शिर्डीमध्ये तरुणीची डोक्यात पेव्हर ब्लॉक घालून हत्या परिसरात उडाली खळबळ; पोलिसांनी एका संशयितास घेतले ताब्यात


नायक वृत्तसेवा, शिर्डी
शिर्डीतील सैंदडी बाबा रस्त्यावर असलेल्या मयुरेश्वर कॉलनी येथील ज्ञानेश्वरी नवनाथ कुलथे या सतरावर्षीय तरुणीची पेव्हर ब्लॉक डोक्यात मारुन हत्या झाल्याची घटना मंगळवारी (ता.2) सायंकाळी शिर्डीत घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका युवकाला संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे.

ज्ञानेश्वरी कुलथे हिची मंगळवारी सायंकाळी हत्या झाल्याची माहिती पोलिसांना समजताच पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची अधिक माहिती घेतली. या तरुणीच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक मारुन हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांना समजताच तिची हत्या का झाली असावी याचा तपास पोलिसांनी वेगाने करून एका युवकाला पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे.

सदर तरुणीच्या आजोबांचे कलिकानगर येथील बाजारतळ परिसरात किराणा मालाचे दुकान असून नातीच्या खुनाची माहिती मिळताच ज्ञानेश्वरीची आई, आजोबा आणि नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला. भरवस्तीत सतरावर्षीय तरुणीची हत्या झाल्याने परिसरात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. परंतु ही हत्या कोणत्या कारणाने केली याचा तपास पोलीस करीत आहेत.

Visits: 195 Today: 1 Total: 2128014

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *