सर्व विभागांनी आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करावा ः डॉ. भोसले आपत्ती व्यवस्थापनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक

नायक वृत्तसेवा, नगर
आगामी पावसाळ्याच्या काळात नैसर्गिक आपत्ती पूर प्रतिबंधात्मक आपत्ती व्यवस्थापन उपाययोजनांबाबत आपापल्या विभागाचा अद्ययावत आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिल्या आहेत. नैसर्गिक आपत्ती पूर प्रतिबंधात्मक आपत्ती व्यवस्थापन उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे, जिल्हा कृषी अधीक्षक शिवाजी जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे आदी विभागांचे विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. भोसले पुढे बोलताना म्हणाले, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी विभागात व तालुकास्तरावर नियंत्रण कक्ष तत्काळ स्थापन करावे. आपत्तीच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने सर्व यंत्रणांनी दक्ष राहावे. या पार्श्वभूमीवर अधिकारी कर्मचार्‍यांचे प्रशिक्षण, संकटकालीन बचाव प्रशिक्षण घ्यावे. तालुक्यातील आरोग्य यंत्रणांनी उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पुरेशी आरोग्य विषयक सेवा-सुविधा, औषधसाठा यांचे नियोजन करावे. पुलांचे ऑडिट करावे. गावागावांमधील नादुरुस्त शाळा व इमारतींमध्ये शाळेचे वर्ग भरु नये याकडे लक्ष द्यावे. तसेच विद्युत विभागाने याकाळात विशेष यंत्रणा उभारुन नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्यावी. स्वच्छ पाण्याचे नियोजन ग्रामपंचायतींनी करावे. महसूल, पशु संवर्धन, पोलीस विभाग, अग्निशमन यंत्रणा यांनी याकाळात सतर्क राहावे. याबरोबरच 24 तास नियंत्रण कक्ष कार्यरत ठेवणे, नियंत्रण कक्षात संपर्क अधिकार्‍यांच्या नेमणुका करणे, पूर्वसूचना न देता मुख्यालय सोडू नये, नियंत्रण कक्षातील यंत्रणांचे भ्रमणध्वनी कार्यरत ठेवणे अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. या बैठकीत पाटबंधारे, महसूल, महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, आरोग्य, पशु संवर्धन, बांधकाम, जलसंधारण, शिक्षण, विद्युत विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा, पोलीस विभाग, अग्निशामक दल, होमगार्ड आदी विभागांचा आढावा घेतला.

Visits: 130 Today: 2 Total: 1113300

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *