या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

याबाबत शहर पोलिसांकडून समजलेल्या माहितीनुसार सदरचा प्रकार गेल्या सोमवारी (ता.8) दुपारी दीड वाजेच्या सुमारास संगमनेर बसस्थानकातून राहुरीच्या दिशेने निघालेल्या ‘नाशिक-सोलापूर’ या बसमध्ये घडला. घुलेवाडीतील अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या परिसरात राहणार्‍या निवृत्त मुख्याध्यापिका रजनी सूर्यभान सहाणे (वय 63) या सोमवारी आपल्या भाचीच्या लग्नाला सोनई (ता.नेवासा) येथे जाण्यासाठी सकाळी 11 वाजता संगमनेर बसस्थानकात आल्या. त्यांची मुलगी तालुक्यातील पिंपळगाव कोंझिरा येथे रहात असल्याने ती तेथून संगमनेरला आल्यानंतर ‘त्या’ दोघीही बसने राहुरीकडे जाणार होत्या.

त्यानुसार त्यांची मुलगी अर्चना ज्ञानेश्वर कर्पे या बसस्थानकात आल्यानंतर दोघीही त्यावेळी फलाटावर लागलेल्या ‘नाशिक-सोलापूर’ या बसजवळ आल्या. बसमध्ये चढणार्‍यांची मोठी गर्दी असल्याने धक्काधक्की होत काही वेळाने त्या दोघीही बसमध्ये चढल्या. सदरची बस नगर रस्त्यावरील ज्ञानमाता विद्यालयाजवळ आली असता बसच्या वाहकाने तिकिटाबाबत विचारणा केली असता सहाणे यांनी पैसे काढण्यासाठी आपली पर्स उघडली असता त्यात ठेवलेला दागिन्यांचा डबा गायब असल्याचे त्यांना दिसले. त्यामुळे घाबरलेल्या सहाणे यांनी आपल्या मुलीला डबा सापडत नसल्याबाबत सांगितले.

हा प्रकार ऐकून बसमधील प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. सर्व बॅग, पिशव्या तपासल्यानंतरही दागिन्यांचा डबा सापडला नाही. त्यावेळी बसच्या वाहकाने पोलीस ठाण्यात तक्रार देण्याबाबत त्यांना सूचित केले. मात्र सख्ख्या भाचीचे लग्न असल्याने त्याचा मुहूर्त टाळण्यापेक्षा लग्नकार्य उरकल्यानंतर याबाबत तक्रार देण्याचे त्या दोघींनी ठरविले व त्या राहुरीला गेल्या. वास्तविक लग्नानंतर सहाणे राहुरीतूनच तिरुपती बालाजी येथे कार्यरत असलेल्या मुलाकडे जाणार होत्या, त्यासाठीच त्यांनी दागिन्यांचा डबा सोबत घेतला होता. मात्र तत्पूर्वीच चोरट्यांनी आपला डाव साधला होता.

बुधवारी (ता.10) त्या दोघीही सोनईहून संगमनेरला परतल्यानंतर रात्री उशिराने त्यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात जावून याबाबत तक्रार दाखल केली. त्यावरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करुन या प्रकरणाचा तपास स्वतः पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी आपल्याकडे घेतला. या घटनेत रजनी सहाणे यांच्या पर्समधून अज्ञात चोरट्याने 1 लाख 20 हजार रुपये किंमतीचे चार तोळ्यांचे गंठण, 90 हजार रुपये किंमतीचा तीन तोळे वजनाचा राणीहार, 60 हजार रुपये किंमतीची दोन तोळे वजनाची सोन्याची साखळी, 45 हजार रुपये किंमतीच्या दीड तोळे वजनाच्या दोन अंगठ्या आणि चारशे रुपये मूल्यांच्या दोन चांदीच्या अंगठ्या असा एकूण 3 लाख 15 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने लांबविला. या घटनेने संगमनेर बसस्थानकावर आजही चोरट्यांचेच राज्य असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मागील मोठ्या कालावधीपासून शहरात दररोज चोर्‍या, घरफोडीच्या घटनांसह संगमनेर बसस्थानकातून महिलांचे दागिने व पुरुषांचे पैशांचे पाकिटं लांबविण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. यातील एकाही घटनेचा तपास मात्र आजवर लागलेला नाही. असे असतानाही संगमनेर बसस्थानकात घडणार्‍या घटना मात्र थांबण्याचे नावच घेत नसल्याने पोलिसांच्या भूमिकेविषयी संशयासह प्रवाशांच्या मनात रोष निर्माण झाला आहे. यापूर्वी कधीही बसस्थानकातील चोरीच्या घटनांमध्ये सातत्य दिसून आले नव्हते, मात्र गेल्या दीड-दोन वर्षापासून अशा घटना नियमितपणे घडत असल्याने संगमनेर बसस्थानकाला चोरट्यांचे ग्रहण लागल्याचे दिसून येत असून पोलीस केवळ विद्यार्थी आणि अल्पवयीन दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाया करुन पुरुषार्थ गाजवत असल्याचे दिसत आहे.


मागील काही कालावधीत संगमनेरच्या ‘वैभवशाली’ बसस्थानकातून जवळपास 25 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी ओरबाडून नेला आहे. मात्र अशा घटना टाळून प्रवाशांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यात शहर पोलीस आजही अपयशीच असल्याने त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे राहण्यासह त्यांच्या भूमिकेवरही आता संशय निर्माण झाला आहे. या घटनांचा तपास पोलिसांची विश्वासार्हता कायम ठेवणारा ठरेल, मात्र पोलिसांची आजची कार्यशैली पाहता तपासाचा भाग दिवास्वप्नंच ठरण्याची अधिक शक्यता आहे.

Visits: 212 Today: 2 Total: 1417368

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *