पंधरवड्याच्या विश्रांतीनंतर शहरातील बकालपणात पुन्हा वाढ! भंगारातील रिक्षा हळूहळू थांब्यावर; कारवायांमध्ये सातत्य नसल्याचा परिणाम..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
महिन्याभरापूर्वी कोल्हेवाडी रस्त्यावर घडलेल्या झुंडशाहीच्या घटनेने अवघ्या दहा महिन्यांच्या कालावधीत तिसर्यांदा संगमनेर शहराचे सामाजिक स्वास्थ बिघडले होते. या घटनांच्या मूळाशी शहरातील बेकायदा व्यवसाय, अनधिकृत रिक्षा आणि बेसुमार अतिक्रमणं असल्याचे वारंवार समोर आल्यानंतर त्यांच्यावर कारवाईसाठी पोलिसांवरील दबाव वाढला. त्यामुळे पोलिसांनीही उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या मदतीने शहराच्या विविध भागात नाकाबंदी करीत भंगारातील अथवा परवाना नसलेल्या रिक्षांविरोधात धडक कारवाई करण्यास सुरुवात केली. मात्र आता नव्याचे नऊ दिवस संपले असून शहरातील तणाव निवळताच पोलीस आपल्या ‘उद्योगात’ व्यस्त झाले आहेत. त्यामुळे कारवाईच्या भीतीने दडून ठेवलेल्या अशा बेकायदा रिक्षा आणि अतिक्रमणं हळूहळू पूर्ववत मोक्याच्या शासकीय जागांवर स्थिरावत असून पंधरा दिवस गायब झालेला शहरातील बकालपणा पुन्हा एकदा वाढत असल्याचे बघायला मिळत आहे.
गेल्या महिन्यात 12 मार्चरोजी कोल्हेवाडी रस्त्यावरुन संगमनेरच्या दिशेने येणार्या एका दुचाकीस्वाराला गोवंशाची वाहतूक करणार्या विना क्रमांकाच्या पिकअप वाहनाच्या चालकाने कट मारल्यानंतर मारहाणही केली. यावेळी त्याने गोवंश कत्तलखान्यातील आपल्या अन्य साथीदारांनाही बोलावून घेतल्याने एकप्रकारे या रस्त्यावर अनधिकृत व्यावसायिकांची झुंडशाहीच दिसून आली. धक्कादायक म्हणजे सदरचा दुचाकीस्वार आपल्या दोन लहान मुलींना घेवून संगमनेरात येत असताना हा प्रकार घडला. त्याला जमावाकडून मारहाण होत असताना त्याच्या दोन्ही मुली ‘पप्पा.. पप्पा..’ म्हणतं मोठमोठ्याने आक्रोश करीत असल्याचा व्हिडिओही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यामुळे काही वेळातच शहरातील वातावरण कमालीचे तणावपूर्ण बनले होते.
वारंवार घडणार्या अशा झुंडशाहीच्या विरोधात संतप्त झालेल्या कोल्हेवाडी आणि जोर्वे येथील ग्रामस्थांनी 27 मार्चरोजी सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चा काढून निषेध करण्याची घोषणा करताच पोलिसांचे धाबे दणाणले. त्यातूनच अशा घटनांना कारणीभूत ठरत असलेल्या बेकायदा वाहनांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. त्यासाठी श्रीरामपूरच्या उपप्रादेशिक परिवहन विभागाशी पत्रव्यवहार करुन त्यांनाही कारवाईत सहभागी करुन घेत शहर पोलिसांनी प्रवाशांसह गोवंशाचे मांस आणि वाळू वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात वापर होत असलेल्या भंगारातील व परवाना संपलेल्या अनधिकृत रिक्षांवर धडक कारवाईचा निर्णय घेतला. त्यासाठी शहरातील मोक्याच्या रस्त्यावर नाकाबंदी करुन दोन-चार दिवसांत पोलिसांनी 29 रिक्षांवर थेट कारवाई करीत त्यातील 15 रिक्षा जप्त केल्या तर 14 रिक्षाचालकांकडून जवळपास पावणे दोन लाखांचा दंडही वसुल करण्यात आला.
