वन विभागाचा अजब कारभार चव्हाट्यावर; एकच बिबट्या सोडला दोन ठिकाणी निमगाव खैरी येथील घटना; संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची नागरिकांची मागणी
![]()
नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
तालुक्यातील निमगाव खैरी-चितळी शिवारातील दिघी चारी जवळील शेतरस्त्याच्या कडेला लावलेल्या पिंजर्यात बिबट्यास वन विभागाने सापळा लावून नुकतेच जेरबंद केले. या भागात बिबट्याची प्रंचड दहशत झाली होती. बिबट्या जेरबंद झाल्याचे समजल्याने परिसरातील शेतकर्यांसह निमगाव खैरी-चितळीतील नागरिकांनी पाहण्यासाठी गर्दी केली होती. मात्र, वन विभागाने ‘तो’ एकच बिबट्या वेगवेगळ्या दोन ठिकाणी सोडल्याचे आश्चर्यकारकरित्या नुकतेच उजेडात आले आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपूर्वी निमगाव खैरी-चितळी गावालगतच एक शेळी बिबट्याने फस्त केली होती. त्यानंतर दोनच दिवसांनी दुपारच्या वेळी मेंढ्या चारत असलेल्या कळपातून भरदुपारी मेंढी ओढत जवळच्या ऊसात घेऊन गेला होता. यामुळे या बिबट्याची परिसरात प्रंचड दहशत झाली होती. हा बिबट्या अनेक शेतकर्यांच्या लक्षात आल्याने वन विभागाला पिंजरा लावण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार वन विभागाने पिंजरा लावल्याने बिबट्या पिंजर्यात जेरबंद झाला. त्यानंतर परिसरतील नागरिकांची त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

वनपाल बी. एस. गाडे, वनरक्षक गोरख सुराशे, श्री.लांडे व इतर कर्मचार्यांसह परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांच्या प्रयत्नाने हा बिबट्या जेरबंद झाल्याने परीसरातील शेतकरी व वन विभागाने सुटकेचा निःश्वास सोडला होता. मात्र, पुन्हा हाच बिबट्या अनेक नागरिकांना दिसल्याने तीव्र संताप व्यक्त केला आहे. याबाबत वनपाल म्हणतात की, माळशेज घाटात सोडला तर चालक म्हणतो वैजापूर-शिऊर हद्दीत सोडला आहे. यामुळे वन विभागाचा भोंगळ कारभारही चव्हाट्यावर आल्याने याची त्वरीत चौकशी होऊन संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

जिल्हाभर बिबट्यांचे हल्ले वाढले असून अनेक ठिकाणी बिबट्याच्या हल्यात निष्पाप लहान मुले, वृद्धांचे बळी गेल्याच्या घटना आहेत. शासनस्तरावर योग्य निर्णय होऊन एखाद्या अभयारण्यात बिबट्यांची व्यवस्था होणे गरजेचे असून, निमगाव खैरी भागात पिंजर्यात अडकलेल्या बिबट्याला अवघ्या 4 किलोमीटरवर असलेल्या नाऊर भागात सोडणे ही गंभीर बाब आहे. या संदर्भात वन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याशी संपर्क झाला असून, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्याशी देखील संपर्क साधून मुजोर अधिकार्यांवर कारवाईची मागणी करणार आहे.
– बाळासाहेब नवगिरे (जिल्हाध्यक्ष, ग्रामीण पत्रकार संघटना)

याबाबत वनपाल बी. एस. गाडे यांना संपर्क केला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन तुम्ही वनमंत्री, मुख्यमंत्री यांच्यासह वरिष्ठांकडे कुठेही तक्रार करा, माझी बदलीची तयारी आहे अशी अशोभनीय भाषा वापरली आहे. यामुळे नागरिकांत संतापाचे वातावरण आहे. लवकरच वनमंत्र्यांकडे तक्रार करणार आहे.
– संदीप शेलार (सरपंच, जाफराबाद)

