आंबीखालसा फाट्यावर मालवाहू ट्रक उलटला तांदळाच्या गोण्या विखुरल्या; एकजण जखमी तर ट्रकचे मोठे नुकसान

नायक वृत्तसेवा, घारगाव
पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील आंबीखालसा फाटा (ता.संगमनेर) येथे उपरस्त्यावर तांदूळ घेवून जाणारा ट्रक उलटला आहे. सदर घटना गुरुवारी (ता.30) रात्री बारा वाजेच्या सुमारास घडली आहे. या अपघातात एकजण जखमी झाल्याचे वृत्त आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, दिल्ली येथून तांदूळ घेवून ट्रक पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाने पुणे येथे जात होता. गुरुवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास हा ट्रक आंबीखालसा फाट्यावर आला असता त्याचवेळी ट्रक गतिरोधकवरून उपरस्त्यावर उलटला. यावेळी ट्रकमधील तांदाळाच्या गोण्या बाहेर सर्वत्र विखुरल्या होत्या. तर ट्रकचेही मोठे नुकसान होवून एकजण जखमी झाला आहे. दरम्यान, हा मालवाहू ट्रक महामार्गावर पलटी झाला असता तर वाहतूक ठप्प झाली असती. मात्र उपरस्त्यावर तो पलटी झाल्याने वाहतुकीस कोणतीही बाधा पोहोचली नाही. या अपघाताची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गेल्या वर्षभरात या गतिरोधकवर छोट्या-मोठ्या वाहनांचे अपघात झाले आहे. अद्याप ही श्रृंखला कायम असल्याचेच दिसून येत आहे. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज यानिमित्ताने अधोरेखित होत आहे.