पोलीस आणि परिवहन विभागाच्या संयुक्त कारवायांनी धास्तावलेल्या अशा रिक्षांच्या चालकांनी तेव्हापासून आपल्या बेकायदा, भंगारातील रिक्षा दडवून ठेवल्या होत्या. त्याचा परिणाम शहरातील बहुतेक सर्वच अनधिकृत रिक्षाथांबे आपोआप बंद झाले, शहरातील अरुंद रस्त्यांवर वारंवार होणारी वाहतूक कोंडीची समस्याही जवळजवळ संपुष्टात आली आणि वाहतुकीलाही शिस्त लागल्याचे समाधानकारक चित्र संगमनेरकरांना बघायला मिळाले. मात्र ते फार फारकाळ टिकणारे नव्हते हे आता स्पष्टपणे दिसू लागले आहे. त्यातून पोलिसांची कृती अथवा कारवाई तात्कालीक असल्याचेही स्पष्ट झाले असून पोलीस केवळ वेळ मारुन नेत असल्याने भविष्यात कोल्हेवाडी रोडवरील घटनेची पुनरावृत्ती झाल्यास त्याचे आश्चर्य वाटू नये.
कारवायांमधील सातत्याच्या अभावाने अवघ्या पंधरवड्यापूर्वी शहरातील अंतर्गत रस्त्यांवरुन ‘गायब’ झालेल्या बेकायदा, भंगारातील रिक्षा आणि त्यांचे अनधिकृत थांबे आता पुन्हा एकदा हळूहळू गजबजू लागले असून शहराची अवस्था पुन्हा ‘ये रेऽ माझ्या मागल्या..’ प्रमाणे व्हायला सुरुवात झाली आहे. युवराजांच्या राजकीय आशीर्वादाने प्रचंड मुजोरी वाढलेल्या आणि कारवाईच्या भीतीने गेले पंधरा दिवस निम्म्याहून अधिक रिक्षा गायब असलेल्या हॉटेल काश्मिर समोरील ‘बेकायदा’ रिक्षा थांब्यासह शहरातील अन्य छोट्या-मोठ्या थांब्यावर आता अशाच रिक्षांची संख्याही दिसू लागली आहे. शहरातील बेकायदा रिक्षाथांब्यांसह काही भागातील अतिक्रमणांनाही राजकीय आशीर्वाद असल्याने त्याचा फायदा घेत तणावात गायब झालेले अतिक्रमणंधारक परत एकदा शासकीय जागांवर कोंडाळे घालू लागले आहेत. त्यामुळे केवळ पंधरा दिवस गायब झालेला बकालपणा पुन्हा दिसू लागल्याचे दुर्दैवी चित्र सध्या संगमनेरात बघायला मिळत आहे.
पोलिसांनी कारवाईत जप्त केलेल्या 15 रिक्षा भंगारातील अथवा परवानाच नसलेल्या होत्या. मात्र तरीही त्यातून राजरोसपणे प्रवाशी वाहतूक केली जात होती. यातील काही रिक्षांमध्ये बेकायदेशीरपणे घरगुती गॅसचा वापरही होत असल्याचे समोर आले होते. अशा प्रकारच्या रिक्षातून प्रवास करणार्यांचा दुर्दैवाने अपघात झाल्यास व त्यात प्राणहानीचे संकट ओढावल्यास मयत अथवा जखमीच्या कुटुंबाला कोणताही आर्थिक दिलासा मिळण्याची शक्यता नसते. त्यामुळे प्रवाशांनीही रिक्षाचा वापर करताना त्या अधिकृत आणि परवानाधारक आहेत का? याची चौकशी करुनच त्यांचा वापर करण्याची आवश्यकता आहे. प्रशासनाची भूमिका तात्कालीक असल्याचे इतक्या मोठ्या घटनेनंतरही स्पष्ट झाल्याने आता नागरीकांनी स्वतःच आपली काळजी घेण्याची गरजही यातून प्रकर्षाने समोर आली आहे.
संगमनेर शहरात भंगारातील आणि परवाना नसलेल्या रिक्षांचा वापर गोवंशाचे मांस अथवा वाळूसह प्रवाशी वाहतुकीसाठीही होत असल्याच्या तक्रारी होत्या. त्या अनुषंगाने पोलिसांनी उपप्रादेशिक परिवहन विभागाशी पत्रव्यवहार करुन त्यांना संयुक्तपणे होणार्या कारवाईत सहभागी होण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार शहर पोलिसांकडून मोहिमही राबविण्यात आली असून 29 रिक्षांवर कारवाई करण्यात आली आहे. कारवाई दरम्यान बेकायदा रिक्षाचालक वाहने घेवून रस्त्यावर येण्याचे टाळीत असल्याचे निरीक्षणही समोर आल्याने यापुढे चार-आठ दिवसांत अचानक तपासणी मोहिम राबविण्याचा निर्णय संयुक्तपणे घेण्यात आला आहे. बेकायदा रिक्षांविरोधात पोलिसांनी सुरु केलेली मोहिम यापुढेही कायम सुरु राहणार आहे.
सोमनाथ वाघचौरे
उपविभागीय पोलीस अधिकारी