औषधी वनस्पती लागवडीला चांगले दिवस ः विखे लोणी येथे औषधी, सुगंधी वनस्पती लागवड व फुलशेती कार्यशाळा संपन्न

नायक वृत्तसेवा, शिर्डी
औषधी व सुगंधी वनस्पती लागवडीत सी-मॅपसारख्या संशोधन संस्थांनी मार्गदर्शनासाठी पुढाकार घेतला, ही स्वागतार्ह बाब आहे. या वनस्पती लागवडीतून रोजगाराच्या संधी आणि चांगल्या उत्पन्नाची हमी मिळाली, तर महिला बचतगट त्यासाठी पुढे येतील. त्यांना प्रवरा सहकारी बँकेच्या माध्यमातून कर्जाची उपलब्ध करून देता येईल, असे प्रतिपादन आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

राहाता तालुक्यातील लोणी येथील जनसेवा फाऊंडेशन, राहाता पंचायत समिती आणि लखनौ येथील सी-मॅप या संशोधन संस्था यांच्यातर्फे औषधी, सुगंधी वनस्पती लागवड व फुलशेतीच्या संदर्भात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. सी-मॅप संस्थेचे संचालक डॉ. प्रबोधकुमार त्रिवेदी, प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. आलोक कार्ला, निदेशक डॉ. महेंद्र दारोरकर, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील, रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्षा धनश्री विखे पाटील, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. संभाजी नालकर, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ उपस्थित होते. पुढे बोलताना विखे पाटील म्हणाले, की औषधी वनस्पतींबाबत केंद्राने महत्त्वपूर्ण धोरण घेतले. मात्र, त्यासाठी बँका अर्थसाहाय्य करीत नाहीत. प्रवरा बँकेच्या माध्यमातून त्यासाठी कर्ज उपलब्ध करून देण्याची आपली तयारी आहे.

राज्यात सी-मॅपच्या माध्यमातून सुगंधी औषधी वनस्पती लागवड मार्गदर्शन सुरू आहे. सुंगधी तेलाची मागणी भविष्यात वाढेल. राहाता तालुक्यातील जनसेवा फाउंडेशन आणि सी-मॅपच्या माध्यमातून सुरू होत असलेला हा प्रकल्प त्यादृष्टीने महत्त्वाचा आहे.
– डॉ. प्रबोधकुमार त्रिवेदी (संचालक, सी-मॅप)

सी-मॅपच्या माध्यमातून फुलशेतीवर देखील संशोधन सुरू आहे. सुगंधी तेलनिर्मितीबरोबरच फुलशेती आणि मधुमक्षिकापालन या पूरक उद्योगातून चांगले उत्पन्न मिळू शकते.
– डॉ. अलोक कार्ला (शास्त्रज्ञ, सी-मॅप)

Visits: 105 Today: 1 Total: 1421507

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *