संगमनेर बाजार समितीच्या सभापतीपदी ‘पुन्हा’ खेमनर? उपसभापतीपदी निमोण गटातील संचालकाची लागणार वर्णी


नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती-उपसभापती पदाची निवडणूक शुक्रवारी (ता.12) होणार आहे. आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास मंडळाचा बाजार समितीवर दणदणीत विजय मिळवत विरोधी गटाचा सुपडासाफ केला. आता सभापती-उपसभापती पदी कोणाची वर्णी लागणार याची चर्चा झडत असताना पुन्हा एकदा माजी सभापती शंकर खेमनर यांच्या गळ्यात सभापतीपदाची माळ पडणार असल्याची चर्चा होतेय.

संचालक मंडळाच्या अठरा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत विरोधी गटानं मोठी फिल्डींग लावून तगडे उमेदवार रिंगणात उतरविले होते. मात्र, आमदार बाळासाहेब थोरातांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समितीत शेतकरी आणि व्यापार्‍यांसाठी सोयी-सुविधा निर्माण करण्यात आलेल्या आहेत. माजी सभापती शंकर खेमनर यांच्या कारभाराखाली एक परिपूर्ण समिती तयार करण्यात आली. त्यामुळे पुन्हा एकदा बाजार समितीच्या सर्वच मतदारसंघातील मतदारांनी शेतकरी विकास मंडळाच्या उमेदवारांवर विश्वास दर्शविला. आता सभापतीपदी पुन्हा शंकर खेमनर यांच्या नावाला पसंती मिळण्याची शक्यता आहे. तर उपसभापतीपदी नवीन चेहर्‍याला संधी देण्याचा विचार असून, निमोण गटातील संचालकाला पक्षश्रेष्ठी संधी देतील अशी चर्चा होत आहे.

अपक्ष निवडून आलेले संदीप बाळकृष्ण कर्पे हे देखील शेतकरी विकास मंडळात सामील झाल्याने बाजार समितीवर आमदार थोरातांचे निर्विवाद वर्चस्व सिद्ध झालं आहे. सभापती-उपसभापती निवडणूक देखील बिनविरोध होण्याची दाट शक्यता आहे. सभापतीपदासाठी शंकर खेमनर यांचे नाव आघाडीवर असून, त्यांचा कार्यकाळ समाधानकारक राहिला आहे. तर उपसभापतीपद निमोण गटात जाण्याची शक्यता आहे. येथे अत्यंत चुरशीची लढत झाली होती. त्यामुळे येथे निवडून आलेल्या संचालकाच्या गळ्यात उपसभापतीपदाची माळ पडणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी आमच्या प्रतिनिधीला दिली आहे.

Visits: 216 Today: 1 Total: 1849621

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *