घरफोडीच्या उद्देशाने चोरट्यांनी केलेल्या हल्ल्यात एकाचा खून वाकी येथील घटना; राजूर पोलिसांत तिघा अज्ञात चोरट्यांवर गुन्हा

नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील वाकी परिसरात चोरट्यांच्या हल्ल्यात एका व्यक्तीचा खून झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (ता.9) पहाटे एक वाजेच्या सुमारास घडली आहे. यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत राजूर पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, वाकी येथील मधुकर किसन सगभोर, पत्नी पुष्पा मधुकर सगभोर व पायल मधुकर सगभोर असे तिघे घरात झोपलेले होते. त्यावेळी तोंडाला फडके बांधलेले तीन चोरटे घरात घुसले. त्यांनी उचकापाचक केली असता एक रुपया देखील सापडला नाही. मात्र, बेन्टेक्सच्या बांगड्या आणि हार असा दोनशे रुपयांचा मुद्देमाल चोरला. याचवेळी चोरट्यांनी मधुकर किसन सगभोर यांच्यावर लाकडी काठी व कोयत्याने हल्ला चढविला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. पत्नी व मुलीलाही चोरट्यांनी मारहाण केली.

या घटनेची माहिती पोलीस पाटील यांनी गस्तीवरील पोलिसांना दिली. त्यांनी माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होवून माहिती घेतली. जखमी पुष्पा सगभोर यांना राजूर ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. तर मृत मधुकर सगभोर यांचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी रुग्णालयात आणला. याप्रकरणी मयताची मुलगी पायल मधुकर सगभोर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात तीन चोरट्यांवर गुरनं. 154/2023 भादंवि कलम 460, 302 नुसार गुन्हा दाखल केला आहे. यातील फडके बांधलेले अज्ञात तिघे कोण याचा राजूर पोलीस कसून शोध घेत आहे. लवकरच आरोपींना गजाआड करण्यात यश येईल, असा विश्वास तपासी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे यांनी व्यक्त केला आहे.
