तळेगाव पाणी योजनेला निळवंडेतून पुरवठा करा! सतरा गावांची निवेदनातून महसूलमंत्र्यांकडे मागणी


नायक वृत्तसेवा, संगमनेर
तळेगाव व परिसरातील २१ गावांचा पाणीप्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी या योजनेला निळवंडे धरणातून थेट पाणी पुरवठा करण्यास शासनाने मंजुरी द्यावी, अशी मागणी १७ गावांच्या ग्रामपंचायतींनी ठराव करुन महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे.

या संदर्भात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची १७ गावांतील ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी भेट घेवून या मागणीचे निवेदन सादर केले आहे. या गावांना भेडसावत असलेली पाणी टंचाई, पाणी पुरवठा योजनेकडे थकीत असलेले वीजबिल आणि ग्रामपंचायतींनी यापूर्वी या मागणीसाठी केलेल्या पाठपुराव्याचे कागदपत्रे पालकमंत्र्यांना पुन्हा नव्याने केलेल्या ठरावासह सुपूर्द केले. वर्षानुवर्षे पाण्यापासून वंचित राहिलेल्या गावांना कायमस्वरुपी पाणी मिळावे या उद्देशाने सर्व गावांनी एकत्रित येवून केलेल्या मागणीला पुन्हा एकदा महत्व प्राप्त झाले आहे.

तळेगाव आणि पंचक्रोशीतील २१ गावे गेली अनेक वर्षे पाण्यापासून वंचित होती. या गावांकरीता प्रवरा नदी हा पाण्याचा उद्भव मानून तळेगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. या योजनेमुळे गावांना दिलासा मिळाला असला तरी योजनेपुढे थकीत वीजबिलाअभावी निर्माण होत असलेल्या समस्यांमुळे ही योजना यशस्वीपणे चालू शकत नसल्याची बाब या शिष्टमंडळाने मंत्री विखे पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली आहे.

सद्यपरिस्थितीत या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेपुढे वीजबिल थकबाकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून, ९ कोटी ७२ लाख रुपयांचे वीजबिल सध्या योजनेकडे थकीत असल्याने वीजप्रवाह खंडीत करण्याच्या नोटिसा सातत्याने देण्यात येतात. त्यातच या योजनेकरीता पाण्याचा उद्भव प्रवरा नदी पात्रातून असला तरी, निंबाळे आणि वडगाव पान या दोन ठिकाणांहून पाणी पंपिंग करुन उचलून न्यावे लागत असल्याने यासाठी लागणारा वीज खर्च योजनेवर पडत आहे. पाण्याचा उद्भव ते प्रत्यक्ष तलाव यातील अंतरही मोठे असल्याने बहुतेक वेळा पाईपलाईनमध्ये होणार्‍या बिघाड दुरुस्तीचा खर्चही योजनेवर पडत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर या सर्व गावांनी निळवंडे धरणातून संगमनेर शहरापर्यंत आलेल्या पाईपलाईनचा संदर्भ देवून हिच पाईपलाईन पुढे तळेगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या वडगाव पान येथील तलावास जोडल्यास नैसर्गिक प्रवाहाने या योजनेत पाण्याची उपलब्धता होवू शकते. शहरापासून पाईपलाईन टाकण्याचा खर्चही खूप कमी येईल. तसेच निळवंडे धरणातील पाण्यावर तळेगाव आणि पंचक्रोशीतील गावांचाच हक्क आणि आधिकार असल्याने अनेक वर्षांची असलेली मागणी शासनाने पूर्ण करावी व पाईपलाईन टाकण्यास येणार्‍या खर्चास निधीची उपलब्धता करुन देण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

यापूर्वी या मागणीसाठी ग्रामस्थांनी वेळोवेळी आंदोलनं केली आहेत. पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या लक्षात घेवून महायुती सरकारने खास बाब म्हणून या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेस थेट निळवंडे धरणातून पाईपलाईनद्वारे पाण्याची उपलब्धता करुन दिल्यास दुष्काळी भागावातील गावांना दिलासा मिळेल.
– शरद गोर्डे (निळवंडे भोजापूर पाटपाणी कृती समिती)

Visits: 118 Today: 4 Total: 1115270

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *