संतप्त नागरिकांचं सामूहिक प्रतीकात्मक मूत्र विसर्जन आंदोलन कोपरगाव पालिकेच्या उपमुख्याधिकार्यांना निवेदन देत वेधले लक्ष

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
शहरातील मुख्य चौकात महिला आणि पुरुषांसाठी स्वच्छतागृह बांधावे, या मागणीसाठी लोकस्वराज्य आंदोलनसह सर्वसामान्य नागरिक, बाजारपेठेतील व्यापारी यांच्यावतीने कोपरगाव नगरपरिषदेच्या आवारात मंगळवारी (ता.9) सामूहिक प्रतीकात्मक मूत्र विसर्जन आंदोलन करण्यात आले. तसेच उपमुख्याधिकार्यांकडे निवेदन सोपवण्यात आले.

यावेळी आंदोलक म्हणाले, कोपरगाव शहरात मुख्य रस्त्यालगत पुरुषांसाठी स्वच्छतागृहे होती. मात्र विकासकामांच्या गदारोळात ही स्वच्छतागृहे नगरपालिकेने हटवली. तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहाच्या बाजूला असलेल्या स्वच्छता गृहाशेजारी नवीन इमारतीच्या पायाची खोदकाम करताना काही दिवसांपूर्वी पडले. मात्र, त्यामुळे परिसरातील नागरिक व व्यापारी यांची मोठी गैरसोय होत आहे. तसेच महिलांकरिता एवढ्या मोठ्या शहरात भाजी मार्केटमध्ये एकमेव स्वच्छतागृह आहे. अनेक व्यापारी व नागरिक यांनी वारंवार नगरपालिकेकडे स्वच्छतागृहाची मागणी केली. मात्र आठ दिवस झाले तरी नागरिक, व्यापारी यांच्या मागणीकडे नगरपालिका अक्षम्य दुर्लक्ष करत असून कोपरगाव शहरातही महिला व पुरुषांना लघुशंका करण्यासाठी स्वच्छतागृह त्वरीत बांधावे अशी मागणी करण्यात आली. यावेळी नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी ज्ञानेश्वर चाकणे यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी लोकस्वराज्य आंदोलनचे प्रदेशाध्यक्ष अॅड. नितीन पोळ, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस नितीन शिंदे, शिवसेनेचे माजी शहरप्रमुख भरत मोरे, मनसेचे संतोष गंगवाल, माजी नगरसेवक अनिल आव्हाड, शेतकरी कृती समितीचे तुषार विध्वंस, भूमीपुत्र फाउंडेशनचे निसार शेख, भोई समाज संघटनेचे समाजसेवक अर्जुन मोरे, उमेश धुमाळ, रफीक बागवान, अफजल मौलाना यांच्यासह व्यापारी बांधव, विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

शहरात महिलांसाठी फक्त एक स्वच्छतागृह
जागतिक महिला दिनाला महिलांचा सन्मान केला जातो अधिकारी आणि नेत्यांकडून महिला सन्मानाच्या विविध गप्पा मारल्या जातात, महिलांसाठी राज्य सरकारच्यावतीने नुकतेच बसमध्ये 50 टक्के आरक्षण दिले गेले. मात्र कोपरगावचा विचार केला तर संपूर्ण शहरात महिलांसाठी नगरपरिषदेचे फक्त एकच सार्वजनिक स्वच्छतागृह आहे, महिलांची ही गैरसोय करून हा महिलांचा अपमान नाही का? त्यामुळे नगरपरिषदेने पुरुष स्वच्छतागृहासह महिला स्वच्छतागृह देखील बांधावे अशी मागणी महिलांकडून होत आहे.
